घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तरी ज्ञानयज्ञु तो एकरूपु । जेथ आदिसंकल्पु हा यूपु । महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥
ज्ञानयज्ञाचे लक्षण कोणते म्हणशील, तर ज्या ठिकाणी ‘ब्रह्माचे बहुत प्रकारचे होणे’ म्हणजे आदिसंकल्प हाच यज्ञस्तंभ; पंचमहाभूते हा यज्ञमंडप; जीव व ईश्वर यांचा भिन्नपणा हाच पशु;
मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण । हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ॥
मग पंचमहाभूतांचे जे विशेष गुण ते, अथवा पाच इंद्रिये आणि पंचप्राण हेच यज्ञाचे साहित्य व ब्रह्माविषयी जे अज्ञान तेच तूप.
तेथ मनबुद्धीचिया कुंडा । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा । साम्य तेचि सुहाडा । वेदिका जाणें ॥
हे अर्जुना, त्या यज्ञात मन व बुद्धि ही दोन कुंडे असून या दोन कुंडात ज्ञानरूप अग्नी प्रदीप्त केला जातो; सुख व दुःख यांचे ठिकाणी जी समता तीच बळकट वेदिका म्हणजे यज्ञकुंडाचा ओटा आहे, असे तू समज.
सविवेकमतिपाटव । तेचि मंत्र विद्यागौरव । शांति स्रुक् स्रुव । जीवु यज्वा ॥
आत्मानात्मविचार करण्याविषयी जे बुद्धीचे कौशल्य तेच यज्ञातील मंत्र होत, विद्येचे महत्त्व ही स्रुक् व शांती ही स्रुवा (स्रुक् व स्रुवा ही दोन हवन साधने) व जीव हा यज्ञ करणारा यजमान होय.
तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें । ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥
तो यज्ञ करणारा जीव अनुभवरूप पात्रांनी ब्रह्माच्या विचाररूप महामंत्रानी ज्ञानरूप अग्निहोत्री कर्माने, जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करितो.
तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये । आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥
त्या वेळेस अज्ञान नाहीसे होऊन यज्ञ करणारा व यज्ञ क्रिया ही जागच्या जागीच राहतात. नंतर आत्मब्रह्मैक्यरसांत जीवरूपी यजमानाचे जेव्हा अवभृतस्नान होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -