स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक योगी अरविंद घोष

dinvishesh

अरविंद घोष हे आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, स्वातंत्र्यवीर, योगी व कवी होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कोलकाता येथे एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. वडील कृष्णधनबाबू हे प्रख्यात डॉक्टर होते. मुलांना संपूर्णपणे पाश्चात्त्य धर्तीवर शिक्षण द्यावे म्हणून त्यांनी अरविंदांना वयाच्या सातव्या वर्षीच इंग्लंडला पाठविले. अरविंद हे असामान्य बुद्धीचे विद्यार्थी होते. तेथील परीक्षांत त्यांनी अनेक बक्षिसे मिळविली. लॅटिन, ग्रीक, इंग्रजी या भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन या भाषाही ते तेथे शिकले. भारतात आल्यावर त्यांनी बंगाली, गुजराती, मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला. केंब्रिजला असताना ते तेथील ‘इंडियन मजलिस’ चे सचिव होते आणि त्यांनी मजलिसमध्ये क्रांतिकारक भाषणे करून भारताने सशस्त्र उठाव करूनच स्वातंत्र्य मिळवावे, असे प्रतिपादन केले. इंग्रज सरकारची नोकरी न करण्याचा निर्णय घेऊन ते १८९३ मध्ये भारतात परतले व बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले.

बडोदा महाविद्यालयात प्रथम ते फ्रेंच आणि इंग्रजीचे प्राध्यापक, नंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व नंतर प्राचार्य होते. बडोद्याच्या वास्तव्यात त्यांनी पुढील कार्याची साधना केली. योगसाधनाही ते करीत होतेच. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून ते इंग्रजीत कविता, नाटके व निबंध लिहू लागले. देश स्वतंत्र झाला पाहिजे, सशस्त्र क्रांतीनेच स्वातंत्र्य मिळेल, भारताचा पुनर्जन्म झाला पाहिजे, असे प्रतिपादन ते करीत. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे अरविंदबाबू एक प्रवर्तक होते. ते जहालमतवादी होते. वंगभंगाच्या वेळी ते कोलकात्याला गेले व तेथे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. कोलकाता काँग्रेसच्या अधिवेशनात (१९०६) त्यांनी ‘भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य’ या ध्येयाची घोषणा करून लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पक्षाची उभारणी करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. अशा या महान क्रांतिकारकाचे ५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले.