Eco friendly bappa Competition
घर संपादकीय ओपेड अ‍ॅपल इन द सिटी!

अ‍ॅपल इन द सिटी!

Subscribe

मुंबईत अ‍ॅपलच्या पहिल्या ऑफलाइन रिटेल स्टोअरचं मंगळवारी वांद्रे-कुर्ला संकुला (बीकेसी)तील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये मोठ्या उत्साहात ओपनिंग करण्यात आलं, तर पाठोपाठ आज दिल्लीतील साकेत परिसरात अ‍ॅपलचं दुसरं स्टोअर सुरू होत आहे. खरं तर मागील 25 वर्षांपासून अ‍ॅपल आपल्या ऑथोराइज प्रीमियम रिसेलर्सच्या माध्यमातून भारतात आयफोन, मॅकबुक, आयपॅड असे वेगवेगळे गॅजेट्स विकत आहे. मग तुम्ही म्हणाल की त्यांचं एक स्टोअर लॉन्च होणं यात कुठली मोठी गोष्ट आलीय. मोठी गोष्ट ही आहे की जेव्हा अ‍ॅपल कुठल्याही देशात स्वत:चं रिटेल स्टोअर सुरू करते, त्याचा अर्थ असा निघतो की अ‍ॅपल त्या देशाला, त्या संपूर्ण रिजनला मोठ्या स्ट्रॅटर्जिक आणि भविष्यकालीन योजना आखण्याच्या नजरेतून बघत आहे. झपाट्याने वाढत असलेली स्मार्टफोन बाजारपेठ आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून अ‍ॅपल भारताकडे खूपच गांभीर्याने बघत आहे. नवीन गॅजेट्स उत्पादनात भारताचा वाढता सहभाग आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने अ‍ॅपलची गुंतवणूक तरुण पिढीसाठी फायद्याची ठरू शकते.

मुंबईत अ‍ॅपलच्या पहिल्या ऑफलाइन रिटेल स्टोअरचं मंगळवार 18 एप्रिल 2023 रोजी वांद्रे-कुर्ला संकुला (बीकेसी)तील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये मोठ्या उत्साहात ओपनिंग करण्यात आलं, तर पाठोपाठ बुधवार 20 एप्रिलला दिल्लीतील साकेत परिसरात अ‍ॅपलच्या दुसर्‍या रिटेल स्टोअरचं ओपनिंग होत आहे. अ‍ॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टीम कूक या स्टोअर ओपनिंगसाठी स्वत: भारतात आलेत. त्यांच्याच हस्ते मुंबईतील स्टोअरचं ओपनिंग करण्यात आलं हे विशेष. हे स्टोअर केवळ मुंबईतील नव्हे, तर भारतातील पहिलं वहिलं स्टोअर ठरलं आहे. अ‍ॅपलचे शेकडो लॉयल कस्टमर्स स्टोअर ओपनिंग सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तसंच टीम कूक यांना व्यक्तिश: भेटण्यासाठी सकाळपासूनच रांगेत उभे होते. ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत हे स्टोअर सुरू करण्यात आलं.

तेव्हा अनेकांना टीम कूक यांना भेटण्याची, त्यांच्यासोबत दोन शब्द बोलण्याची आणि सेल्फी काढण्याची संधीदेखील मिळाली. यानंतर दिवसभर अ‍ॅपल लव्हर्सनी या स्टोअरमधील वातावरणासोबतच अ‍ॅपलच्या गॅजेट्सना हाताळण्याचा सुखद अनुभव घेतला. इथं आलेल्यांपैकी अनेकांना हा दिवस इतिहासात नोंदवून ठेवण्याइतपत महत्त्वाचा वाटला. खरं तर मागील 25 वर्षांपासून अ‍ॅपल आपल्या ऑथोराइज प्रीमियम रिसेलर्सच्या माध्यमातून भारतात आयफोन, मॅकबुक, आयपॅड असे वेगवेगळे गॅजेट्स विकत आहे. मग तुम्ही म्हणाल की त्यांचं एक स्टोअर लॉन्च होणं यात कुठली मोठी गोष्ट आलीय. मोठी गोष्ट ही आहे की जेव्हा अ‍ॅपल कुठल्याही देशात स्वत:चं रिटेल स्टोअर सुरू करते, त्याचा अर्थ असा निघतो की अ‍ॅपल त्या देशाला, त्या संपूर्ण रिजनला मोठ्या स्ट्रॅटर्जिक आणि भविष्यकालीन योजना आखण्याच्या नजरेतून बघत आहे. झपाट्याने वाढत असलेली स्मार्टफोन बाजारपेठ आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून अ‍ॅपल भारताकडे खूपच गांभीर्याने बघत आहे. नवीन गॅजेट्स उत्पादनात भारताचा वाढता सहभाग आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने अ‍ॅपलची गुंतवणूक तरुण पिढीसाठी फायद्याची ठरू शकते.

- Advertisement -

तंत्रज्ञान क्षेत्रात अ‍ॅपलचं एक वेगळंच स्थान आहे. अ‍ॅपलच्या प्रत्येक उत्पादनांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन दिसतो. अगदी अ‍ॅपलच्या लोगोमधलं अर्ध सफरचंद असो किंवा अ‍ॅपलच्या कोणत्याही लॉन्च इव्हेंटमधलं वेगळेपण. एका गॅरेजमध्ये सुरू झालेल्या कंपनीचा आज प्रचंड विस्तार झालेला आहे. या सगळ्यात अ‍ॅपलचे फाऊंडर स्टीव्ह जॉब्स यांचा खूप मोठा वाटा आहे. स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर कंपनीने काही नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केली खरी, परंतु प्रामुख्याने कंपनीचा भर हा इनोव्हेशनपेक्षा अपग्रेडेशनवरच अधिक राहिला आहे. सध्या अ‍ॅपलची धुरा स्टीव्ह जॉब्स यांचे एकेकाळचे सहकारी टीम कूक सांभाळत आहेत.

टीम कूकही स्टीव्ह जॉब्स यांच्या हाताखालीच तावून सुलाखून निघालेत, परंतु त्यांचा कल हा प्रसंगी बाजारपेठेचा विरोध झेलून नावीन्यपूर्ण आणि कल्पक उत्पादने बाजारात उतरवण्यापेक्षा जागतिक बाजारपेठेचा कब्जा घेणे आणि अ‍ॅपल प्रॉडक्ट्सचा लॉयल कस्टमरबेस वाढवणे याकडे अधिक आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली आयफोन, आयमॅक-मॅकबुक, आयपॅड, अ‍ॅपल वॉच, आयपॉडसारख्या प्रॉडक्टचे दरवर्षी बाजारपेठेत दाखल होणारे नवीन व्हर्जन्स कमालिचे लोकप्रिय ठरत असून या प्रॉडक्ट्सनी खपाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत. गेल्या वर्षभरात अ‍ॅपलच्या शेअर्सच्या बाजारमूल्यात प्रचंड वाढ झाली. भारताने अलीकडेच 3 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचा बहुमान मिळवला, परंतु अ‍ॅपलचं बाजारमूल्य हे 3 ट्रिलियनच्या पलीकडे केव्हाच गेलं आहे. हा आकडा भारतासह १९८ देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. एवढा मोठा आकडा गाठणारी अ‍ॅपल ही जगातील पहिलीच कंपनी ठरली आहे. याचं सारं श्रेय टीम कूक यांनाच दिलं जातं.

- Advertisement -

मुंबईच्या बीकेसी आणि दिल्लीतील साकेतच्या स्टोअर ओपनिंगसाठी टीम कूक यांनी स्वत: भारतात दाखल होणं ही तंत्रज्ञान जगतात मोठी बाब समजली जात आहे. कूक यांनी मुंबईत दाखल होताच सर्वात आधी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची भेट घेतली. पाठोपाठ टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांची भेट घेतली. दिल्लीतील स्टोअरचं उद्घाटन करण्याआधी टीम कूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचीही भेट घेतली. उद्योग विस्तार आणि गुंतवणूक हाच टीम कूक यांच्या भारतभेटीतील महत्त्वाचा अजेंडा असल्याचा सहजसोपा अर्थ आपल्याला यातून काढता येईल.

अ‍ॅपलचे सर्वच प्रॉडक्ट्स हे अल्ट्रा प्रीमियम कॅटेगरीत मोडतात. रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर अफाट खर्च आणि उच्च दर्जाचं निर्मितीमूल्य हे कारण त्यासाठी दिलं जातं. अ‍ॅपलचं प्रॉडक्ट हातात घेतल्यावर त्याचा टच अँड फिल त्याच्या दर्जाबाबत बरंच काही सांगून जातो. अ‍ॅपलच्या लाइनअपमधील सर्वात स्वस्त फोनही 50 ते 60 हजारांच्या घरात जातो. आयपॅड, अ‍ॅपल वॉचच्या किमतीही साधारणपणे 70 ते 80 हजारांच्या घरात जातात, तर आयफोन प्रो, मॅकबुक-आयमॅकच्या किमती लाखोंच्या पुढंच आहेत, तर एका सर्वसामान्य भारतीयाचा सरासरी पगार अ‍ॅपलच्या एका प्रॉडक्टच्या निम्म्याहून निम्मा असेल, अशा परिस्थितीत अ‍ॅपलचे महागडे प्रॉडक्ट घेणार कोण? असा प्रश्न उतरतोच, परंतु भारतीय बाजारपेठेबाबत अ‍ॅपल बरीच आशावादी आहे.

आजघडीला ब्रिक्स देशांपैकी भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने वाढत आहे. वाढत्या अर्थव्यवस्थेसोबतच देशातील मध्यम आणि उच्च मध्यम वर्गीयांच्या संख्येतही भर पडत आहे, कोरोना पिछाडीवर पडल्याने सर्वसामान्यांच्या खिशात पुन्हा पैसा खुळखुळू लागला आहे. क्वीक लोन, ईएमआय संस्कृती फोफावली आहे. भारतीयांचं सरासरी वय २७ वर्षे असून अर्ध्यापेक्षा जास्त नागरिक २५ वर्षांच्या आतील आहेत. या वयोगटातील व्यक्ती ही प्रामुख्यानं गॅजेट फ्रेंडली आहे. स्मार्टफोन वा इतर गॅजेट्स खरेदी करण्याकडे या पिढीचा कल अधिक असल्याचं अ‍ॅपलला पक्कं ठाऊक आहे.

अ‍ॅपलच्या इको सिस्टिममधील सर्व गॅजेट्स हे अ‍ॅपलने बहुतांश स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर चालतात. आयफोनसाठी अ‍ॅपल बायोनिक सिरिजमधील उच्च दर्जाचा प्रोसेसर वापरते. हे फोन्स आयओएस ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतात. अ‍ॅपलची उत्पादने ही बाजारपेठेतील इतर उत्पादनांपेक्षा नेहमी सरसच असतात हा दावा करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे इतर टॉपएण्ड अँड्रॉईड स्मार्टफोन्सच्या तुलनेत आयफोन कधीच हँग वा लॅग होत नाही, असं म्हणणं हास्यास्पद ठरेल, परंतु तरीही इतर स्मार्टफोन्स वा गॅजेट्सच्या तुलनेत दर्जा आणि लाँग टर्म परफॉर्मन्सच्या बाबतीत अ‍ॅपलच्या उत्पादनांनी बरीच मोठी मजल मारली आहे, अ‍ॅपलचे प्रतिस्पर्धीहीअ‍ॅपलच्या प्रॉडक्टची कॉपी करण्यात मागे हटत नाहीत, हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळंच ग्राफ्रीक आर्ट असो ऑडियो-व्हिज्युअल किंवा इतर कुठल्याही क्रिएटीव्ह कामांसाठी आयमॅक-मॅकबुक, आयपॅडसारख्या उत्पादनांनाच प्राधान्य दिलं जातं ते उगीच नाही.

अ‍ॅपलच्या उत्पादनांची अफाट विक्री होण्यामागचा आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे शो ऑफ किंवा स्टेटस सिम्बॉल. एखाद्या व्यक्तीला पहिल्या प्रथम भेटल्यावर त्याच्या पेहरावावरून त्याच्या सोशो-इको स्टेटसबद्दल बरेच आडाखे लावले जातात. एखादी व्यक्ती कारमधून न येता रिक्षातून आली किंवा तिच्या पायात शूज ऐवजी स्लीपर असेल, तर ते इम्प्रेशन आणि त्या जोडीला हातात लेटेस्ट आयफोन असेल, तर ते इम्प्रेशन यातली समीकरणं तात्काळ बदलतात. त्यामुळंच पूर्वी जसं आपल्याकडं एखादी कार असावी, असं तरुणांना वाटायचं अगदी तसंच गॅजेट फ्रेंडली पिढीला आपल्या हाती आयफोन वा अ‍ॅपलचं एखादं गॅजेट असावं असं वाटतं. या पिढीला अ‍ॅपलच्या उत्पादनांकडे आकर्षित करता येऊ शकतं, अशी अ‍ॅपलला आशा आहे.

चीन आणि अमेरिकेनंतर भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे. भारतात अ‍ॅपल उत्पादनांचा वापर झपाट्याने वाढत असल्याचं कंपनीला दिसत आहे. विशेषतः अ‍ॅपलचे आयफोन भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. अ‍ॅपल भारतात युनिकॉर्न, मेपल, इंडिया स्टोअर, विजय सेल्स, क्रोमा, रिलायन्स डिजिटल अशा ऑथोराइज प्रीमियम रिसेलर मार्फत ऑफलाइन, तर फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन सारख्या ऑनलाइन स्टोअरमार्फत उत्पादन विकते. तरीही भारतात स्वत:चे ऑफलाइन रिटेल स्टोअर का? या प्रश्नाचे उत्तर आहे, बहुसंख्य भारतीय ग्राहकांना उत्पादन खरेदी करण्याआधी त्या उत्पादनांना समजून घेणं, स्पर्श करणं, एक्सप्लोअर करणं आवडतं.

अ‍ॅपल स्टोअरची सेवा ही जागतिक दर्जाची असून हाच भन्नाट अनुभव अ‍ॅपलला आता भारतीय ग्राहकांनाही देऊ करायचा आहे. त्या दृष्टीने हे स्टोअर्स भारतीय बाजारपेठेत अ‍ॅपल उत्पादनाचे मार्केट वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. एक पूश स्टार्टच्या स्वरूपात मुंबईतील स्टोअर ओपनिंगनंतर अ‍ॅपलची 25 देशांमध्ये एकूण 551 स्टोअर्स झाली आहेत. 20 एप्रिलला दिल्लीत आणखी एक अ‍ॅपल स्टोअर उघडल्यावर या स्टोअर्सची संख्या 552 होईल. या स्टोअरमार्फत ग्राहकांना थेट ऑफर, फायनान्स स्कीम देण्याचा अ‍ॅपलचा प्रयत्न असेल.

सायबर मीडिया रिसर्चनुसार अ‍ॅपलचा भारतीय स्मार्टफोन बाजारातील वाटा 2019 मध्ये 1 टक्के होता. तो गेल्या आर्थिक वर्षात वाढून ४ टक्क्यांवर गेला आहे. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस अ‍ॅपलने भारतात सुमारे 6 अब्ज डॉलर म्हणजेच (सुमारे 49,200 कोटी रुपये) किमतीचे प्रॉडक्ट विकले. आयफोन हे अ‍ॅपलचे सर्वाधिक विक्रीचे प्रॉडक्ट असून त्यामध्ये ७९ टक्के स्मार्टफोन हे ५० हजार ते १ लाख या किमतीचे होते. त्यापाठोपाठ आयमॅक (डेस्कटॉप-लॅपटॉप), आयपॅड (टॅब्लेट), आयवॉच (स्मार्टवॉच), आयपॉडचा (इअरफोन) क्रमांक येतो. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार भारतात अ‍ॅपलचा महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 50 टक्क्यांनी वाढला आहे.

याशिवाय इंडिया सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत अ‍ॅपलने देशात सुमारे 9 अब्ज डॉलर किमतीचे स्मार्टफोन निर्यात केले आहेत. यामध्ये जवळपास निम्मे म्हणजे ५० टक्के आयफोन आहेत, तर आर्थिक वर्ष 2022 पेक्षा चार पट जास्त आहेत. भारतातून 5 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा आकडा गाठणारा आयफोन हा पहिला ब्रँड असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारतातून एकूण 10 अब्ज डॉलर स्मार्टफोन्सची निर्यात करण्यात आली. अ‍ॅपलने भारतात एका आर्थिक वर्षात पहिल्यांदाच हे यश मिळवलं आहे. या तुलनेत दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने गेल्या आर्थिक वर्षात भारतातून 3.5 ते 4 अब्ज डॉलर्सच्या गॅजेट्सची निर्यात केली. भारतातून आता ब्रिटन, इटली, फ्रान्स, मध्य पूर्व, जपान, जर्मनी आणि रशिया अशा विकसित देशांमध्ये स्मार्टफोनची निर्यात होत आहे.

आतापर्यंत अ‍ॅपलचे प्रॉडक्ट्स प्रामुख्याने चीनमध्ये उत्पादीत होऊन ते जगभरात निर्यात केले जातात, पण चीनमधील आर्थिक मंदी तसंच चीन आणि अमेरिकेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅपलने चीनवरील अवलंबित्व कमी करत भारतातील उत्पादन वाढवलं आहे. भारतात व्हिस्ट्रॉन, फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन या तायवानच्या 3 कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या माध्यमातून अ‍ॅपलच्या प्रॉडक्ट्सचं उत्पादन केलं जातं. फॉक्सकॉन भारतात आपला कारखाना वाढवण्याचा विचार करत असून टाटा इलेक्ट्रॉनिक्स व्हिस्ट्रॉनचा एक प्रकल्प लवकरच ताब्यात घेत आहे. सध्याच्या घडीला जगभरात विकल्या जाणार्‍या अ‍ॅपलच्या एकूण गॅजेट्सपैकी 7 टक्के गॅजेट्स हे भारतातून निर्यात झालेले आहेत. ही निर्यात वाढवण्याकडे अ‍ॅपलचा भर आहे. यावरून अ‍ॅपलसाठी भारताची बाजारपेठ किती महत्त्वाची आहे, हे दिसून येतं. त्यामुळंच एका स्टोअरचं सुरू होणं हेदेखील भविष्यकालीन व्यापाराच्या दृष्टीने खूप काही सांगून जातं.

- Advertisment -