घरसंपादकीयदिन विशेषप्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई

प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई

Subscribe

रणजित देसाई यांचा आज स्मृतिदिन. रणजित देसाई हे प्रसिद्ध कादंबरीकार, कथालेखक, नाटककार होते. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२८ रोजी कोल्हापूरच्या कोवाड याठिकाणी झाला. इंग्रजी शाळेत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कोल्हापूरच्या ‘महाद्वार’ मधून त्यांनी कथालेखन करायला सुरुवात केली. इंटर नापास असलेल्या देसाई यांनी १९४७ मध्ये प्रसाद मासिकाने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत ‘भैरव’ ही कथा लिहिली. त्यांच्या या कथेला पारितोषिक मिळाले.

या पारितोषिकामुळे त्यांच्या कथालेखनाला प्रोत्साहन मिळाले. ‘रुपमहाल’ (१९५२), ‘कणव’ (१९६०), ‘जाण’ (१९६२), ‘कातळ’ (१९६५), ‘गंधाली’ (१९७१), ‘कमोदिनी’ (१९७८), ‘आलेख’ (१९७९), ‘मधुमती’ (१९८२), ‘मोरपंखी सावल्या’ (१९८४) असे अनेक लोकप्रिय कथासंग्रह त्यांनी लिहिले. सामाजिक आशयाच्या ग्रामीण परिवेशातील त्यांच्या कथांमधून त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ठ्ये जाणवतात. खेडुतांच्या जीवनाचा चांगुलपणा मांडणार्‍या आकर्षक शैलीतील कथा त्यांनी लिहिल्या. ‘बारी’, ‘माझा गाव’, या प्रारंभीच्या कादंबर्‍यांनंतर १९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर त्यांनी ‘स्वामी’ ही कादंबरी लिहिली.

- Advertisement -

या कादंबरीने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यानंतरच्या ‘श्रीमान योगी’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर लिहिलेल्या कादंबरीने त्यांची कादंबरीकार म्हणून असलेली लोकप्रियता अधिकच वाढली. ‘लक्ष्यवेध’ (१९८०), ‘पावनखिंड’ (१९८०), कर्णाच्या जीवनावरील ‘राधेय’ (१९८६), ‘राजा रविवर्मा’ (१९८६) अशा अनेक ऐतिहासिक, पौराणिक कादंबर्‍या लिहून त्यांनी या प्रकारच्या कादंबर्‍यांचे युग स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण केले. ‘गरुडझेप’, ‘रामशास्त्री’, ‘स्वरसम्राट तानसेन’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘कांचनमृग’, ‘धन अपुरे’, ‘वारसा’, ‘स्वामी’, आदी नाटकेही त्यांनी लिहिली. अशा या थोर साहित्यिकाचे ६ मार्च १९९२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -