घरसंपादकीयदिन विशेषसमाजवादी नेते नानासाहेब गोरे

समाजवादी नेते नानासाहेब गोरे

Subscribe

नारायण गणेश गोरे उर्फ नानासाहेब गोरे हे स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, लेखक, वक्ते आणि विचारवंत होते. त्यांचा जन्म १५ जून १९०७ रोजी रत्नागिरीतील हिंदळे या गावी झाला. त्यांचे शिक्षण पुणे येथे बी.ए. एल.एल.बी. पर्यंत झाले. पुणे येथील पर्वती मंदिर अस्पृश्यता निवारण सत्याग्रहापासून त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. १९३० मध्ये महाराष्ट्र यूथ लीगचे ते चिटणीस झाले. १९३६-३९ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी नानासाहेब हे एक होत.

१९४८-५३ मध्ये समाजवादी पक्षाचे ते सहचिटणीस होते. पुढे १९५७-६२ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे प्रजासमाजवादी पक्षाचे ते खासदार होते. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पोर्तुगीज सत्तेपासून गोवा मुक्त करण्यासाठी १९५५ मध्ये झालेल्या गोवा विमोचन सत्याग्रहाचा त्यांनी प्रारंभ केला. त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती, परंतु १९५७ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.

- Advertisement -

नानासाहेबांनी बरेच लेखनही केले आहे. ‘समाजवादाचा ओनामा’ (१९३५) हे त्यांचे पहिले पुस्तक. तुरुंगात असताना फेब्रुवारी ते डिसेंबर १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी ‘कारागृहाच्या भिंती’ या नावाने १९४५ मध्ये प्रसिद्ध झाली. ‘डाली’ (१९५६) हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह. ‘शंख आणि शिंपले’ (१९५७) मध्ये त्यांच्या आठवणी आहेत. ‘सीतेचे पोहे’(१९५३) आणि ‘गुलबशी’ (१९६२) मध्ये त्यांच्या कथा संग्रहित केलेल्या आहेत. अशा या थोर समाजवादी नेत्याचे १ मे १९९३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -