घरसंपादकीयओपेडमहायुतीसमोर बविआचे कडवे आव्हान!

महायुतीसमोर बविआचे कडवे आव्हान!

Subscribe

राज्यातील महायुतीत पालघर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. जागा कुणाच्याही पदरात पडली तरी विद्यमान खासदार राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील, अशी चर्चा शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू आहे. राजेंद्र गावितही त्या मानसिकतेत आहेत. शिंदे गटाला ही जागा मिळाली तर गावितच उमेदवार असतील. तर भाजपमध्ये काही इच्छुक असले तरी गावितांना पर्याय म्हणून त्यांची नावे वरिष्ठांच्या पचनी अद्याप पडायला तयार नाहीत. त्यामुळेच जागा कुणाच्याही खात्यात गेली तरी गावितच महायुतीचे उमेदवार असतील, असेच सध्याचे चित्र आहे. राजेंद्र गावितांच्या उमेदवारीवरून बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर मात्र नाराज आहेत. महायुतीसोबत असलेल्या ठाकूरांचा गावितांच्या उमेदवारीला म्हणूनच विरोध आहे. हितेंद्र ठाकूरांचा विरोध पत्करून उमेदवार दिल्यास मोठा फटका बसतो, असा इतिहास आहे.

२००९ साली नवा पालघर लोकसभा मतदारसंघ झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव या मतदारसंघाचे पहिले खासदार बनले होते. याआधी डहाणू आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात तत्कालीन ठाणे जिल्ह्यात असलेल्या आणि सध्याच्या पालघर जिल्ह्याचा समावेश होता. काँग्रेसचे दामू शिंगडा डहाणू लोकसभा मतदारसंघाचे पाचवेळा खासदार बनले होते. वयाच्या २५ व्या वर्षी दामू शिंगडांनी खासदार होण्याचा विक्रम केला आहे, तर बविआने पालघरचा पहिला खासदार निवडून आणण्याचा विक्रम नोंदवला आहे.

२००४ सालापर्यंत हितेंद्र ठाकूर अप्रत्यक्षरित्या भाजपचे खासदार राम नाईक यांना मदत करत असत, पण राम नाईक यांच्याशी मतभेद झाल्यानंतर ठाकूरांनी २००४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत एक खेळी खेळली. नाईकांना शह देण्यासाठी ठाकूरांनी काँग्रेसला विश्वासात घेत त्यांचे जवळचे मित्र अभिनेता गोविंदा आहुजा यांना काँग्रेसच्या तिकिटावर राम नाईक यांच्या विरोधात तेव्हाच्या उत्तर मुंबई लोकसभेच्या मैदानात उतरवले होते.

- Advertisement -

पाचवेळा खासदार असलेल्या राम नाईकांपुढे गोविंदाचा निभाव लागेल का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता, इतकी त्याकाळी राम नाईक यांची उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघावर पकड होती. भाजपकडून गोविंदांची नाच्या म्हणून अवहेलना करण्यात आली होती. हितेंद्र ठाकूरांनी काँग्रेसला रसद पुरवत राम नाईक यांचा पराभव करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. या पराभवानंतर राम नाईक यांच्या राजकीय उतरंडीला सुरुवात झाली होती.

या निवडणुकीनंतर झालेल्या मतदारंसघ पुनर्रचनेत २००९ साली पालघर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. यावेळी काँग्रेसने पुन्हा एकदा दामू शिंगडा यांनाच उमेदवारी दिली. शिंगडा यांना ठाकूरांचा त्यावेळी विरोध होता. दामू शिंगडांना उमेदवारी देऊ नका, असा इशारा ठाकूरांनी काँग्रेसला दिला होता, पण त्याकडे दुर्लक्ष करत काँग्रेसने शिंगडांना पुन्हा मैदानात उतरवले होते. तेव्हा ठाकूरांनी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून बळीराम जाधव यांना मैदानात उतरवून काँग्रेस आणि भाजपपुढे आव्हान उभे केले होते.

- Advertisement -

तेव्हा काँग्रेस आणि भाजपने याची फारशी दखल घेतली नाही. या निवडणुकीत बविआचे बळीराम जाधव निवडून आल्याने काँग्रेस-भाजपला धक्का बसला होता. भाजपचे चिंतामण वनगा दुसर्‍या क्रमांकावर राहिले, तर दामू शिंगडा तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. २०१४ च्या निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांचा पराभव करत भाजपचे चिंतामण वनगा विजयी झाले होते, तर याही निवडणुकीत दामू शिंगडा तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. या निवडणुकीनंतर दामू शिंगडा यांच्याही राजकीय उतरंडीला सुरुवात झाली होती.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती होणार की काय अशी स्थिती सध्या बघायला मिळत आहे. हितेंद्र ठाकूर महायुतीसोबत आहेत. महायुतीकडून अद्याप पालघर लोकसभा मतदारसंघाचे जागावाटप झालेले नाही. विद्यमान खासदार राजेंद्र गावित शिंदे गटासोबत आहेत. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री असलेल्या गावितांनी तत्कालीन भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर २०१८ साली झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यात ते निवडूनही आले होते. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर होते.

भाजपने वडिलांच्या पश्चात उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांनी वनगा यांना पोटनिवडणुकीत संधी द्यावी, असा आग्रह मित्रपक्ष भाजपकडे केला होता, पण भाजपने त्यांची शिफारस धुडकावत राजेंद्र गावित यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यावरून युतीत संघर्ष होऊन शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले होते. या रणधुमाळीत हितेंद्र ठाकूर यांनी बळीराम जाधव यांना मैदानात उतरवले होते. तिरंगी लढतीत भाजपची सरशी होऊन राजेंद्र गावित खासदार म्हणून निवडून आले होते.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलले आहे. शिवसेना फुटल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून निवडणुका न झाल्याने महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकीय राजवटीत महायुती सरकारने, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासकांना बळ मिळत आहे. तत्कालीन आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. हे तर बविआ समर्थकांना भेटही देत नसत. महापालिका प्रशासनावरील बहुजन विकास आघाडीची पकड ढिली पडली आहे. प्रशासनात शिंदे गटासह भाजपचा हस्तक्षेप वाढला असून त्यांना कधी नव्हे ते महापालिकेतून आर्थिक पाठबळही मिळू लागले आहे.

आर्थिक ताकदीने बविआविरोधकांच्या राजकीय आकांक्षा वाढू लागल्या आहेत. विरोधकांची राजकीय ताकद वाढणे बविआसाठी धोक्याची घंटा मानली जाते. दुसरीकडे, महापालिकेतील ठेकेदारीत बविआ समर्थकांची असलेली मक्तेदारी कमी होताना दिसत आहे. राज्यातील सत्ताधार्‍यांशी संबंधित अनेक ठेकेदारांना वसई-विरार महापालिकेत प्रवेश मिळाला आहे. बाहेरचे ठेकेदार वाढू लागल्याने बविआ समर्थक ठेकेदारांची नाकाबंदी होऊ लागली आहे. ही बाब बविआला नक्कीच रुचलेली नाही. त्यातून ठाकूर समर्थक आणि प्रशासनात संघर्ष होताना दिसत आहे. एका कार्यक्रमात दस्तूरखुद्द आमदार हितेंद्र ठाकूर यांनी प्रशासनावरील आपला संताप व्यक्त केल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले होते.

बहुजन विकास आघाडीची सत्ता होती तोपर्यंत खासदार राजेंद्र गावितांना महापालिकेकडून डावलण्याचे काम होत होते. प्रशासन असले तरी महापालिकेचा कारभार बविआकडूनच चालवला जात असे. प्रशासनाची बविआविरोधात जाण्याची हिंमत होत नव्हती. आता परिस्थितीत बदल झालेला आहे. महापालिकेत बहुजन विकास आघाडीपेक्षा शिंदे गट आणि भाजप पदाधिकार्‍यांची ऊठबस वाढलेली आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी महापालिका प्रशासनाच्या मदतीने वसई-विरार शहरात ताकद वाढण्याचे प्रयत्न केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आणून त्याची अंमलबजावणी करण्याचे काम गावित यांनी केले आहे. गावितांमुळे शिंदे गटाला महापालिका प्रशासनाकडून ताकद मिळू लागली आहे.

महापालिकेमुळे विरोधकांचे वाढते महत्व त्रासदायक ठरू शकते, हे बविआचे नेते जाणून आहेत. म्हणूनच राम नाईक, दामू शिंगडा यांचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी ज्यापद्धतीने बविआकडून राजकीय खेळी खेळली गेली, तीच खेळी आता राजेंद्र गावितांविरोधात सुरू झाल्याचे दिसत आहे. शिंदे गटाने पालघरसाठी आग्रह धरला आहे. भाजपलाही हा मतदारसंघ हवा आहे. स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांचा शिंदे गटाला जागा सोडण्यास विरोध आहे. राजेंद्र गावित भाजपच्या तिकिटावरही लढण्यास तयार आहेत. भाजपचे नेते ही जागा मिळाल्यास राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन पुन्हा मैदानात उतरवण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीत अस्वस्थता आहे.

राजेंद्र गावितच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित असल्याचे समजताच ठाकूरांनी अचानकपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. फक्त उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची औपचारिकता बाकी असल्याचा इशाराही ठाकूरांनी महायुतीला दिला आहे. आपली ताकद पाहता हा मतदारसंघ आपल्यालाच मिळायला हवा. आपले सर्वपक्षीयांशी मैत्रीपूर्ण संबंध असून सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन ठाकूरांनी केले आहे. महायुती ठाकूरांना जागा सोडेल, अशी शक्यता सध्यातरी दिसत नाही. म्हणूनच ठाकूरांनी महायुतीला अप्रत्यक्षरित्या इशारा देत दबावतंत्राचा वापर सुरू केला असण्याची शक्यता आहे.

डहाणू आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघानंतर अस्तित्वात आलेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे पारंपरिक मतदार आहेत. म्हणूनच भाजपचा या जागेवर दावा आहे. शिवसेनेने २०१९ ची निवडणूक जिंकली असली तरी त्यावेळी भाजपचा शिवसेनेला पाठिंबा होता. काँग्रेसचे दामू शिंगडा पाचवेळा खासदार झाले असले तरी काँग्रेसचा मतदार आता राहिलेला नाही.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची या मतदारसंघात काही प्रमाणात ताकद नक्कीच आहे. शिंदे गट दावेदार असला तरी त्यांच्याकडे तितकासा जनाधार नाही. बहुजन विकास आघाडीने २००९ मध्येच एकदाच विजय मिळवला असला तरी त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये जनाधार कायम राखला आहे. म्हणूनच राम नाईक आणि दामू शिंगडा यांच्या निवडणुकीतील अनुभव पाहता महायुतीला ठाकूरांची नाराजी पत्करणे धोक्याची घंटा ठरू शकते.

महायुतीसमोर बविआचे कडवे आव्हान!
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -