घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ग्रासा एका अन्नासाठीं । अंधु धांवताहे किरीटी । आढळला चिंतामणि पायें लोटी । आंधळेपणें ॥
हे किरीटी, अन्नाच्या एका घासासाठी धावणार्‍या आंधळ्याच्या पायाला चिंतामणी लागला असता, दृष्टी नसल्यामुळे तो जसा त्याला पायाने लोटून देतो.
तैसें ज्ञान जैं सांडूनि जाये । तैं ऐसी हे दशा आहे । म्हणौनि कीजे तें केलें नोहे । ज्ञानेंवीण ॥
त्याप्रमाणे योग्य ज्ञान प्राप्त नसेल, तर वरील आंधळ्याप्रमाणे स्थिती होते, म्हणून ज्ञानाशिवाय जी जी कर्मे केली जातात ती न केल्यासारखी आहेत.
आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती? । तैसें सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेवीण ॥
आंधळ्या गरुडाला पंख जरी असले, तरी त्यांचा त्याला जसा उपयोग नाही, त्याप्रमाणे योग्य ज्ञानावाचून सत्कर्माचे श्रम व्यर्थ आहेत,
देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी । विधिमार्गा कसवटी । जे आपणचि होती ॥
केवढाली सत्कर्मे म्हणशील तर – अरे अर्जुना, हे पाहा – वर्णविहित धर्माचे आचरण करून जे आपणच विधिमार्गाची कसोटी बनतात (वेदात सांगितल्याप्रमाणे यथाविधी आचरण करितात,)
यजन करितां कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके । क्रियाफळेंसि उभी ठाके । पुढां जयां ॥
ते यज्ञ करू लागले म्हणजे तिन्ही वेद संतोष पावून मान डोलवितात व त्यांच्यापुढे क्रियाही फलप्राप्तीसह उभी राहते.
ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरूप । तींहीं तया पुण्याचेनि नावें पाप । जोडिलें देखें ॥
याप्रमाणे यज्ञातील सोमपान करणारे यज्ञकर्ते (दीक्षित) जे आपणच यज्ञस्वरूप होतात, त्यांनी त्या पुण्याच्या नावाने पापच जोडले, असे समज.
जे श्रुतित्रयांतें जाणोनी । शतवरी यज्ञ करुनी । यजिलिया मातें चुकोनी । स्वर्गा वरिती ॥
यज्ञ करून पापाची जोड कशी केली म्हणशील तर ते ऋक्, यजु व साम या तिन्ही वेदांस जाणून शेकडो यज्ञांनी माझे यजन करितात, परंतु माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून क्षुद्र स्वर्गप्राप्तीची इच्छा करितात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -