आपण कोरोनात अडकलोय, तिकडे UN नं वेगळाच इशारा दिलाय!

United Nations

जगभरात वेगाने कोरोनाचा प्रसार सुरू असताना अद्याप कोरोनावरच्या लसीचा शोध लागलेला नाही. आजघडीला जगात लाखो लोक कोरोनाबाधित झाले असून मृतांचा आकडा देखील काही लाखांच्या घरात गेला आहे. या पार्श्वभूमीवर WHO अनेक उपाययोजना करत असताना संयुक्त राष्ट्र अर्थात UN नं जगाला एका वेगळ्याच धोक्याचा इशारा दिला आहे. गंभीर बाब म्हणजे याचा फटका कोट्यवधी लोकांना बसण्याचा संयुक्त राष्ट्रचा अंदाज आहे. त्यामुळे जग कोरोनाच्या कचाट्यात सापडलेलं असताना हे वेगळंच संकट जगासमोर उभं राहायला लागल्याचं UNनं स्पष्ट केलं आहे.

काय आहे इशारा?

नुकताच संयुक्त राष्ट्राचा The State of Food Security and Nutrition in the World 2020 हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालामध्ये काही गंभीर मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. त्यातला सर्वात धक्कादायक मुद्दा म्हणजे कोरोनामुळे जगभरात भूकबळी जाण्याची दाट शक्यता आहे. जगभरात पसरलेला कोरोना आणि त्यामुळे आजही अनेक देशांमध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर भूकबळी आणि गरिबी वाढू लागली आहे. त्यामुळे एकट्या २०२० या वर्षात ८.३ कोटी ते १३.२ कोटी लोकं अल्पपोषित किंवा कुपोषित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

काय आहेत निरीक्षणं?

१. कोरोनाच्या संकटामुळे जगभरात २०२०मध्ये ८.३ कोटी ते १३.२ कोटी लोकं कुपोषित राहण्याचा धोका

२. लॉकडाऊनमुळे अन्नपुरवठा साखळी तुटल्यामुळे आणि कोरोनाच्या संकटामुळे रोजगार गेले आहेत. त्यामुळे गरीबांना पोषक आहार मिळू शकत नाहीये

३. कोरोना संकट जसजसं वाढतंय, तसतसा अन्नसंकटाचा परिणाम देखील व्यापक होऊ लागला आहे

४. सद्यस्थितीत जगभरात ६९ कोटी लोकं अन्न तुटवड्याचा सामना करत आहे. त्यांची संख्या जगाच्या ८.९ टक्के इतकी आहे

५. कोरोना संकटाच्या आधीच गेल्या ५ वर्षांमध्ये कुपोषणाचं संकट झेलणाऱ्या लोकांची संख्या ६ कोटींपर्यंत गेली आहे

भारतात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येनं वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्या अनेक भागांमध्ये सामान्य जनजीवन विस्कळीत झालं असून व्यवहार ३ महिने बंद होते. नुकतेच भारतात अनलॉक सुरू करण्यात आले आहे.