घरसंपादकीयदिन विशेषप्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई

प्रसिद्ध साहित्यिक रणजित देसाई

Subscribe

रणजित देसाई यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२८ रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाला. रणजित देसाई हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबर्‍या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ‘श्रीमान योगी’ आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील ‘स्वामी’ या कादंबर्‍यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना ‘स्वामी’कार या नावानेही ओळखले जाते. मराठीत ऐतिहासिक कादंबरी लेखनाची मोठी परंपरा आहे. रणजित देसाई हे या नामावलीतील फार वरचे नाव. छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांची ‘श्रीमान योगी’ ही मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरी गणली जाते.

याशिवाय देसाईंची ‘पावनखिंड’ ही आणखी एक ऐतिहासिक कादंबरी. त्यांची ‘राधेय’ ही कर्णावरची कादंबरीही लोकप्रिय आहे. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. ‘सवाल माझा ऐका’, ‘रंगल्या रात्री’ या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या. ‘बारी’, ‘माझे गाव’, ‘स्वामी’, ‘श्रीमान योगी’, ‘राधेय’, ‘लक्ष्यवेध’, ‘समिधा’, ‘पावन खिंड’, ‘राजा रविवर्मा’, ‘अभोगी’, ‘प्रतीक्षा’, ‘शेकरा’ या कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. ‘रूप महाल’, ‘मधुमती’, ‘जल कालवा’, ‘गंधाली’, ‘अलख’, ‘मोरपंखी सावल्या’, ‘कातळ’, ‘बाबुलमोरा’, ‘संकेत’, ‘प्रपात’, ‘मेघा’, ‘वैशाखी’, ‘आषाढ’ हे कथासंग्रह त्यांनी लिहिले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे ‘कांचनमृग’, ‘धन अपुरे’, ‘पंख झाले वैरी’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘गरूडझेप’,‘रामशास्त्री’, ‘श्रीमानयोगी’, ‘स्वामी’, ‘पांगुळवाडा’,‘लोकनायक’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘तुझी वाट वेगळी’, ‘सावली उन्हाची’ इत्यादी नाटकेही त्यांनी लिहिली. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. १९७३ मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या ‘स्वामी’ या कादंबरीला महाराष्ट्र राज्य पुरस्कार, हरि नारायण आपटे पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. १९९० मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत केले. अशा या महान लेखकाचे ६ मार्च १९९२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -