घरसंपादकीयदिन विशेषजागतिक हवामान दिन

जागतिक हवामान दिन

Subscribe

जागतिक हवामान दिन दरवर्षी २३ मार्च रोजी साजरा केला जातो. २३ मार्च १९५० मध्ये जागतिक हवामान संस्था स्थापन झाली. म्हणून २३ मार्च हा जागतिक हवामान दिवस म्हणून निवडण्यात आला. हवामानाबाबत संपूर्ण जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी व हवामानाचे महत्त्व समजावे, तसेच हवामान चांगले राहण्यासाठी कोणती दक्षता घेतली पाहिजे, कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे याविषयी जाणीव-जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने २३ मार्च जागतिक हवामान दिवस म्हणून महत्त्वपूर्ण आहे. माणसाने विज्ञानाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात प्रगती केली, परंतु हे करीत असताना निसर्गचक्राच्या गतीला बाधा निर्माण झाली.

त्यातूनच पर्यावरणाचा समतोल ढासळत गेला. सुरुवातीला याचे प्रमाण कमी होते, परंतु आता मोठ्या प्रमाणात रासायनिक, आधुनिक अशा अनेक साहित्याच्या वापरामुळे हवामानाच्या हानीचा उच्चांक गाठला गेला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीवरील पर्यावरणाच्या चक्राचा समतोल बिघडलेला दिसून येतो. मानवनिर्मित आधुनिकीकरणामुळे पृथ्वीवर हवामानात मोठ्या प्रमाणात अनपेक्षित बदल घडत आहेत. हवामानातील या अनपेक्षित बदलांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे, मानवी साधनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान तर होतेच शिवाय मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते.

- Advertisement -

मानवासोबतच इतर प्राणी, पक्षी यातून सुटू शकत नाहीत. कारण पृथ्वीवरील सजीवांची जैविक साखळी आहे ती एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे एका घटकातील बदलाचा परिणाम इतर घटकांवर झालेला दिसून येतो. पृथ्वीवर सजीव सृष्टी व मानवी जीवनासाठी पोषक वातावरण असल्याने पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व टिकून आहे.

मानव ज्या ठिकाणी वास्तव्य करतो त्याच्या सभोवतालच्या हवामानाचे नाते त्याच्याशी अतिशय घनिष्ठ असते. त्यामुळेच मानवाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. म्हणून हवामान हे मानवाच्या जगण्याची आवश्यकता आहे. कारण हवामानाचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होतो. मानवाचे भरण-पोषण करण्यात हवामानाचे नाना आविष्कार महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे हवामानाचे एक प्रकारे आविष्कारच आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -