घरसंपादकीयओपेडलग्नाच्या गाठी नेमक्या कुठे बांधल्या जातात?

लग्नाच्या गाठी नेमक्या कुठे बांधल्या जातात?

Subscribe

अमर मोहिते

देशभरातील कुटुंब न्यायालयात घटस्फोटाच्या लाखो याचिका प्रलंबित असतील. घटस्फोट मागण्याची काही कारणेही चक्रावून टाकणारी आहेत. पत्नीला साडी नेसता येत नाही, तिला जेवणच बनवता येत नाही, यासह कधी कधी न पटणारी कारणे देऊनही घटस्फोट मागितला जातो. पत्नीकडूनदेखील घटस्फोटासाठी विविध कारणे दिली जातात. पती मारहाण करतो, अनैसर्गिक संबंधांसाठी दबाव टाकतो, मला वेळ देत नाही, अशा कारणांची एक मालिकाच सुरू होते घटस्फोटासाठी. अर्थात सर्व बाजू तपासूनच न्यायालय घटस्फोटासाठी तयार होते.

- Advertisement -

नातं कोणतंही असो राग, रुसवा असतोच. त्यात पती-पत्नीचं नातं म्हटलं की रागाला कशाचंही निमित्त लागतं. अगदी क्षुल्लक कारणही नातं तोडायला पुरेसं ठरतं. त्यामुळेच नात्याची गुंफण घालताना थोडं सावरूनच करावं लागतं. माझं चुकलंच हे मोकळ्या मनाने मान्य करावं लागतं. तरच नातं टिकत आणि त्यात गोडवाही राहतो. अन्यथा वयाची 80 पार केली तरी पती-पत्नीच्या वादावर काही तोडगा निघत नाही. अशा प्रकरणात न्यायालयाकडेही मौन पाळण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. असेच एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणातील पतीचे वय 86 वर्षे आहे, तर पत्नीचे वय 79 वर्षे आहे. या जोडप्याला दोन अपत्य आहेत. एक डॉक्टर तर दुसरा इंजिनिअर आहे. असे छान कुटुंब असताना या वयात यांचा घटस्फोट झाला आहे. या घटस्फोटाला आव्हान देण्यात आले आहे. परिणामी तो घटस्फोट मंजूर होऊनही प्रलंबित आहे. हे सर्व सुरू असताना पतीने न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आमच्या दोघांच्या नावे घर आहे. ते घर विकण्यास परवानगी द्यावी. घर विकल्यानंतर मिळालेल्या पैशातून मी माझा उदरनिर्वाह करेन, असे पतीचे म्हणणे आहे. ही न्यायालयीन लढाई बघता लग्नाच्या गाठी खरंच स्वर्गात बांधल्या जातात का, असा प्रश्न कोणी तरी परमेश्वराला विचारायला हवा.

देशभरातील कुटुंब न्यायालयात घटस्फोटाच्या लाखो याचिका प्रलंबित असतील. घटस्फोट मागण्याची काही कारणेही चक्रावून टाकणारी आहेत. पत्नीला साडी नेसता येत नाही, तिला जेवणच बनवता येत नाही, यासह कधी कधी न पटणारी कारणे देऊनही घटस्फोट मागितला जातो. पत्नीकडूनदेखील घटस्फोटासाठी विविध करणे दिली जातात. पती मारहाण करतो, अनैसर्गिक संबंधांसाठी दबाव टाकतो. मला वेळ देत नाही, अशा कारणांची एक मालिकाच सुरू होते घटस्फोटासाठी. अर्थात सर्व बाजू तपासूनच न्यायालय घटस्फोटासाठी तयार होते, पण कधी कधी गोष्टी सोप्या असूनही त्यावर तोडगा निघत नाही. एक पाऊल मागे घ्यायला कोणी तयार नसते. 86 व्या वर्षी पती पत्नीसोबत राहायला तयार नाही. घर विकाल्यानंतर पत्नी कुठे राहील याचा विचार केला जात नाही. मुलांसोबत पतीला राहायचे नाही. मी स्वतंत्र आहे. मला कोणाचे पैसे नको. माझं घर आहे ते विकू द्या. मी माझ्या भावाकडे राहीन. त्याची मुले माझी काळजी घेतील. घर विकल्यानंतर मिळालेले पैसे मी त्यांना देईन, असा दावा पती न्यायालयात करतो. पत्नी घर सोडण्यास तयार नाही. मी घर सोडून जाणार नाही. हवं असेल तर पतीने माझ्यासोबत येऊन राहावं, असे पत्नी न्यायालयाला सांगते, पण पतीला पत्नीसोबत राहायचेच नाही. घरी राहायला गेलो की पत्नी काही तरी कारण देत पोलिसांत तक्रार करते. मी तिच्यासोबत राहणारच नाही, असे पतीचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हाच पती पुढचे सात जन्म मिळावा यासाठी वटसावित्रीला खास श्रृंगार करून पत्नी पूजा करत असते. हा श्रद्धेचा भाग असतो, मात्र गेल्या अनेक वर्षांपासूनची ही श्रद्धा मोठ्या भक्तीभावाने सुरू आहे. इतरांच्या अनुभवाने माणूस जास्त साक्षर होत असतो. शेजारच्या घरात काय सुरू आहे यात अधिक स्वारस्य असणारी सर्वसामान्यांची मानसिकता असते. या मानसिकतेमुळे सत्यही असत्य वाटू लागते. पती असो की पत्नी तो किंवा ती चुकीचंच वागते आहे हा विश्वास दृढ होत जातो. वय वाढले तरी चूक कोणाची याचा शोध लागत नाही. मग डोळ्यावर पट्टी असलेली न्यायदेवता मार्ग दाखवते. डोळे बंद असलेल्या न्यायदेवतेचा मार्गही कधी कधी पटत नाही. त्यामुळेच तर अनेक घटस्फोटाच्या याचिका न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काही याचिकांच्या सुनावणीत न्यायाधीशांना पती किंवा पत्नी जे काही सांगतात अगदी ते मान्य होणारे नसले तरी ऐकावे लागते. असेच एक वयोवृद्ध न्यायालयाला पत्नी आणि मुलांनी केलेल्या अन्यायाची व्यथा सांगत होते. मला माझी पत्नी आणि दोन्ही मुलांवर विश्वास नाही. त्यांनी मला कंगाल केले आहे. माझ्याकडे पैसे नाहीत. मी 1976 साली जपानमध्ये व्यवसाय सुरू केला. मुलांना अमेरिकेत शिक्षण दिले. तरीही मुलांनी माझी फसवणूक केली आणि सर्व व्यवसायाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. माझे कोट्यवधी रुपये घेतले. पत्नीनेही माझी फसवणूक केली आहे. 1986 पासून तिने माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाहीत. या पतीचे म्हणणे न्यायालयाने शांतपणे ऐकून घेतले.

अशा वादात बोलणार काय आणि समजवणार काय अशी परिस्थिती असते. उतरत्या वयात बालपणीचा हट्टीपणा सुरू झालेला असतो. परिणामी वादावर तोडगा निघणे कठीणच असते, पण काहीना काही तोडगा हा काढावाच लागतो. तसाच पर्याय न्यायालयाने 86 वर्षीय पती आणि 79 वर्षीय पत्नीला दिला आहे. दोघांनी मृत्यूपत्र लिहून ठेवावे. मृत्यूनंतर घर विकून जे पैसे येतील ते त्यांच्या वारसांना द्यावेत, असे लिहून ठेवा, असा पर्याय न्यायालयाने ठेवला. कारण कायद्याच्या कसोटीवर निकाल कधी लागेल हे सांगता येणार नाही. कदाचित या जोडप्याच्या मृत्यूनंतरही निकाल लागू शकतो, असं मत न्यायालयाने यावेळी व्यक्त केले. अशा प्रकरणात ज्या युक्त्या लढवल्या जातात किंवा आपला दावा खरा ठरवण्यासाठी जी काही तयारी केली जाते तीही बुद्धिमत्तेच्या कसोटीवर आधारित असते. तशाच प्रकारचे एक प्रकरण न्यायालयात सुनावणीसाठी आले आहे. या प्रकरणात पती-पत्नीचा घटस्फोट झाला होता. पती पत्नीला देखभाल खर्च देत होता, पण एक रकमी पोटगी देण्यास तयार नव्हता. पोटगीसाठी पत्नीने न्यायालयाचे दार ठोठावले. हे प्रकरण सुनावणीसाठी आले. मी आई-वडिलांकडे राहते. मुलगी शिकायला पुण्याला आहे. मला राहायला घर नाही. पतीने मला एक रकमी 50 लाख रुपये द्यावेत, अशी मागणी पत्नीने न्यायालयात केली. तर माझ्याकडे ऐवढे पैसे नाहीत. माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे. मी त्यांच्याकडे नोकरी करतो, असे पतीने न्यायालयाला सांगितले, मात्र हा व्यवसाय पतीचाच होता. घटस्फोटानंतर पतीने तो व्यवसाय त्यांच्या वडिलांच्या नावे केला, असा खुलासा पत्नीने न्यायालयात केला. यावर न्यायालय संतप्त झाले.

सर्वसामान्यपणे वडील त्यांची संपत्ती किंवा व्यवसाय मुलाच्या नावे करतात. येथे तर मुलाने त्याचा व्यवसाय वडिलांच्या नावे केला. हा प्रकार धक्कादायक आहे. असे कोणी करत नाही. पत्नीला पोटगी द्यायची नाही म्हणून पतीने ही युक्ती लढवली आहे. बायका, पोरं सांभाळता येत नाही तर लग्न करताच कशाला, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. अशी अनेक प्रकरणे न्यायालयात सुनावणीसाठी येत असतात. दावे-प्रतिदावे केले जातात, तर दुसरीकडे विवाहासाठी डझनभर वेबसाईट आल्या आहेत. प्रत्येक समाजाची स्वत:ची विवाहे मंडळे आहेत. कुटुंबातील अनेक मंडळी लग्न जुळवण्यासाठी आतुर असतात. नुकताच एक सर्व्हे आला आहे. प्रेम विवाहापेक्षा बघाबघीचा कार्यक्रम होऊन झालेल्या विवाहांचा घटस्फोट अधिक होतो, असा हा सर्व्हे सांगतो. त्यामुळे आता पुढच्या पिढीने नेमका कसा विवाह करावा, असा प्रश्न प्रत्येक घराला पडला असेल. मात्र पती, पत्नी आणि वो ही जरी नातं तोडणारी व्यक्ती असते. ती व्यक्ती येते आणि जाते. कधी कधी संसार मोडतो तर कधी कधी तो सावरला जातो. सध्या पती-पत्नी आणि वो यामध्ये वोच्या भूमिकेत न्यायालय आहे.

न्यायालय संसार सावरण्यासाठी आटापीटा करत असते. काही तरी तोडगा काढण्याचा प्रयत्न असतो. मार्ग निघेलच याची शाश्वती नसते. अखेर घटस्फोटावर शिक्कामोर्तब होते. न्यायालयाच्या इच्छेविरोधात ही प्रक्रिया पार पडते. कारण न्यायालय हे घर तोडण्यासाठी तयार झालेले नाही. न्यायालय हे न्याय देण्यासाठी स्थापित झाले आहे. तेथे स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत किंवा जातपात असा काहीही विषय नसतो. पारदर्शकपणे न्याय हाच हेतू न्यायालयाचा असतो. पुरावे, साक्ष यावर आरोपांची चाचपणी होते. गेली अनेक वर्षे ही सुरू आहे. काही प्रकरणात खरंच अन्याय झालेला असतो. फसवणूक करून विवाह झालेला असतो. हुंड्यासाठी छळ झालेला असतो. विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा आलेला असतो. तो दुरावा जाणे कठीणच असते. तेथे घटस्फोट हाच पर्याय असतो. त्यामुळेच पुढचे आयुष्य तणावमुक्त होते.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -