घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥
म्हणून, जे जे योग्य व समयानुसार प्राप्त झालेले कर्म असेल, ते ते तू निष्काम बुद्धीने कर.
पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जें ऐसें कर्ममोचक । आपैसें असे ॥
अर्जुना, आणखी एक कौतुक तुला माहीत नाही; ते हे की, निष्काम बुद्धीने केलेले हे कर्म कर्मापासून म्हणजे संसारातून सोडविणारे होते.
देखैं अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥
पहा- अधिकाराप्रमाणे स्वधर्माचे जो आचरण करितो, तो त्या आचरणानेच निश्चतपणे मोक्ष पावतो.
स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥
बाबारे! आपल्या धर्माप्रमाणे आचरण करणे हाच नित्ययज्ञ आहे असे समज; म्हणून त्याप्रमाणे वर्तन केल्यावर त्यात पापाचा रिघाव होत नाही.
हा निजधर्मु जैं सांडे । आणि कुकर्मीं रति घडे । तैंचि बंधु पडे । संसारिक ॥
प्राणी जेव्हा हा स्वधर्म टाकतात आणि वाईट कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त होतात, तेव्हाच जन्ममरणाच्या फेर्‍यात पडतात.
म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥
म्हणून स्वधर्माप्रमाणे आचरण करणे हाच अखंड यज्ञ आहे असे समज; आणि जो पुरुष हा यज्ञ करतो, त्याला काहीसुद्धा बंधन होत नाही.
हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भूत झाला । तो नित्य यज्ञातें चुकला । म्हणौनियां ॥
हे सर्व जग कर्माने बांधले जाऊन ते स्वकर्माला चुकले म्हणूनच मायेच्या पाशात गुंतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -