घरसंपादकीयअग्रलेखस्वातंत्र्याचा अमृतानुभव!

स्वातंत्र्याचा अमृतानुभव!

Subscribe

ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आजची पिढी स्वातंत्र्याचा मुक्तपणे आनंद घेत आहे, पण हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आणि वीरांगणांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला आहे. काहींचा त्यात मृत्यू झाला. अनेकांचे सगळे तारुण्य स्वातंत्र्यलढ्यात खर्ची पडले. त्यांना स्वत:चा घरसंसार उभारता आला नाही. उलट त्यांच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ आली. अनेक जण फासावर गेले. देशप्रेमाने भारावून गेलेल्या या सगळ्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्यातूनच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळेच प्रत्येक वर्षी स्वांतत्र्य दिन साजरा करताना आपण या सगळ्यांचा त्याग आणि बलिदानाचे स्मरण करत असतो. गेल्या 75 वर्षांच्या स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा विचार केला तर असे दिसले की भारताने विविध क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अनेक भारतीय लोक जागतिक पातळीवर नावारूपाला आले आहेत. हे असले तरी अजून बरेच काही आपल्याला करायचे आहे. भारताची लोकसंख्या सध्या जगात दुसर्‍या क्रमांकाची आहे. लोकसंख्या मोठी असल्यामुळे विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचून अंत्योदय होण्यासाठी अजून जोरकसपणे आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. शासकीय पातळीवरून देशाच्या विकासासाठी प्रयत्न होत असताना वैयक्तिक पातळीवर नागरिक म्हणून देशाविषयी जे आपले कर्तव्य आहे, त्याचे आपल्याला विस्मरण होता कामा नये. प्रत्येकाला राज्यघटनेने दिलेले हक्क हवे असतात, पण जेव्हा घटनेने नागरिक म्हणून ज्या आपल्याला जबाबदार्‍या दिलेल्या आहेत, त्या पार पाडताना कुचराई होताना दिसते. शासकीय पातळीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत स्वच्छ भारत अभियान सुरू केले. गेल्या 75 वर्षांचा आपण आढावा घेतला तर नागरिक म्हणून स्वच्छतेच्या बाबतीत आपण किती गंभीर आहोत ते आपल्याला कळेल. आपल्याकडचे लोक जेव्हा विदेशात पर्यटनासाठी जाऊन येतात, तेव्हा तिथल्या स्वच्छतेचे गोडवे गातात, पण हीच मंडळी विदेशात असताना जसे स्वच्छतेचे नियम पाळतात, तसे ते आपल्या देशात आल्यावर पाळत नाहीत. ही बाब अगदी सर्वसामान्य वाटत असली तरी त्यामुळे जागतिक पातळीवर मोठा फरक पडत असतो.

रस्त्यावर थुंकणार्‍यांकडून महापालिकेला काही कोटी रुपयांचे दंड स्वरूपात उत्पन्न मिळत असते ही काही भूषणावह बाब नाही. पोलीस नसतील तर रस्त्यावरील सिग्नल वाहनचालक बरेचदा अगदी सहजपणे तोडत असतात. आपण काही चूक करत आहोत, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत आहोत असे त्यांना वाटत नाही. इतकेच नव्हे तर अलीकडे सिग्नलवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असूनही अनेक जण बिनदिक्कतपणे सिग्नल तोडत असतात. अशी बरीच उदाहरणे देता येतील, जिथे नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडण्यात आपण कमी पडलो आहोत हे लक्षात येईल. पुढील काळात आपल्याला यात सुधारणा करावी लागेल. एका बाजूला आपल्याला असे दिसेल की काही कोटी रुपये किमतीच्या आलिशान गाड्या असलेले लोक रस्त्यावरून जात असतात, पण त्याच वेळी सिग्नलवर गरीब लहान मुले दर १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी आणि २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी झेंडे विकताना दिसतात. मागील अनेक वर्षे आपण हेच चित्र पाहत आलो आहोत. हे चित्र बदलण्याची गरज आहे. कारण आपल्या देशात एका बाजूला अतिश्रीमंत वर्ग आहे, तर दुसर्‍या बाजूला अतिगरीब असा वर्ग आहे. आता विषय आहे या दोन्हींमधील दरी कशी कमी करायची? अमेरिकेचे 16वे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना एकदा विचारण्यात आले होते की, तुम्ही तुमच्या देशातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कशी भरून काढाल. त्यावेळी ते म्हणाले की, गरिबांची आर्थिक पातळी उंचावून मी त्या दोघांमधील दरी भरून काढेन. आपल्याला आज याच गोष्टीची गरज आहे. गेल्या 75 वर्षांच्या स्वतंत्र भारताच्या वाटचालीचा विचार केला तर एक गोष्ट आपल्याला दिसेल ती म्हणजे आपल्या देशात लोकशाही आबाधित आहे. कारण भारतासोबत स्वतंत्र झालेल्या बर्‍यात देशांना लोकशाही टिकवता आली नाही. आपल्या देशाची वाटचाल जशी पुढे होईल, तशी लोकशाही अधिक मजबूत होत जाईल, अशी अनेक विचारवंतांची अपेक्षा होती. आज आपल्याकडे लोकशाही आहे, पण राजकीय पक्षांमधील जी सत्तास्पर्धा आहे ती पाहिल्यावर हे सर्व देश आणि समाज यांच्या विकासासाठी चालले आहे की आपल्या पक्षाला आणि स्वत:ला सत्ता मिळविण्यासाठी चालले आहे तेच कळेनासे होते.

- Advertisement -

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात प्रत्येक क्षेत्रातील लोकांमध्ये एक भारावलेपण होते. देशाच्या उभारणीसाठी काही करण्याची नवी उमेद होती. महात्मा गांधीजी म्हणाले होते की, देशासाठी तुम्ही काय करता याचा विचार करा. हा विचार आदर्श ठेवून राजकारणातील नेते कार्य करत होते, पण अलीकडच्या काळात पाहिले तर असे दिसेल की राजकारण हा समाजसेवेपेक्षा एक धंदा होऊन बसला आहे. सत्ता मिळवण्यासाठी विविध पक्षांची जी संख्यात्मक वाढ झालेली आहे ते पाहिल्यावर देशात नवी वतनदारी फोफावलेली दिसत आहे. या वतनदार मंडळींना व्यापक देशहितापेक्षा आपली वतने टिकवून ठेवणे जास्त महत्त्वाचे वाटत आहे. त्यातूनच सर्वांगीण आणि सर्वांची प्रगती साध्य करणे बाजूला राहून विकासाची गती खुंटताना दिसत आहे. प्रत्येक नेत्याला माझ्याच पक्षाच्या कोंबड्याने समाजाच्या विकासाची पहाट उगवेल असे वाटत असल्यामुळे नेते मंडळी एकमेकांना समजून घेताना दिसत नाही. गेल्या 75 वर्षांत आपल्या देशातील उच्च शिक्षण संस्थांमधून शिकून अनेक उच्चशिक्षित लोक बाहेरच्या देशात निघून गेले. त्यांनी त्या देशांच्या अर्थव्यवस्था अधिक श्रीमंत केल्या. आपल्या देशात आम्हाला मोठी संधी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार असते. जगातील कुठल्याही प्रगत देशाकडे पाहिले तर तो विकास त्या देशातील तरुणांनी केलेला दिसतो. त्यामुळे इथल्या शिक्षणसंस्थांमधून शिक्षण घेऊन बाहेरच्या देशात गेल्यावर तिथे बसून भारताविषयी आणि येथील व्यवस्थेवर ताशेरे आढणार्‍या तरुणाईने हा विचार करावा की या देशाला जे स्वातंत्र्य मिळाले हे त्यावेळच्या तरुणांच्या त्यागाने आणि बलिदानाने मिळाले आहे, पळपुटेपणामुळे नाही. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना विशेषत: या देशातील तरुणांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या त्या तरुणाईची जरूर आठवण ठेवावी. तरच खर्‍या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृतानुभव सर्व स्तरातील भारतीयांना येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -