घरक्रीडाENG VS IND 5TH TEST : मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर इंग्लंडने हिंमत...

ENG VS IND 5TH TEST : मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर इंग्लंडने हिंमत दाखवली होती – गावस्कर

Subscribe

BCCI च्या निर्णयाचे केले स्वागत

सुनिल गावस्कर यांनी भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या पाचव्या कसोटीच्या निमित्ताने बोर्ड कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) च्या निर्णयाचे स्वागत केले आहे. बीसीसीआयने पाचवी कसोटी नव्या वेळापत्रकानुसार घ्यावी ही मागणी केली आहे. मुंबईत २००८ साली झालेल्या हल्ल्याची आठवण करून देत इंग्लंडच्या संघाच्या प्रतिक्रियेची त्यांनी आठवण करून दिली आहे. मुंबईत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर होता. त्याचीच आठवण गावस्कर यांनी करू दिली आहे. (Sunil gavaskar welcomed bcci decision on 5th cancelled test rescheduling)

भारत आणि इंग्लंड संघादरम्यानची मॅंचेस्टर येथील कसोटी सामना कोरोनाच्या संकटामुळे रद्द झाला आहे. भारतीय संघ व्यवस्थापनातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानेच हा सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघासोबतचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांनी कोरोनाची लागण ही गुरूवारी झाल्याची माहिती समोर आली. भारतीय संघातील खेळाडू हे RTPCR चाचणी नंतर निगेटिव्ह आले खरे. पण संभाव्य संसर्गाची भीती पाहता हा संपुर्ण सामनाच रद्द करण्यात आला. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना मैदानात उतरवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यापाठोपाठच बीसीसीआयने दिलेल्या पत्रकानुसार रद्द झालेला सामना हा नव्या वेळापत्रकानुसार घ्यावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे निर्णायक अशा कसोटीसाठी काय वेळापत्रक आखता येईल यासाठीची चाचणी दोन्ही बोर्डांकडून सुरू आहे. पाच कसोटींच्या सिरीजमध्ये सध्या भारताची २-१ अशी आघाडी आहे. भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात हेड कोच असलेल्या रवि शास्त्री यांना तसेच बॉलिंग कोच भारत अरूण आणि फिल्डिंग कोच आर श्रीधर यांना कोरोनाची लागण झालेली असतानाही सामना खेळला.

- Advertisement -

सुनिल गावस्कर यांनी २००८ च्या मुंबईच्या ताज हॉटेल येथील २६/११ हल्ल्याची आठवण यानिमित्ताने सांगितली आहे. इंग्लंड संघ सात सामन्यांच्या मालिकेसाठी २००८ मध्ये भारत दौऱ्यावर होता. दहशतवादी हल्ल्यानंतर ही मालिक खंडित झाली. दोन एकदिवसीय तर दोन कसोटी सामने मालिकेत शिल्लक असताना इंग्लंड संघ मायदेशी परतला. त्यानंतर इंग्लंडचा संघ हा पुन्हा अहमदाबादमध्ये दोन कसोटी सामने खेळायला परतला. दहशतवादी हल्ल्याआधी सामन्यांचे ठिकाण हे मुंबई आणि अहमदाबाद होते. पण मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर हे ठिकाण अहमदाबाद आणि चेन्नई असे करण्यात आले. त्या मालिकेत केविन पिटरसनच्या नेतृत्वातील संघाचा भारताने १-० असा पराभव केला. सध्या सुरू असलेल्या मालिकेत रद्द झालेला कसोटी सामना पुन्हा आयोजित करणे हा योग्य निर्णय असल्याचे गावस्कर यांनी स्पष्ट केले आहे.

भारतात २६/११ च्या हल्ल्यानंतर इंग्लंडचा संघ दोन कसोटी सामने खेळण्यासाठी पुन्हा भारतात आला होता हे विसरून आपल्याला चालणार नाही असेही गावस्कर म्हणाले. आम्हाला सुरक्षित वाटत नाही, असे कारण देत इंग्लंडला भारत दौरा टाळता आला असता. पण त्यांनी ती गोष्ट केली नाही, ही आठवणही गावस्कर यांनी सांगितली. त्यावेळी केविन पीटरसन हा इंग्लंडचे नेतृत्व करत होता. त्यानेच नकार दिला असता तर संपुर्ण प्रकरणच संपुष्टात आले असते. एकट्या केविन पिटरसनने इच्छा दाखवल्याने आणि इतर टीम सदस्यांना तयार केल्यानेच हा दौरा शक्य झाला. चेन्नईत झालेला सामना हा अतिशय रोमांचक झाला. या सामन्यात भारताने शेवटच्या दिवशी ३८० धावांचा डोंगर रचून विजय खेचून आणला.

- Advertisement -

हेही वाचा – ENG VS IND 5TH TEST : भारत आणि इंग्लंड दरम्यानची कसोटी अखेर रद्द, ECB ची घोषणा


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -