घरसंपादकीयअग्रलेखगिरे तो भी टांग उपर

गिरे तो भी टांग उपर

Subscribe

‘आत्मनिर्भर’तेचा पुरस्कार करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा तयार करणार्‍या भारताचे लक्ष्य येत्या दोन वर्षांत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे आहे. याद्वारे भारतीय अर्थव्यवस्था जगात तिसर्‍या क्रमांकाची होईल. यासाठी ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप’ यासारखे उपक्रम मोदी सरकारने राबविले आणि त्याला बर्‍यापैकी यशही आले आहे, तर दुसरीकडे १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उदयाला आलेल्या पाकिस्तानची हालत दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्या १९९४ साली झळकलेल्या ‘क्रांतिवीर’ चित्रपटातील एक डायलॉग हिट झाला होता. ‘यह बिस्कुट जैसा हमारा पडोसी मुल्क आनेवाले कल में शायद खुद को दुनिया के नक्शे में ना देख पायेगा… एक बात भूल रहा है, उनके घर में जो रोटी बनती है ना उसका आटा भी विदेशी चक्की से आता है…’ आज जवळपास ३० वर्षांनी तशीच काहीशी स्थिती पाकिस्तानची झाली आहे. पाकिस्तानमध्ये सध्या गव्हाची प्रचंड टंचाई आहे.

गव्हाच्या पिठाचे भाव इतके वाढले आहेत की ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. कराचीमध्ये सध्या एक किलो गव्हाचे पीठ १४० ते १६० रुपये किलो दराने मिळत आहे. विदेशी गंगाजळी आटल्याने पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. जशी आर्थिक मदत मिळेल तशी पाकिस्तानला हवी आहे. त्यासाठी पाकिस्तानने परदेशातील दूतावासाची मालमत्ताही विकायला काढली आहे. गेल्यावर्षी श्रीलंकेतही परकीय चलन संपल्याने आणीबाणी जाहीर करावी लागली होती. कोरोना काळाचा फटका बसल्याने या देशावर तशी स्थिती झाली होती. शेजारधर्म पाळत भारत खंबीरपणे श्रीलंकेच्या पाठीशी उभा होता आणि आताही आहे. हे ध्यानी घेऊन पाकिस्तानलाही भारताकडून तशी अपेक्षा आहे, मात्र आतापर्यंत भारताविरुद्ध प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पुकारलेल्या युद्धामुळे मदत मागायची तरी कशी, अशी अवघड स्थिती पाकिस्तानची झाली आहे. यासाठीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा सूर नरमाईचा झाला आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. आपापसातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तयार आहोत. एकत्र बसून चर्चा करूया, असा संदेश मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊ इच्छितो. आमचे स्रोत बॉम्ब आणि दारुगोळा बनवण्यात खर्च होऊ नये, असे पाकिस्तानला वाटते. आम्ही भारताबरोबर तीन युद्ध लढलो, पण प्रत्येक वेळी पदरी दारिद्य्र आणि बेरोजगारीच आली आहे. आम्ही यातून धडा शिकलो आहोत आणि आता आम्हाला शांतता हवी आहे, असे सांगत शाहबाज शरीफ यांनी पांढरे निशाण फडकावले आहे. मुळात १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला अक्षरश: गुडघ्यावर बसवले होते. या ऐतिहासिक घटनेला जवळपास ५१ वर्षे झाली आहेत, पण इतक्या वर्षांत केवळ शाहबाज यांनाच उपरती झाल्याचे दिसते.

आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केवळ मुजोरीच दाखवली आहे. भारताने १९९८ मध्ये पोखरण अणूचाचणी केल्यानंतर लागलीच पाकिस्ताननेही अणूचाचणी केल्याचे जाहीर केले. भारत अण्वस्त्रधारी देश झाल्यावर आपणही अण्वस्त्रधारी असल्याचे सांगत पाकिस्तानने भारताला धमक्या दिल्या. कोणतेही संयुक्तिक कारण नसताना अण्वस्त्र बाळगणारा पाकिस्तान जगातला सर्वात धोकादायक देश असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अलीकडेच म्हटले आहे. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह भारतभरात अतिरेकी कारवाया घडवून छुपे युद्ध सुरू ठेवले. कारगिलमध्ये घुसखोरी केली. तिथेही आपल्या जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानी सैन्याला तेथून पिटाळून लावले. यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली. एवढे असतानाही, पाकिस्तानने सीमेवर वरचेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू ठेवला. अशा एक ना अनेक कागाळ्या पाकिस्तानने सुरू ठेवल्या. तेव्हा पाकिस्तानने तीन युद्धांपासून काही धडा घेतल्याचे जाणवले नाही.

- Advertisement -

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भारताच्या विदेशनीतीत आमूलाग्र बदल झाला. त्याचाच परिणाम म्हणून आतंरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तान एकटा पडल्याचे चित्र आहे. त्याच्याबरोबर चीन जरी दिसत असला तरी, तो त्याच्यासोबत का आहे, हे पाकिस्तानसह सर्व जगाला ठाऊक आहे. ओआयसी अर्थात ऑर्गेनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन या संघटनेच्या जोरावरही पाकिस्तानने या आधी फुशारक्या मारल्या होत्या, मात्र या संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनीही पाकिस्तानला लांबच ठेवले आहे. इतकेच काय, अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानी सरकार आल्यानंतर पाकिस्तानलाच आनंद झाला होता, पण त्या तालिबाननेही आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करताना पाकिस्तानला झटकले आहे.

अलीकडेच तालिबानचे ज्येष्ठ नेते आणि अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी, १९७१ सारख्याच लाजीरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा पाकिस्तानला दिला आहे. पाकिस्तानचा मूळ स्वभाव लक्षात घेता भारतानेदेखील शरीफ यांच्या भूमिकेला कोणताही प्रतिसाद दिला नाही. कारण पंतप्रधान शाहबाज शरीफ असे काही सांगत असले तरी, पाकिस्तानी सत्तेच्या नाड्या या तेथील सैन्याच्या हातीच असतात. याचा प्रत्यय पंतप्रधानांच्या मुलाखतीनंतर लगेचच आला. काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू केल्यानंतर चर्चा केली जाईल, असे सांगत तेथील पंतप्रधान कार्यालयाने शरीफ यांच्या वक्तव्यालाच छेद दिला आहे. एकीकडे, पाकिस्तानचे पंतप्रधान पुन्हा एकदा भारतासमोर गुडघे टेकायच्या तयारीत असताना पडद्यामागील लष्करी सूत्रधारांची मुजोरी मात्र कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -