घरक्रीडाOdisha Train Accident : सर्वस्व गमावलेल्यांना वीरेंद्र सेहवागकडून मदतीचा हात; सोशल मीडियावर कौतुक

Odisha Train Accident : सर्वस्व गमावलेल्यांना वीरेंद्र सेहवागकडून मदतीचा हात; सोशल मीडियावर कौतुक

Subscribe

नवी दिल्ली: ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी (2 जून) शालीमा-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस, बेंगळुरू-हावडा सुपर फास्ट आणि एक मालगाडी यांच्यात झालेला भीषण अपघात भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातापैकी एक ठरला आहे. या अपघातात आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 हजार 175 लोक जखमी झाले आहेत. या अपघातात सर्वस्व गमावलेल्यांना सर्व स्तरातून मदत होत असताना भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनेही मदतीचा हात पुढे नेला आहे. अपघातात ज्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सेहवागने उचलली आहे. या सर्व मुलांना तो मोफत शिक्षण देणार आहे. या घटनेचा फोटो शेअर करत सेहवागने एक पोस्ट लिहली आहे. (Virender Sehwag lends helping hand to those who lost everything Odisha Train Accident, Interest on social media)

विरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले की, हा फोटो आपल्याला बराच काळ वेदना देणार आहे. या दुःखाच्या प्रसंगी, या दुःखद अपघातात ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे एवढेच मी करू शकतो. मी अशा मुलांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूलच्या बोर्डिंग सुविधेत मोफत शिक्षण देतो. तसेच बचाव कार्यात आघाडीवर राहिलेल्या सर्व शूर स्त्री-पुरुषांना आणि स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या वैद्यकीय पथकाला आणि स्वयंसेवकांना सलाम. यामध्ये आम्ही एकत्र आहोत.

- Advertisement -

सेहवागच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्याचे कौतुक केले. 2015 मध्ये सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो आणि त्याच्या पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. संकटाच्या काळी मदत करण्याची सेहवागची ही पहिली वेळ नाही. 44 वर्षीय सेहवागने हरियाणा येथे एक शाळा सुरू केली असून तेथे अनेक मुलांच्या शिक्षणाची आणि राहण्याची सोय त्याने केली आहे. याआधी सेहवागने 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली होती. करोना काळात देखील त्याने गरजूंना मोफत भोजन दिले होते.

- Advertisement -

सेहवागसोबत उद्योगपती गौतम अदानी यांनीही रेल्वे अपघातात सर्वस्व गमावलेल्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, पीडितांना आणि त्यांच्या मुलांना मदत करणे आणि त्यांचे भविष्य चांगले करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -