घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पैं अर्जुना माझे ठायीं । आपणपेंवीण सौरसु नाहीं । मी उपचारें कवणाही । नाकळें गा ॥
अर्जुना माझ्या ठिकाणी आत्मत्व समर्पण केल्याशिवाय दुसर्‍या कोणत्याही उपचाराने वश होणार नाही.
एथ जाणीव करी तोचि नेणें । आथिलेंपण मिरवी तेंचि उणें । आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥
मजविषयी ज्ञान झाले असा ज्यास गर्व असेल त्यालाच काही समजले नाही, मी कृतार्थ झालो असे जो दाखवितो, तोच त्याच्या कृतार्थतेत उणेपणा; मी मुक्त झालो असे जो म्हणतो, तो मुक्त झालाच नाही असे समजावे.
अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपे हन जे हुटहुटी । ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥
अथवा हे किरीटी, आम्ही यज्ञ केले, आम्ही धर्म केला किंवा आम्ही तप केले, अशी जे घमेंड बाळगतात, त्यांना माझ्या प्राप्तीच्या मानाने पाहिले असता काडीइतकीही योग्यता नसते.
पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदांपासूनि असे आगळें? । कीं शेषाहूनि तोंडाळें । बोलकें आथी? ॥
हे पाहा, ज्ञानबलात वेदाहून कोणी अधिक जाणता आहे काय? किंवा हजारमुखांच्या शेषापेक्षा बोलणारा कोणी अधिक आहे काय?
तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे । एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥
पण तो शेषही ज्याच्या अंथरुणाखाली दडतो, म्हणजे तो शेवटी परमात्म्याचे अंथरूण होतो, वेदही ‘नेति नेति’ म्हणजे ‘ही वस्तू परमात्मा नव्हे, ही वस्तू परमात्मा नव्हे’ इतकेच म्हणून स्वस्थ राहतो. तसेच सनकादिक परमात्मस्वरूपनिर्धाराविषयी भांबावून गेले आहेत.
करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजे शूळपाणी । तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ॥
तपस्व्याविषयी विचार करू लागले तर महादेवाच्या योग्यतेला दुसरा कोण लागेल? परंतु त्यानेही अभिमान सोडून ज्याचे पादोदक म्हणजे भागीरथी आपले मस्तकावर धारण केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -