घरदेश-विदेशशंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी घेतला अखेरचा श्वास

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

पंचवटी : ज्योतिर्मठ आणि द्वारका अशा दोन्ही पीठांचे शंकराचार्य असलेल्या स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी रविवारी (दि.११) मध्यप्रदेश येथील परमहंसी गंगा आश्रम झोतेश्वर, नरसिंहपूर येथील आश्रमात वयाच्या ९९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भरणार्‍या कुंभमेळ्यात पहिल्यांदाच शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी शंकराचार्य यांनी त्र्यंबकेश्वर येथे मुक्काम केला होता.

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे अध्यात्म क्षेत्रातील योगदान अतुलनीय मानले जाते. स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील जबलपूरनजीक असलेल्या दिघोरी गावातील ब्राह्मण कुटुंबात झाला होता. वडील धनपती उपाध्याय आणि आई गिरिजा देवी यांनी त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय ठेवले. वयाच्या नवव्या वर्षापासून घर सोडून हिंदू धर्माच्या प्रसाराला त्यांनी सुरुवात केली. त्यावेळी उत्तर प्रदेशातील ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराजांकडे वेद व शास्त्रांचे धडे घेतले. १९४२ साली ते इंग्रजांविरोधात एक १९ वर्षीय तरुण क्रांतिकारी साधू म्हणून प्रख्यात झाले होते. ९ महिने वाराणसी आणि ६ महिने मध्यप्रदेशातील जेलमध्ये त्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत शिक्षा भोगली. १९५० मध्ये त्यांना दांडी संन्यासी बनवण्यात आले आणि १९८१ मध्ये त्यांना शंकराचार्य ही पदवी मिळाली. १९५० मध्ये शारदा पीठाने शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेतली आणि स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले.

- Advertisement -

आखाडा परिषदेचे नरेंद्रगिरी महाराज यांनीदेखील शंकराचार्यांचे त्र्यंबकेश्वर येथे सर्व आखाडा परिषदांच्या महंतांना सोबत घेत भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कुंभमेळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांची त्र्यंबक नगरीत पेशवाई मिरवणूकदेखील काढण्यात आली होती. शंकराचार्यांना शाही स्नानासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. शाही स्नानानंतर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती गोदाकाठी खेमाजी आरोग्य भवनात ३ ते ४ दिवस वास्तव्यास होते.

स्वामी स्वरूपानंद सरस्वतींचा साईबाबांच्या पूजेला विरोध होता. काही हिंदू दिशाहीन होऊन अवास्तव पूजण्यात मग्न आहेत. ज्यामुळे हिंदुत्वात विकृती निर्माण होत आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजींच्या मते, इस्कॉन भारतात येऊन कृष्णभक्तीच्या नावाखाली धर्मांतर करत आहे. हिंदूंचे ज्ञान घेऊन, दीक्षा देऊन हिंदूंना आपले शिष्य बनवत आहेत, ही इंग्रजांची कूटनीती आहे, असे ते म्हणत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -