घरसंपादकीयअग्रलेखलम्पीमुळे पशुपालक संकटात

लम्पीमुळे पशुपालक संकटात

Subscribe

कोविड, मंकीपॉक्स, स्वाइन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या रोगांना महाराष्ट्र तोंड देत असताना आता लम्पी हा त्वचा रोग चिंतेचा विषय बनला आहे. आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लम्पी आजरामुळे आतापर्यंत देशभरात सुमारे ६० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे.

कोविड, मंकीपॉक्स, स्वाइन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यू यांसारख्या रोगांना महाराष्ट्र तोंड देत असताना आता लम्पी हा त्वचा रोग चिंतेचा विषय बनला आहे. आठ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लम्पी आजरामुळे आतापर्यंत देशभरात सुमारे ६० हजार जनावरांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत लम्पीच्या प्रादुर्भावामुळे १७ लाख जनावरे बाधित झाली आहेत. सर्वात भयावह बाब म्हणजे मृत गायी उघड्यावर फेकल्या जात आहेत. बिकानेर आणि बारमेरमध्ये असे चित्र दिसले. कालांतराने गायींचे मृतदेह कुजत असून, त्यातून भयानक दुर्गंधी येत आहे. गुजरात, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीसह किमान सात राज्यांमध्ये लम्पीच्या केसेस नोंदल्या गेल्या आहेत. गावपातळीवर या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, तसेच जनावरांना वेगळे ठेवण्यासाठी सर्वतोपरी उपयायोजना करा, असा सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे.

राजस्थान आणि गुजरातमध्ये लम्पीचा संसर्ग झपाट्याने पसरत असून, या राज्यांच्या सरकारने तिथल्या जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. या नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून प्रतिबंधक धोरणांवर लक्ष ठेवले जात आहे. केवळ ऑगस्ट महिन्यात या दोन राज्यांमध्ये विषाणू संसर्गामुळे तीन हजारांहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला. लम्पी आजाराला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावी, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्राकडे पत्रद्वारे केली आहे. गुजरातने या आजाराचा संसर्ग झालेल्या १४ जिल्ह्यांमध्ये पशुधनाच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रानेही गुजरातच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. शिवाय बाधित जनावरांवर उपचार करून इतर जनावरांना लागण न होण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. महत्वाचे म्हणजेे दुग्धव्यवसायावर ‘लम्पी’चा दुष्परिणाम झाला. त्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गैरसमजातून ग्राहक गायीच्या खुल्या दुधाला नकारघंटा देत असल्याने पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ‘लम्पी’संदर्भात सामाजिक माध्यमाद्वारे चुकीची माहिती पसरविली जात आहे.

- Advertisement -

या अफवांना बळी पडून ग्राहक गायीचे खुले दूध विकत घेत नाहीत. त्यामुळे विक्री न होणार्‍या दुधाचे करायचे काय, असा प्रश्न पशुपालकांपुढे निर्माण झाला आहे. अगोदरच जनावरांमधील ‘लम्पी’मुळे पशुपालक चिंतेत असताना आता अफवांमुळे दूध विक्री होत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लम्पी रोग हा जनावरांपासून माणसामध्ये संक्रमित होत नसल्याने मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. तसेच बाधित गायीचे दूधदेखील सुरक्षित असून दुधामुळे या आजाराचा संसर्ग होत नाही. दूध उकळून घेतल्यावर लम्पी आजाराचा विषाणू उच्च तापमानाला जिवंत राहत नाही. त्यामुळे या दुधापासून मानवाला कुठलाही त्रास होण्याची शक्यता नाही, असे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले.

परंतु शास्त्रीय सल्ल्यांकडे दुर्लक्ष करुन अफवांवर विश्वास ठेवणारा आपला समाज लम्पीची भीती वाढवण्याला कारणीभूत ठरत आहे. अर्थात लम्पीचा जन्म आताच झाला असे म्हणता येणार नाही. सध्याच्या लाटेपूर्वी, भारतात सप्टेंबर २०२० मध्ये लम्पीच्या केसेस दिसून आल्या होत्या. त्या वेळी महाराष्ट्रात विषाणूचा एक प्रकार आढळला होता. गेल्या काही वर्षांत गुजरातमध्येही या आजाराच्या घटना नोंदवल्या गेल्या. त्यावेळी आताइतक्या वेगाने प्रसार झाला नव्हता. ‘डब्ल्यूओएएच’नुसार, एलएसडी आफ्रिकन देशांमध्ये स्थानिक अर्थात एंडेमिक आहे. २०१२ पासून तो मध्य पूर्व, आग्नेय युरोप आणि पश्चिम, तसेच मध्य आशियात वेगाने पसरत आहे. २०१९ पासून अनेक आशियाई देशांमध्ये एलएसडीचा अनेकदा उद्रेक नोंदवला गेला आहे. पाकिस्तान तसेच पंजाबमध्येही त्याचा फटका बसलेला आहे.

- Advertisement -

खरे तर लम्पीविषयी अनेक गैरसमज आहेत. हा गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रील्पॉक्स या प्रवर्गात मोडतात. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षण म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या आजाराचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था या प्रयोगशाळे मार्फत केले जाते, याकरिता आजारी जनावरांचा उपचार करण्यापूर्वी प्रयोगशाळा तपासणी करिता नमुने घेणे आवश्यक आहे. या विषाणूचे शेळ्या मेढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानवाकडे संक्रमित होत नाही.

ह्या आजाराची देशी वंशाच्या जनावरापेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची जास्त शक्यता असते. संक्रमण झाल्यानंतर एक ते दोन आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो व त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतो. संक्रमित जनावरांचे विविध स्त्राव, डोळ्यातील पाणी, नाकातील स्त्राव, लाळ इत्यादींमधून, चारा व पाणी दूषित होऊन जनावरांना या आजाराची लागण होते. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोग याद्वारेही याची लागण होऊ शकते. तसेच या आजाराचा प्रसार बाह्यकीटकांद्वारे (डास, माशा, गोचीड इ.) होतो. त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३५ दिवस जिवंत राहतो.

या आजारावर केवळ रडत बसण्यापेक्षा तो रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोविडच्या बाबतीतही असेच झाले होते. परंतु एकीकडे आरोग्य यंत्रणा रुग्णांवरील उपचारांत व्यस्त होती, त्याच वेळी विविध संशोधन संस्थांमध्ये कोविड प्रतिबंधक लसींचा शोध घेतला जात होता. त्याच धर्तीवर आता लम्पी आजाराला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये जनावरांना यापूर्वी लम्पीची लागण झाली आहे, अशा जिल्ह्यांमध्ये रिंग लसीकरण करण्याचा सल्ला केंद्राने दिला आहे. इतर भागात या आजाराचा प्रसार होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना वेगळे करण्यासाठी गावपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे, तरच इतर जनावरांना या रोगापासून सुरक्षित ठेवता येईल.

या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जैवसुरक्षा, जनावरांच्या हालचालींचे नियमन आणि रिंग लसीकरण करण्याचे निर्देश केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत. यात आजारी जनावरांसाठी आयसोलेशन सुविधा निर्माण करण्यावर भर देणे, आजारी जनावरांसाठी हर्बल आणि होमिओपॅथिक औषधांचा वापर करण्यासदेखील प्रोत्साहन देण्यात आले आहे. आतापर्यंत लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लशीचे किमान ९७ लाख डोस दिले गेले आहेत. यापैकी सुमारे आठ लाख जनावरे विषाणू संसर्गातून बरी झाली आहेत. सरकारी प्रयत्न आणि पशुपालकांचे सहकार्य या दोन बाबीच लम्पीला रोखू शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -