घरदेश-विदेशकाही कळायच्या आत लाटेने त्याला समुद्रात खेचले

काही कळायच्या आत लाटेने त्याला समुद्रात खेचले

Subscribe

गोव्याच्या 'सीकेरी' या समुद्र किनार्‍यावर बसलेल्या तीन मित्रांपैकी एक जण मोठ्या लाटेसह समुद्रात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. आपला मित्र वाहून गेला आहे, हे बाकीच्या दोघांना समजले देखील नाही.

गोव्याच्या ‘सीकेरी’ समुद्र किनार्‍यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी तीन मित्र सीकेरी समुद्रकिनाऱ्यावर बसले असताना त्यापैकी एक जण मोठ्या लाटेसह समुद्रात वाहून गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाटेच्या जवळ जाऊन बसण्याची स्टंटबाजी या तरुणांना भोवली आणि त्यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला. लाटेमुळे वाहुन गेलेला तरुण हा तामिळनाडूहुन त्याच्या तीन मित्रांसोबत गोव्यात फिरण्यासाठी अाला होता. शशीकुमार वासण (३३) असे मृत तरुणाचे नाव आहे. लाटेसोबत वाहून गेल्यावर काही वेळाने त्याचा मृतदेह वाहून परत किनाऱ्यावर आला.

क्षणार्धात तरूण अदृश्य झाला!

सूर्योदय पाहण्यासाठी चार मित्र सीकेरी बीचवर आले होते. चौघांपैकी एक जण लाटांचे फोटो आणि व्हिडिओज शुट करत होता. दोन मित्र आणि त्यांची एक मैत्रीण लाटांच्या जवळ एका खडकावर बसले होते. लाटांचा, समुद्र किनारी वाहणाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत बसलेल्या या मित्रांच्या आनंदावर काही क्षणातच विरझन पडलं. एका मोठ्या लाटेने तिघांपैकी एका तरुणाला क्षणार्धातच खेचून नेले. इतर दोघे मोठ्या खडकांवर बसलेले असल्याने लाटेसोबत पाण्यात खेचले गेले नाहीत. त्यामुळे ते दोघेही थोडक्यात बचावले. विशेष म्हणजे शशीकुमार वाहून जात असताना थोडावेळ तो कुठे आहे, हे कुणालाच समजले नाही. आपला मित्र आपल्यामागे नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले असता शशीकुमार वाहून गेल्याचे त्यांना दिसले.

- Advertisement -

भरतीच्या वेळी समुद्रकिनारी बसू नये, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सतत दिली जाते. तरीही अनेकजण अशा प्रकारच्या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. भरतीच्या वेळीदेखील लाटांचा आनंद घेण्यासाठी काही लोक समुद्रकिनारी जाऊन बसतात. प्रत्येकाच्या आनदांची व्याख्याही वेगवेगळी. काही भिजण्यासाठी, काहीजण सेल्फीच्या मोहापायी तर काहीजण स्टंटबाजीसाठी लाटांच्या अगदी जवळ जातात. यामुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -