Video: ‘उचलली जीभ लावली कपाळाला’

आपली जीभ जगातली सर्वात मोठी जीभ असल्याचा दावा कटुवाल आणि त्याचे मित्र करतात.

सौजन्य- सोशल मीडिया

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ ही म्हण तुम्ही आजवर अनेकदा ऐकली असेल. मात्र, ‘उचलली जीभ आणि लावली कपाळाला’ हे समीकरण जरा न जुळणारं अाहे. स्वत:ची जीभ स्वत:च्यात नाकाला टेकवणारे बरेचजण तुम्ही पाहिले असतील पण थेट कपाळाला जीभ लावणाऱ्यांबदल क्वचितच ऐकलं असेल. मात्र, जगाच्या पाठीवर असा एक अवलिया आहे ज्याने ही अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. नेपाळमध्ये राहणारा एका बस चालक त्याची जीभ थेट त्याच्या कपाळाला टेकवतो आणि तेही अगदी सहजरित्या. यज्ञ बहादुर कटुवाल (३५) असं या अवलियाचं नाव असून तो अत्यंत लवचिकपणे आपली जीभ कपाळाला लावू शकतो. यज्ञच्या या अजब-जगब प्रकारामुळे ‘जगात काहीही अशक्य नाही’ या वाक्याची पुन्हा एकदा प्रचिती येते. सध्या सोशल मीडियावर या अवलियाचे आणि त्याच्या या भन्नाट कलेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तुम्हीही हा व्हिडिओ पाहाल तर नक्कीच चकित होऊन जाल.

 

आपली जीभ जगातली सर्वात मोठी जीभ असल्याचा दावा कटुवाल आणि त्याचे मित्र करतात. यज्ञ कटुवालच्या एका मित्रानेच त्याचा व्हिडीओ शूट करुन तो काही मित्रांसोबत शेअर केला आणि पाहता पाहता संपूर्ण जगात तो व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यज्ञ कटुवाल आणि त्याच्या घरचे जणू सेलिब्रीटीच बनले आहेत. आसपासच्या परिसरातून, गावांतून लोक यज्ञला भेटायला येऊ लागले आहेत. अनेक स्थानिक माध्यमांनीही त्याची भेट घेऊन त्याच्या या हटके प्रकाराबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, जगभरातील लोक यज्ञंच्या या अनोख्या कौशल्याचं कौतुक करत आहेत. दरम्यान, आपल्या या टॅलेंटची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.