घरसंपादकीयओपेडरेल्वे आणि फलाट यांच्यातील अंतराचे अंतरंग!

रेल्वे आणि फलाट यांच्यातील अंतराचे अंतरंग!

Subscribe

रेल्वेचे पायदान आणि फलाट यांच्यातील अंतरावर लक्ष ठेवण्याचं तिनं केलेलं प्रेमळ आर्जव मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. ती म्हणत असते, बाबांनो आपली काळजी घ्या, घरी लेकरंबाळं वाट पाहताहेत, ही रेल्वेवाली बाई आपल्या गोड आवाजात ‘मरणाच्या धोक्याची’ हळूवार सूचना रोज देते, तरीही लोकलमधून चढताना उतरताना या अंतरात दबा धरून बसलेला मृत्यू काही जणांना सोबत घेऊन जातोच. हे अंतर म्हणजे दोन श्वासांमधील अंतर असतं. ते चुकलं की, श्वास बंद झाला म्हणून समजा. या अंतराची काळजी घेतच मुंबईकरांची जगण्याची कसरत सुरू असते.

लोकलचे पायदान आणि फलाटातील अंतर जास्त असल्यावरही धोका निर्माण होतो. अंतराचा अंदाज घेऊन लोकलमधून उतरण्याचा सराव मुंबई-ठाणेकरांसाठी नवा नसतो, त्यातही डब्यातून उतरणार्‍या गर्दीच्या मायक्रोसेकंदाचा वेळेचा अंदाज प्रवाशांनी बांधलेला असतो. एखाद्या गच्च भरलेल्या दबलेल्या पोत्याचा कोपरा फाटावा आणि धान्य सांडावं, अशी माणसं लोकल ट्रेनमधून फलाटावर सांडलेली असतात, अशा वेळी फलाटावर लोकलमध्ये घुसण्याच्या तयारीत असलेली गर्दी युद्धखोर पवित्र्यात असते, पिक अवर्समध्ये फलाटांची युद्धभूमी झालेली असते, फलाटावरच्या या युद्धात उतरण्याची तयारी रोजची असते, समोरची लोकल वायुवेगानं फलाटावर दाखल होत असतानाच तिच्यावर चढाई करण्याची गरज असते, जो आधी चढाई करतो तो लोकलच्या सीटचा किल्ला सर करतो, या सीटसोबत ‘खिडकी नावाची राणी’ जिंकण्यासाठी नशीब लागतंय, अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे निघालेल्या लोकलमध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, नालासोपारा, वसईहून ‘रिटर्न मारून’ या खिडकीतल्या राणीला आपल्या ताब्यात घेऊन विंडोसीटरुपी सिंहासनावर विराजमान झालेले विजयी मुद्रा धारण केलेले योद्धे आणि मागाहून फलाटावर ताटकळून सीट पकडणारे योद्धे यांच्यात लोकलच्या डब्यातच घनघोर लढाई होते, अशा वेळी ‘तुला बघून घेतो, कुठं राहतोस, इधरको कायको घुस्या, क्या नाटक है, अंगठेसे पैर हटा, उद्या भेटशीलच, काय फालतूगिरी आहे, नेहमीचं नाटक असतं तुमचं नालासोपारावाल्यांचं, अशा युद्ध गर्जना, आव्हाने प्रतिआव्हाने केली जातात.

सामान्य प्रवाशाचं जगणं योद्ध्यासारखंच असतं, ट्रेनवर चढाई करण्याआधी लोकलबाईनं ‘फलाट आणि पायदानातल्या अंतराची सूचना देऊन या रोजच्या युद्धाचा बिगूल वाजवलेला असतो. आपली बॅग, बॅगेतला रुमाल, कंगवा, झालंच तर महिनाअखेरीस काहीशा उरलेल्या नोटा, चिल्लर आणि झिरो डिपॉझिटच्या एटीएमांच्या कार्डानं भरलेलं पाकीट, वॉलेट, पेन, कागदपत्रं, जुनी लाईट बिलं, रेशन भरल्याच्या पावत्या, चष्म्याचा बॉक्स, मोबाईलचं चार्जर, घरातून रोजच्या जगण्यातल्या एनर्जीचा दम भरण्यासाठी घरातल्या राणीनं विश्वासानं सोपवलेली स्टीलच्या डब्यातली रसद असा सगळा रणभार बॅगमध्ये घेऊन ही बॅग सैनिकानं पाठीवरून पोटावर म्हणजेच समोर आणलेली असते.

- Advertisement -

लोकलच्या मधल्या खांबानं दोन भाग केलेल्या दरवाज्यातून अलगद खांबाला न धडकता आत शिरून आपलं सिंहासन मिळवणं ‘अनेकदा बळकावणंं’ ही रोजची कसरत असते. महिलांच्या डब्यातही स्थिती वेगळी नसते, तिथल्या रणमैदानात युद्धशिष्टाचाराची अपेक्षा पुरुषांच्या तुलनेत कमीच असावी, पुरुष नावाच्या ‘तो’ म्हणवल्या जाणार्‍याच्या डब्यात ‘ती’ नावाच्या डब्यातील सैनिकांचे कामच काय? आम्हाला तुमच्यात येऊ देता का? मग तुम्ही इकडं का आलात? त्यांच्यासाठी रेल्वेनं वेगळं कुरूक्षेत्र तयार केलेलं असताना त्यांना आम्हा पुरुषांच्या युद्धातल्या सिहांसनांवर बसण्याचा अधिकारच काय? या मुद्यावरूनही बरेचदा युद्धस्थिती तयार होते. बरेचदा यात ‘तो’ सैनिकच माघार घेतो. युद्धखोरांच्या डब्यात काही जुने जाणते सैनिकही असतात, ज्यांनी वयाची साठी ओलांडलेली असते. त्यांच्यासाठी युद्धनियमात सवलत असते, त्यांची सिंहासने राखीव असतात. फलाट आणि पायदानातलं अंतर योग्य असावं लागतं, ते वाढलं तर त्यात पडण्याचा धोका असतो. सामान्य लोकलकराच्या जगण्यातही असंच अंतर असतंं, भाकरी करपली, भाजीत मीठ वाढलं, टेलरनं गळा जास्तच टाईट केला, साईज चुकलेल्या बुटातले अंगठे अंग चोरून बसवावे लागतात, ही सगळी जगण्यातल्या प्रमाणातलं अंतर सांभाळण्याची उदाहरणं आहेत. मानवी नात्यांमध्येही जास्त अंतर असून चालत नाही. अशी नाती सांभाळणार्‍यांची अपेक्षा असते, नात्यातलं वाढलं तर नाती बिघडतात.

दुरून डोंगर साजरे, असं म्हटलं जातं. खरंतर कुठलाही डोंगर जवळून पाहण्याची इच्छा मानवी मनाची असते, इथं जगण्यातली आमिषं दुरूनच छान छान दिसतात, असं तत्वज्ञान शिकवलेलं असतं. अती तिथे माती, ही म्हणही कमी जास्त अंतराच संतुलन ठेव, अंतर बिघडू देऊ नकोस हेच सांगत असते. लोकलच्या प्रवासात जसं फलाट आणि पायदानातलं अंतर महत्वाचं असतं, तसंच रोजचं काम, कुटुंब, घर, ऑफिस, व्यवसाय, झोप, मित्रमंडळी, विरंगुळा, मनोरंजन, हौसमौज या सर्व जगण्याच्या घटकातही योग्य अंतर राखणं गरजेचं असतं, सामान्यपणे माणसाला आठ तासांची झोप पुरेशी असते, त्यापेक्षा जास्त झोपणारे आळशी गटात मोडले जातात, तर कमी झोप मिळालेले लोकलच्या प्रवासातचं आपापल्या नेत्रकटाक्षात निद्रादेवीला बंदीस्त करून स्वप्नील डुलकीवर स्वार होऊन लोकलच्या डब्यातच थोड-थोडके अधून-मधून तरंगत असतात, याला व्याकरणाच्या सभ्य भाषेत चोरटी झोप म्हणतात.

- Advertisement -

अशा वेळी अचानक बाजूनं धडधडत जाणार्‍या दुसर्‍या गाडीनं निद्रादेवी स्वप्नातून अदृश्य किंवा परागंदा होते आणि झोपेच्या मऊशार उडत्या गालिच्यावरून वास्तवाच्या जगात ढकलून देते, लोकल ट्रेनमधले ‘वास्तव’ म्हणजे हे शेजारी बसलेले ‘खांदेकरी’ असतात, लोकलकरांना मरणानंतरच्या खांदेकरांची चिंता नसते, जिवंत असतानाच त्यांना असे अनेक खांदे डोके टेकवण्यासाठी मुबलक उपलब्ध असतात, आपला खांदा झोपण्यासाठी देणं हे इथं पुण्यकर्म असतं. त्यात सात्विकता असते, खांद्याला खांदा लावून भिडणे, वाटचाल करणे यासारख्या वाक्यप्रचारांचे उगमस्थान लोकलचा प्रवासच असावा, इथं सगळं अंतर संपलेलं असतं. करत्या माणासाच्या याच खांद्यावर घराचा कुटुंबाचा भार त्यानं उचललेला असतो.

मग असे खांदे डुलकी घेण्यासाठी लोकलमध्ये बरेचदा उपलब्ध झालेले असतात, दिवसभर ओव्हरटाईम करून थकलेले खांदे जगण्याचं ओझं उचलून दिवस मावळतीला काहीसे झुकलेले असतात, हे खांदे मग बाजूला बसलेल्या अनोळखी खांद्यावर विश्वासानं मान टाकतात, लगतचा खांदेकरीही बसल्या जागेवरचं जिवंत माणसाला खांदा देण्याचं पुण्यकर्माची संधी सोडत नसतो. लोकलच्या डब्यात माणसा-माणसात पडलेलं अंतर मिटलेलं पहायला मिळतं, फर्स्ट क्लासच्या डब्यात जरी माणसं एकाच सीटवर बसलेली खेटून बसलेली असली तरी त्यांच्यातलं अंतर बरेचदा स्पष्ट दिसत असतं, तिथं माणसामाणसात अंतर ठेवणं हा सोफेस्टिकेटेड शिष्टाचाराचा भाग असतो, त्याला प्रवासातले मॅनर्स म्हटलं जातं. सेकंड क्लासमध्ये बरेचदा एखाद्या बँकेचा मॅनेजर किंवा कारकून आणि त्याच्या शेजारी बसलेला एखाद्या कंपनीला लिफ्टमन एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवलेले पहायला मिळतात, ‘क्लास’ मधलं अंतर निकालात काढून त्यातून साकारलेली ही समता-समानता लोकलच्या डब्यातच पहायला मिळते.

अंतर आणि अंतरंग यात केवळ शब्द सार्धम्य नसते, प्रत्येकाच्या अंतरात ‘तो’ सजग असतो, हा तो कोण असावा? काही त्याला परमेश्वर, निसर्ग, नियंता आणि इतर हजारो नावांनी उल्लेखतात. माणसा माणसातलं अंतर मिटल्यावर तो प्रगट होतो, माणसांच्याच अंतरंगातून मात्र अंतर मिटवण्याची अट कायम असते. ज्यावेळी माणसातील अंतर कमी होतं त्यावेळी अंतरंगांचं रोमहर्षक इंद्रधनुष्य साकारलं जातं. अंतर सगळीकडे असतं किंवा कुठंही नसतं, अंतर माणसांमध्ये, सगळीकडेच असतं, लिंग, जात, धर्म, ठिकाण, कपडे, पेहराव, खानपान, आर्थिक स्तर, विचार, समाज, राजकारण अशा सगळ्याच ठिकाणी असतं, माणसामाणसातलं अंतर ज्यांनी कमी केलं त्यांना इथं प्रेषित संत म्हटलं जातं, अंतर खरंच असतं का? संपूर्ण विश्व एकच आहे, वेगळं नाही, मी आणि भवताल वेगवेगळे नाहीत, अशी सत्य आणि सद्धर्माची शिकवण असते. त्यामुळे परस्परात अंतर असावं असं काही निसर्गात नाहीच, माणसामाणसातील अंतर माणसंच तयार करतात, त्याला समाजांची नावं देतात, हे अंतर योग्य प्रमाणात राहिलं तर समाजाचा गाडा संतुलित राहतो.

बैलगाडी, रेल्वे, मोटारीची चाकं योग्य अंतरावर योग्य वेगानं धावायला हवीत नाहीतर अपघात अटळ असतो, लोकल ट्रेनच्या प्रवासातही पायदान आणि फलाटामधील अंतराची सूचना ही सुद्धा जगणं आणि मरण्यातल्या क्षणातल्या अंतराइतकीच असते. लोकल ट्रेनच्या प्रवासात सगळ्याच प्रवाशांसाठी हे अंतर समान असतं, हे अंतर दोन श्वासांमधलं अंतर असतं किंवा दोन स्पंदनामधलं अंतर असतं. दोन श्वास किंवा दोन स्पंदनातलं अंतर जर वाढलं तर यमदेव तयारच असतो. बरेचदा माणसा माणसातलं अंतर कमी जास्त होतं, माणसा माणसातल्या देहातलं अंतर जरी वाढलं तरी मना मनातली अंतरे कमीच असावी, माणसांची मने एकमेकांना खेटूनच बसलेली असावीत, माणसांच्या मनांची एकच गर्दी व्हावी, जशी पिक अवर्समध्ये लोकलच्या डब्यात किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर गर्दी असते… मनांमध्ये पडलेलं अंतर मनांना मान्य नसतं, मनांना एकटेपणा मान्य नसतो, त्यांना गर्दीच लागते, या गर्दीत मने हरवण्याचा धोका नसतोच, या गर्दीतच मनांना मने जुळतात, मिळतात, भेटतात, माणसाला माणूस सापडतो आणि जगण्याचा लोकलप्रवास सुखद होतो, इथं अंतर मान्य नसतं…कुठलंच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -