घरसंपादकीयओपेडकाही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे!

काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे!

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला पक्ष असल्याचा दावा करत मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगून भाजपसोबत हातमिळवणी केलेले अजित पवार यांच्या ध्येयसिद्धीच्या मार्गातील अडथळे काही संपताना दिसत नाहीत. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळत नाही, म्हणून अजितदादांनी भाजपसोबत हातमिळवणी केली, पण माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात अजितदादांना गोत्यात आणणारे विधान केले आहे. अजितदादांनी ते फेटाळून लावले असले तरी विरोधक हे आयते कोलीत सोडतील असे वाटत नाही.

काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी, या कवयित्री शांताबाई शेळके यांच्या नाट्यगीतात पुढे, काही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे, माझे अबोलणे ही विपरीत होत आहे, या ओळी आहेत. त्या काही माणसांच्या जीवनात लागू पडतात. म्हणजे त्यांच्या जीवनातील ध्येय ते साध्य करण्यासाठी लाख प्रयत्न करतात, पण काही तरी अडथळा येतो म्हणजे अनर्थ घडतो आणि त्यांना ते ध्येय गाठता येत नाही. सध्या असाच अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार घेत आहेत. ते गेली ३२ वर्षे राजकारणात आहेत. खरे तर काका शरद पवार यांचा हात धरून ते राजकारणात आले, पुढे राजकारणात चांगला जम बसवला, त्यामुळे शरद पवारांचे राजकीय वारसदार अजितदादा असे सगळ्यांना वाटत होते.

पण सुप्रिया सुळे यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर राष्ट्रवादीत दोन ध्रुव तयार झाले. त्यातूनच राष्ट्रवादीची आजची परिस्थिती झालेली आहे. जी परिस्थिती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची झाली, तीच राष्ट्रवादी काँग्रेसची झाली. खरे तर पवार फॅमिली सहकार तत्वाला अवलंबणारी असल्यामुळे त्यांच्यात फूट पडेल आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्कळीत होईल, असे वाटले नव्हते. अजित पवार यांनी आपला वेगळा गट घेऊन थेट मूळ पक्षावर दावा सांगितला. पण अजित पवार यांची ही नाराजी काही पहिल्याच वेळी दिसून आलेली नाही.

- Advertisement -

आपण नाराज आहोत, हे त्यांनी या पूर्वीही काही वेळा दाखवून दिले होते. पण त्याकडे शरद पवार यांनी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. आपल्या एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते, आम्ही दिल्लीच्या राजकारणात जाण्यामागे काही कारणे होती. एकतर महाराष्ट्राच्या विधिमंडळात बरीच वर्षे काम केले होते. त्याचसोबत अजित पवार यांच्यासारखी मंडळी नव्या दमाने पुढे येत होती. त्यांना आमच्या उपस्थितीमुळे अवघडल्यासारखे होत होते. अजितदादांना महाराष्ट्रात मोकळेपणाने काम करता यावे, असेच शरद पवार यांना वाटत होते. अशी जर त्यांची भूमिका होती तर मग काका आपल्याला पुरेशी संधी देत नाहीत, असा अजितदादांचा गैरसमज का झाला, हाही एक संशोधनाचा विषय आहे. राजकारणात सुप्रिया सुळे यांचा प्रवेश झाला असला तरी त्यांची भूमिका ही अजितदादांना आव्हान देणारी नव्हती. तर मग अजितदादा इतके हताश का झाले, हेही एक गूढ आहे.

अजितदादा हे राज्यातील एक अनुभवी आणि दिलदार नेते म्हणून ओळखले जातात. प्रशासन ही तशी फार अवजड यंत्रणा आहे, तिला सक्रिय करून तिच्याकडून जनहिताची आणि विकासकामे करून घेण्यासाठी जे कौशल्य लागते, ते अजितदादांकडे भरपूर आहे. प्रशासनावर वचक असलेला नेता म्हणून अजितदादा ओळखले जातात, त्यामुळे काही वेळा त्यांना संबंधितांची नाराजी ओढवून घ्यावी लागते, अजितदादांच्या या धडाकेबाज स्वभावामुळे काही लोक दुखावले जातात. अजितदादा यांचा हा धडाकेबाज स्वभाव त्यांचे काका शरद पवार यांना अडचणीचा वाटतो की काय, हाही एक प्रश्न आहे. त्यामुळेच त्यांच्या महत्वाकांक्षेला आळा घालण्याचा प्रयत्न होतो की काय, असाही एक मतप्रवाह आहे. त्यातूनच दादांची कोंडी होत होती. त्यामुळेच त्यांंनी टोकाचे पाऊल उचललेले असावे.

- Advertisement -

स्वतंत्र पक्ष स्थापन करून जी राज ठाकरे यांची अवस्था झालेली आहे, तीच आपली होईल की काय, याचा विचार करून त्यांनी एकनाथ शिंदे यांचा फॉर्म्युला वापरला. पक्षातून बाहेर न पडता खरा पक्ष आपलाच आहे, असा दावा केला. शिंदे आणि अजितदादा यांच्या या भूमिकांमुळे महाराष्ट्रात विचित्र राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रादेशिक पक्षांना फोडून त्यांना आपल्या बाजूने घेऊन सरकार स्थापन करण्यात भाजपला जरी यश आले असले तरी पुढील वाटचाल ही आव्हानात्मक आहे. कारण पाहुणे म्हणून आले आणि घराचे मालक झाले, अशी स्थिती सध्या भाजपची शिंदे आणि अजितदादा यांच्याबाबत झालेली आहे. कारण या दोघांनी भाजपशी युती केलेली आहे, पण त्यांनी आपले पक्ष भाजपमध्ये विलीन केेलेले नाहीत.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केल्यावर जेव्हा अजितदादांना विचारले जाई की, तुम्ही भाजपसोबत जाणार का, त्यावर मी अजिबात जाणार नाही, हे मी बॉण्डपेपरवर लिहून देऊ का, सध्या फडणवीस-शिंदे यांच्याकडे बहुमत आहे, ते सरकार काही पडणार नाही, असे अजितदादा पत्रकारांना सांगत असत. तरीही अजितदादा पुढे भाजपसोबत गेले. तिथे जाऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. खरे तर दादांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा आहे. ते पद आपल्याला शरद पवार यांच्या नेतृत्वखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून मिळत नाही, त्यामुळेच त्यांनी एकनाथ शिंदे यांचा फॉर्म्युला वापरला.

कारण त्या फॉर्म्युल्याने शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले होते. अजितदादा यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काम करताना आपली नाराजी अनेक वेळा व्यक्त केली होती, फडणवीसांसोबत घेतलेला सकाळचा शपथविधी शरद पवारांनी उधळवून लावला होता. त्यामुळे आता काही तरी मजबूत खेळी करण्याचा विचार करून अजितदादांनी नवा फॉर्म्युला वापरला. मुख्यमंत्री होणे ही अजितदादांची महत्वाकांक्षा आहे, त्यामुळे भाजपच्या नेत्यांसोबत त्या संदर्भात काही तरी बोलणे झाल्याशिवाय ते भाजपशी पुन्हा हातमिळवणी करतील असे वाटत नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे वेगाने होत आहेत, म्हणून आम्ही भाजपसोबत आलो, असे जरी अजितदादा म्हणत असले तरी त्या विधानात काही जोर वाटत नाही.

अजितदादांनी जेव्हा बंड केले तेव्हा त्यांनी केलेल्या भाषणात आपले काका शरद पवार यांच्या भूमिकेवर टीका करताना आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली होती. त्यामुळे ती अपेक्षा ठेवूनच त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली हे उघड गुपित आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर टांगती तलवार असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले तर अजितदादांना संधी मिळण्याची शक्यता होती. त्याबाबत काय निर्णय होईल, याविषयी निश्चितता नाही. त्यामुळे अजितदादांची तिही अपेक्षा फोल ठरली. जशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्याकडून आपल्या लोकांसाठी जागा मागितल्या जात आहेत. त्यामुळे भाजपची परिस्थिती अवघड होत आहे. कारण भाजपची सत्ता तर आली, पण त्यासाठी त्यांना बराच मोठा त्याग करावा लागला आहे.

मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्या पदापासून दूर रहावे लागले आहे. त्यामुळे भाजपमधून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. कारण पाहुणे डोईजड होण्याची भीती त्यांना वाटत आहे. भाजप, शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होऊन अजितदादा आता जरा स्थिरस्थावर होत नाहीत तोच पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी ‘मॅडम कमिशनर’ या आपल्या पुस्तकात येरवडा कारागृहाच्या जमिनीवरून अजितदादांच्या भूमिकेविषयी आपले मत मांडले आहे. त्यानंतर राजकीय नेते, बिल्डर आणि सरकारी अधिकारी यांच्या साटेलोट्यावर एकच गहजब उडाला. मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत अजितदादा यांचे नाव घेतल्यामुळे त्यांच्या विरोधकांना आयती संधी मिळाली.

अजितदादांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. त्यानंतर अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडताना आपली यात काहीही भूमिका नाही, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी काही कागदपत्रे सादर केली. अजितदादा यांनी आपल्यावरील आरोप खोडून काढले असले तरी विरोधकांना त्यांना मागे खेचण्याची संधी मिळाली. तसेच भाजपकडूनसुद्धा अजितदादांना बाजूला ठेवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. कारण अजितदादांच्या धडाकेबाज कामाच्या पद्धतीमुळे ते भाजपलाही डोईजड वाटल्यास आश्चर्य वाटू नये. अजितदादा मुख्यमंत्रीपदाची आशा बाळगून फडणवीसांसोबत आले असले तरी त्यांच्यामागील शुक्लकाष्ट काही संपताना दिसत नाहीत.

खरं तर अजित पवार यांंनी राज्याचे मुख्यमंत्री होणे हे काही फार मोठी गोष्ट नाही. कारण राज्याच्या राजकारणावर मराठा लॉबीचा वरचष्मा असतो. पवार घराण्याचा मराठा लॉबीवर प्रभाव आहे, पण इतकी सोपी वाटणारी गोष्ट त्यांच्यासाठी इतकी अवघड होऊन का बसावी, हेही एक गूढ आहे. हिंदीमध्ये एक प्रसिद्ध शेर आहे, अपनोनेही मारा हम को गैरो मे कहाँ दम था, मेरी कश्ती डुबी वहाँ जहाँ पानी बहुत कम था, अशी स्थिती अजितदादांची तर झाली नसेल ना?

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -