घरसंपादकीयअग्रलेखवात्सल्यसिंधु आई गेली...

वात्सल्यसिंधु आई गेली…

Subscribe

 

प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधु आई
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी…
माधव ज्युलियन यांची ही कविता पडद्यावर जिवंत करणार्‍या सुलोचना लाटकर यांनी हिंदी आणि मराठी पडद्याला आदर्श आईपण बहाल केलं होतं. सुलोचना लाटकर यांना ‘दीदी’ असं जरी म्हटलं जात असलं तरी मराठी हिंदी चित्रपटांमध्ये वात्सल्यमूर्ती आई त्यांनी अजरामर करून ठेवली आहे. खरंच…हिंदी पडद्यावर हालअपेष्टा सहन करून नायक किंवा नायिकेला संघर्ष करून मोठं करणारी आई म्हणून ऐंशीच्या दशकात निरुपा रॉय या ओळखल्या जात, मात्र त्याही आधी सत्तरच्या दशकात प्रेमळ आई, वहिनी, सासू अशा कित्येक व्यक्तीरेखा आपल्या सहज अभिनयातून सुलोचना यांनी जिवंत केल्या. पडद्यावर त्यांनी साकारलेली ‘आई’ ही इतकी परिणामकारक होती की त्यांना इतर व्यक्तीरेखांमध्ये पाहणं प्रेक्षकांना रुचलं नाही. त्यामुळेच त्यांनी पडद्यावर कधीही नकारात्मक भूमिका साकारल्या नाहीत. पडद्यावरील त्यांनी साकारलेल्या आईची भूमिका ही प्रेक्षकांनीही ‘त्यांची’ ही पडद्यावरची ‘आदर्श आई’ म्हणून स्वीकारली होती. वर्ष होतं १९५९, ‘सांगत्ये ऐका’ प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुलोचना दीदींनी साकारलेली आईची भूमिका प्रेक्षकांच्या मनात इतकी रुजवली की, या मराठी चित्रपटाने हिंदी आणि मराठी पडद्याला एक ‘प्रेमळ’ आई बहाल केली होती. त्यानंतर सुलोचना दीदी असलेल्या या ‘आई’ने राजेश खन्ना, धमेंद्र, अमिताभ, देव आनंद अशा सत्तर ऐंशीच्या दशकातल्या सर्वच सुपरस्टार्सचे आईच्या मायेनं पडद्यावर संगोपन केलं. मुमताज, बबिता, जयश्री गडकर, सायरा बानो अशा अनेक अभिनेत्रींचं आईपण त्यांनी पडद्यावर स्वीकारलं. त्याला पुरेसा न्याय दिला. आई असावी तर सुलोचना यांच्यासारखीच…ही प्रेक्षक असलेल्या ‘लेकरांच्या’ मनातील आईची जागा मागील सात दशके कायम राहिली. ऐंशीच्या दशकातल्या अमिताभच्या पडद्यावरील मातोश्री निरुपा रॉय यांच्यापासून अगदी नव्वदच्या दशकात सलमान खानची आई झालेल्या रिमा लागूंपर्यंत पडद्यावरच्या मातांवर सुलोचना यांच्या ‘आई’पणाचा प्रभाव होता.
हिंदी पडद्यावर शिलाई मशीनवर लोकांचे कपडे शिवून हालअपेष्टा सहन करत संघर्ष करून मुलाला मोठं करणारी ‘आई’ हिंदी मराठी पडद्यावर सुलोचना यांनीच ‘एकटी’ चित्रपटातून दिली. शिलाई मशीनवर काम करून जिवंत राहणार्‍या आईचे एकटेपण सुलोचना यांनी अभिनयातून जिवंत केले. यानंतर शिलाई मशीन आणि संघर्ष करणारी पडद्यावरची आई असं समीकरण बनलं. त्या काळात शिलाई मशीन हेच मध्यमवर्गीय स्त्रीच्या हातातील आपला संसार सावरण्याचे एक जीवाभावाचे साधन असायचे. त्या मशीनच्या आधारे ती कुटुंबाचा डोलारा सांभाळत असे. अशा त्या मध्यमवर्गीय स्त्रीचे त्यांनी चित्रपटातून प्रतिनिधीत्व केले होते. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला ‘संपूर्ण रामायण’ रिलिज झाला. हा पौराणिक कथेवर आधारित सिनेमा होता. या चित्रपटात महाराणी कैकयीच्या मनात प्रभू रामचंद्रांविषयी विष पेरणारी मंथरा ललिता पवार यांनी साकारली तर सुलोचना या कैकयी झाल्या होत्या. कैकयी साकारण्यासाठी रामाविषयी असलेली ईर्ष्या, द्वेष सुलोचना यांनी व्यक्तीरेखेतून उभे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी साकारलेल्या माता कैकयीच्या भूमिकेतून ‘प्रेमळ आई’ त्यांना लपवता आली नाही. त्या चित्रपटानंतर इतकी ‘प्रेमळ’ कैकयी असू शकते का, असाही प्रश्न सिनेरसिकांनी उपस्थित केला होता. हिंदी पडद्यावर काहीशी नकारात्मक असलेली ही त्यांची एकमेव भूमिका असावी. सुलोचनाबाईंचे डोळे कमालीचे बोलके होते. मुंबई दूरदर्शनवर ‘बंदिनी’ मालिका ऐंशीच्या दशकात चालू होती. या बंदिनीच्या एका भागात प्राजक्त कुलकर्णी यांनी साकारलेल्या एका मनोरुग्ण मुलीच्या आईची व्यक्तीरेखा सुलोचना यांनी साकारली होती. या कथेत मनोरुग्णालयात पाठवल्या जाणार्‍या मुलीच्या आईची वेदना सुलोचना यांनी व्यक्त केली होती. अखेर ती आईदेखील मुलीच्या प्रेमासक्तीतून मनोरुग्ण बनते आणि मुलीसोबत रुग्णालयात दाखल होते. असे ते कथानक होते. यातील सुलोचना यांनी साकारलेली हतबल आई ही आजपर्यंत त्यांनी साकारलेल्या आईच्या व्यक्तीरेखेतील सर्वोच्च कलाकृती ठरावी.
उदाहरणादाखल अमिताभचा ‘मजबूर’ आठवावा. मजबूरमध्ये ब्रेन ट्युमरमुळे गुन्हेगार झालेल्या तरुण मुलाची वेदना समजून घेताना साकारलेली आई आठवावी. मधूर आवाज, सोज्ज्वळ चेहरा,घरंदाजपणा, बोलके डोळे लाभलेल्या सुलोचना यांनी मराठी आणि हिंदी पडद्यावर भारतीय स्त्रीमधील सकारात्मक गुणांचे सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अनेक हिंदी, मराठी चित्रपट तयार करण्यात आले. त्यात त्यांनी माता जिजाऊंची भूमिका केली. ‘मराठा तितुका मेळवावा’ हा चित्रपट मराठीत मैलाचा दगड ठरला. सुलोचना दीदींनी 250 हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटातून अभियानाची छाप पाडली. ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट तुफान गाजले, तर ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे चित्रपट अजरामर ठरले. हिंदीमध्ये पृथ्वीराज कपूर, नाजिर हुसैन, अशोक कुमार या दिग्गज अभिनेत्यांसोबतही त्यांनी काम केले. चित्रपटांचा प्रभाव हा जनमनावर खूप मोठा असतो, त्यामुळे लोकांच्या मनात एखादी आदर्श प्रतिमा तयार झाली की, मग अन्य भूमिकेत त्यांना लोक पाहू इच्छित नाहीत. आई मुलांना जन्म देते, पण सुलोचना दीदी या आईची भूमिका साकारण्यासाठीच जन्माला आल्या होत्या. सर्वांची आई बनून आदराचे स्थान निर्माण करणार्‍या सुलोचना दीदींना आपलं महानगरची भावपूर्ण श्रद्धांजली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -