घरसंपादकीयओपेडकोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे!

कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे!

Subscribe

राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो, हेच सध्याच्या घडामोडींवरून अधोरेखित झाले आहे. वस्तुत: सर्व राजकारणी एकाच माळेचे मणी असल्याची कल्पना सर्व सुज्ञांना आहे. त्यामुळे तो या उथळ राजकारणाच्या आणि राजकारण्यांच्या कधीच मागे जात नाही, पण या नेत्यांचे समर्थक किंवा आजकालच्या भाषेत ‘भक्तां’चे काय? वर्षानुवर्षे एका विचारधारेसाठी आपल्या नेत्याच्या मागे सावलीसारखे वावरणार्‍यांचे काय? पद आणि वलय यांची चटक लागलेल्यांना (कथित) स्वाभिमानाशी आणि (कथित) तत्त्वांशी तडजोड करावी लागते. यात भरडला जातो, तो त्यांच्या मागेमागे धावणारा कार्यकर्ताच. स्वहितासाठी पक्षबदल करणारे राजकारणी सर्वसामान्य, कष्ट उपसणार्‍या कार्यकर्त्यांचा किती विचार करत असतील? की ते त्यांचा नुसता वापर करतात. एखादी संधी निर्माण होते, तेव्हा असाच कोणीतरी बाहेरून आलेला ती संधी हिरावून घेतो. आगामी निवडणुकांच्या निमित्ताने एक राजकीय उजळणी...

राजकारणात सध्या ‘खेल खेल में’ सुरू आहे. आपला कोण आणि शत्रू कोण, हेच सच्च्या निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांना कळेनासे झाले आहे. सार्वजनिक जीवनात आपल्याभोवती वलय निर्माण झाले की, अनेकदा बोलण्यावरचा ताबा सुटतो. त्यातच कुरघोडीच्या राजकारणामुळे अनेक वैरी निर्माण होतात. तळागाळाच्या राजकारणातून निर्माण झालेले नेत्यांमधील वैर, हे नंतर राज्य स्तरापर्यंत कायम राहिल्याचे पहायला मिळाले आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबाचे वैर सर्वश्रुत आहे, पण आता एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले नेते, राजकीय तडजोड करत असल्याचे दिसत आहे. गेल्या 10 वर्षांतील चित्र तरी तेच सांगते. अगदी उजळणीच घ्यायची झाली, तर 2014 पासूनची घेता येईल. त्यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेबरोबरची 25 वर्षांची मैत्री तोडली होती, पण विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजप पुन्हा शिवसेनेच्या मैत्रीकडे डोळे लावून बसला. कारण त्यावेळी त्याच्या विजयाचा वारू 122 जागांवर अडला. सत्तास्थापनेसाठी 23 जागांची गरज होती. मग पुन्हा मैत्रीचे स्मरण करून देत आणि घेत दोघेही सत्तेत सहभागी झाले. म्हणजेच, राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो…

2019 मध्ये पुन्हा एकदा दोस्तीच्या आणा-भाका घेत, शिवसेना आणि भाजप लोकसभा आणि पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे गेले, पण विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपचा हात झटकत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा ‘हात’ पकडला. पक्षाच्या स्थापनेपासून ज्या विचारसरणीला विरोध करत आले होते, त्यांना सोबत घेत शिवसेनेने सरकार स्थापन केले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा मुकुट आपल्या शिरावर ठेवला. तेथूनच भाजप आणि शिवसेनेच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला. देशातील 2014 च्या निवडणुकांच्यावेळी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरच बहुदा सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभाग सक्रिय झाला आणि एका मागोमाग राजकारण्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येऊ लागली. याआधी वर्षातून एखाददोन घोटाळे समोर यायचे. आता तर घोटाळ्यांचा पाऊसच पडत आहे. ही सर्व प्रकरणे बाहेर काढण्यात सध्या आघाडीवर आहेत ते भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या. त्यांच्याकडे तर (ते सोडून) प्रत्येक राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराची यादीच आहे. ‘हिसाब तो देना पडेगा’ असे सांगत ते प्रत्येकाच्या मागे लागले आहेत, पण दुर्दैवाने त्यांनी भ्रष्टाचाराबद्दल ज्यांना-ज्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले ते सर्व त्यांच्याच भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत. त्यामुळे त्यांची स्थिती अवघड झाली आहे, अशी चर्चा आहे, पण यात कितपत तथ्य आहे, हे माहीत नाही. कारण राजकारण्यांची प्रतिमा ही ‘निर्ढावलेले’ अशीच बनली आहे.

- Advertisement -

सन 2014 च्या निवडणुकीत सिंचन घोटाळ्यावरून ज्यांना तुरुंगात टाकण्याची ग्वाही विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती, त्या अजित पवार यांना बरोबर घेत 2019 मध्ये फडणवीस यांनी सरकार स्थापन केले. एवढेच नव्हे तर एकवेळ सत्तेशिवाय राहू, पण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करणार नाही, असे त्रिवार सांगतानाच फडणवीस यांनी एका कार्यक्रमात, ‘आपद् धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही… असे ठासून सांगितले होते, पण जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेतलेच! आता तेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बनून उपमुख्यमंत्रीपदावर बसले आहेत! पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येप्रकरणी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रान उठवले होते. त्यामुळे त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. त्याचबरोबर मॉडेल उर्फी जावेदवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यात जोरदार शब्दरण रंगले होते, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला साथ दिल्याबद्दल संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रीपद देण्यात आले. याबद्दल विचारले असता, माझा संजय राठोड यांच्याबद्दलचा संघर्ष सुरूच असल्याचे चित्रा वाघ सांगतात, पण हे लोकांपेक्षा आपल्याच मनाच्या समाधानासाठी अधिक असावे, असे वाटते, तर गेल्यावर्षी जुलैमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने रुपाली चाकणकर यांची आता चित्रा वाघ यांच्यासोबत ऊठबस सुरू झाली आहे. अशावेळी त्यांच्या मनात काय भावना निर्माण होत असतील, असा प्रश्न पडतो.

काँग्रेसमध्ये असताना भाजप हा गुंडांचा पक्ष बनत असल्याची टीका करणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नंतर स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला. नंतर तो त्यांनी भाजपमध्येच विलीन केला, हे विशेष! काँग्रेसमधून बाहेर पडताना तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस पक्ष वाढीसाठी कोणतेही काम अशोक चव्हाण यांनी केले नाही, केवळ नारायण राणे यांच्यासमोर अडचणी आणण्याचे काम त्यांनी केले, असा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर माझे सर्वच पक्षांत मित्र आहेत, फक्त उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण सोडून, असे जाहीर वक्तव्यदेखील त्यांनी केले होते. आता हेच अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये नारायण राणे यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यातही भाजपने राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपत आलेल्या नारायण राणे यांना संधी न देता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले आहे. म्हणजेच काँग्रेसमध्ये असताना 2008 साली जे झाले होते, तेच आता पुन्हा झाले. मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिल्याने नारायण राणे 2005 मध्ये काँग्रेसमध्ये आले, पण त्यांना लगेच संधी मिळाली नाही. 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांना 2008 मध्ये मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यात आले, तेव्हा नारायण राणे यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण मुख्यमंत्रीपदावर अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवसेनेची कथाही यापेक्षा वेगळी नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी, महिनाभरापूर्वी पक्षात आलेल्या मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली. आता त्यांची निवड बिनविरोध झाली आहे. याचे समर्थन करताना एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचा दाखला दिला आहे. 1976 मध्ये महापौरपदासाठी मुरली देवरा यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते, पण मुरली देवरा आणि मिलिंद देवरा यांची भूमिका बर्‍यापैकी मराठी माणसांच्या विरोधात असल्याचे जाणकार सांगतात.

- Advertisement -

पद आणि वलय यांची चटक लागलेल्यांना (कथित) स्वाभिमानाशी आणि (कथित) तत्त्वांशी तडजोड करावी लागते. यात भरडला जातो, तो त्यांच्या मागेमागे धावणारा कार्यकर्ताच. स्वहितासाठी पक्षबदल करणारे राजकारणी सर्वसामान्य, कष्ट उपसणार्‍या कार्यकर्त्यांचा किती विचार करत असतील? की ते त्यांचा नुसता वापर करतात. एखादी संधी निर्माण होते, तेव्हा असाच कोणीतरी बाहेरून आलेला ती संधी हिरावून घेतो. सर्वसामान्य कार्यकर्ता पाहत राहतो, त्यांचा नेता ‘पक्षाच्या भल्या’साठी एवढा त्याग करण्याचा सल्ला देतो. हीच खदखद चिन्मय भांडारी यांनी आपले पिता, महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्यावर अशाच प्रकारे अन्याय झाल्याचे सांगत मनातील खदखद व्यक्त केली होती.

हे सर्व पाहता पुन्हा एकदा वपुंचेच एक कथन याबाबत देता येईल – ‘गुणवत्तेचं भांडवल वाममार्गासाठी करण्यात, या देशात खूप चतुर माणसं आहेत. म्हणूनच माणसं श्रीमंत होत गेली आणि देश आहे तिथेच राहिला. आपल्या देशात पैसा प्रचंड प्रमाणात आहे. अपघातानेच तो कुणाकडे आहे, हे कळतं. धूर्त लोक प्रामाणिक माणसांच्या शोधात असतात. अशा माणसांपासून दूर राहिले पाहिजे. ‘काय सेवा करू?’ अशी भाषा वापरणारी माणसं स्वत:ची सेवा करून घेणारी असतात.’ त्यामुळेच या संधीसाधूंच्या मागे फिरण्यापूर्वी याचा सारासर विचार आपणच केला पाहिजे की, आपण किती भावनिक व्हायचे?

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -