घरदेश-विदेशअमित शहांकडे सहकार क्षेत्राची सुत्र गेल्याने थरथराट होण्याचं कारण नाही - शिवसेना

अमित शहांकडे सहकार क्षेत्राची सुत्र गेल्याने थरथराट होण्याचं कारण नाही – शिवसेना

Subscribe

केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालयाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, या नव्याने स्थापन केलेल्या मंत्रालयाने राष्ट्रवादी काँग्रेसला धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच, या मंत्रालयाला विरोध देखील होत आहे. यावरुन शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्रातून सहकार खात्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी शिवसेनेने अमित शहांकडे सहकार क्षेत्राची सुत्र गेल्याने थरथराट होण्याचं कारण नाही, असं देखील म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

“मोदींच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला अधिक बळ देण्याचा विचार आहे, असे नव्या सहकार मंत्र्यांनी म्हणजे गृहमंत्री अमित शहांनी सांगितले. शेअर बाजाराच्या वर-खाली होण्यावर ज्या देशाची अर्थव्यवस्था सुरू आहे त्या देशात सहकार चळवळीचे अर्थकारणच कोट्यवधी गरीब शेतकऱयांना जगवत असते. गुपकार गँग सर्वच क्षेत्रात असली तरी सहकार क्षेत्राचा नंबर त्यात शेवटचा आहे. हे क्षेत्र जगविणे, टिकविणे, त्यास बळ देणे हे केंद्राचे कर्तव्यच आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सहकार क्षेत्राची सूत्रे हाती घेतल्याने कोणाचा थरथराट वगैरे होण्याचे कारण नाही. अमित शहा हे सहकार चळवळीतलेच कार्यकर्ते आहेत. नव्या सहकार मंत्र्यांचे स्वागत करायला काय हरकत आहे?” असा सवाल शिवसेनेने केला आहे.

- Advertisement -

…शहा यांची बदनामी करणारे

“गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार आल्यामुळे अनेकांच्या मनात विचारांचे तरंग निर्माण झाले आहेत. शहा यांच्याकडे सहकार खाते आल्याने या क्षेत्रावर आकाश कोसळेल असे भय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहा हे महाराष्ट्रासारख्या राज्यातील सहकार क्षेत्राच्या नाड्या आवळतील, अनेक प्रकरणे खणून काढतील, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सहकारातील जे प्रमुख लोक आहेत त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावतील व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप सरकारची स्थापना ‘सहकारा’तून करतील असे जे बोलले जात आहे ते शहा यांची बदनामी करणारे आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

राजकारणात सगळे घोडे बारा टकेच असतात

“राजकारणात व सहकारात बरे-वाईट, खरे-खोटे, नैतिक-अनैतिक असे काही भेदभाव सध्या उरले नाहीत. सर्व काही सोयीनुसार घडत असते. ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव लोकसभा निवडणुकीत भाजपने केला. त्याच शिंदे महाराजांना भाजपने आता मोठ्या सन्मानाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले. कश्मीर खोऱ्यातील ‘गुपकार’ गँगला ३७० कलम लावल्यानंतर तुरुंगात टाकले होते. त्याच गुपकार गँगशी दिल्लीत पंधरा दिवसांपूर्वी पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा केली. सहकार क्षेत्रात एखादी गुपकार गँग असलीच तर त्यांच्याशीही चर्चा होईल. कारण राजकारणात शेवटी सगळे घोडे बारा टकेच असतात,” असं शिवसेनेने अग्रलेखात म्हटलं आहे.

- Advertisement -

गृहखाते हा ‘थँकलेस जॉब’ म्हणून…

“शहा यांना सहकार खात्यात काही सुधारणा करायच्या आहेत, म्हणजे नक्की काय करायचे आहे ते लवकरच दिसेल. याआधी कौशल्य विकास या नव्या मंत्रालयाची स्थापना झाली होती व हे खाते पंतप्रधानांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’चा एक भाग असल्याचे सांगण्यात येत होते. त्या खात्याने पुढे काय केले? हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. आता नव्याने सहकार खाते निर्माण झाले व ते गृहमंत्र्यांनी आपल्या मुठीत ठेवले. ग्रामविकास व सहकार ही तळागाळाशी जोडलेली खाती आहेत व त्या माध्यमातून लोकांना मदत करता येते हे महाराष्ट्र व गुजरातमध्ये दिसले आहे. गृहखाते हा ‘थँकलेस जॉब’ आहे. त्यामुळेच सहकार क्षेत्रातून लोकांपर्यंत पोहोचावे, असा विचार गृहमंत्र्यांनी केला असेल तर कोणाला चलबिचल होण्याची आवश्यकता नाही,” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

म्हणजे लाखो शेतकऱ्यांच्या पोटापाण्याशी खेळण्यासारखे

“सहकारातून निर्माण झालेले नेतृत्व व त्यांची जनमानसावर असलेली पकड याचा कोणाला राजकीय त्रास होत असेल व त्यांना शरण आणण्यासाठीच केंद्रातील सहकार खाते अमित शहांकडे दिले हा विचार तूर्तास करणे योग्य नाही. शिवाय सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधानसभेत केलेले असतात. त्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. घटनेनुसार हा राज्य सरकारचा विषय आहे. सहकार क्षेत्राशी उलटसुलट वर्तन करणे म्हणजे लाखो शेतकऱ्यांच्या पोटापाण्याशी खेळण्यासारखे आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -