घरसंपादकीयदिन विशेषप्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक व्ही. शांताराम

प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक व्ही. शांताराम

Subscribe

व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट व पटकथाकार होते. त्यांचे संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते व कुटुंबाची आर्थिक स्थिती यथातथाच होती. त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी अल्प वेतनावर नोकरी केली. अशा प्रतिकूल काळातच ते दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, बालगंधर्वांची नाटके, भारतीय व पाश्चात्त्य संगीत अशा कलाक्षेत्रांकडे आकर्षित झाले आणि परिश्रम, कल्पकता व स्वयंप्रेरणा यांच्या बळावर शिकत जाऊन श्रेष्ठ दिग्दर्शक बनले. १९१४ साली त्यांनी बालगंधर्वांच्या ‘गंधर्व नाटक मंडळी’त नट म्हणून प्रवेश केला. नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्ये (स्पेशल इफेक्ट्स) अशा प्रत्येक शाखेतील बारकावे त्यांनी तेथे अभ्यासले. महाराष्ट्र फिल्म कंपनीने त्या काळात अनेक मूकपट काढले. त्यांपैकी ‘सुरेखाहरण’ (१९२१) या पौराणिक मूकपटातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला.

१९२९ मध्ये कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली. या कंपनीने व्ही. शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली ‘गोपाळकृष्ण’ (१९२९), ‘खुनी खंजर’ (१९३०), ‘रानीसाहिबा’ (१९३०), ‘उदयकाल’ (१९३०), ‘जुलूम’ (१९३१), ‘चंद्रसेना’ (१९३१) इत्यादी पौराणिक व देमार (स्टंट) मूकपट निर्माण केले. १९३२ साली ‘अयोध्येचा राजा’ हा मराठी (हिंदी अयोध्या का राजा) पहिला बोलपट निर्माण करण्यात आला. शांताराम दिग्दर्शित ‘चंद्रसेना’ हा पौराणिक चित्रपट (१९३५) मराठी, हिंदी, तमिळ अशा तीन भाषांत होता. ‘अपना देश’ (हिंदी, १९४९; तेलुगूमध्ये नमनाडू), ‘दहेज’ (हिंदी, १९५०), ‘अमर भूपाळी’ (मराठी, १९५१), ‘परछाई’ (हिंदी, १९५२), ‘तीन बत्ती चार रास्ता’ (हिंदी, १९५३), सुबह का तारा (हिंदी, १९५३), सुरंग (१९५३), झनक झनक पायल बाजे (हिंदी, १९५५), हे काही उल्लेखनीय चित्रपट शांताराम यांनी दिग्दर्शित केले. अशा या प्रतिभावंत दिग्दर्शकाचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -