घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकीं । तोचि म्हणौनि ॥
पार्था, अशा दृष्टीने जो विचार करतो, तोच अद्वितीय व तोच तिन्ही लोकी संग्रह न करणारा, असे जाण.
ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण बोले ॥
अशा प्रकारे आपल्या स्वताच्याहीपेक्षा विशेष गौरवाने श्रीकृष्णांनी साधूची मुख्य लक्षणे सांगितली.
जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥
जो सर्व ज्ञानी लोकात श्रेष्ठ व सर्व पाहणार्‍यांच्या दृष्टीचा प्रकाशक आणि ज्या समर्थाच्या केवळ संकल्पाने विश्वाची रचना होते,
प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिया यशा धाकुटें । वेढूं न पुरे ॥
ॐकाराच्या बाजारात जे शब्दब्रह्मरूप उत्तम वस्त्र निघाले ते त्याच्या यशास आच्छादण्यास पुरत नाही; म्हणजे श्रीकृष्णाचे तर नाहीच, परंतु त्याच्या यशाचेही वेद वर्णन करू शकत नाहीत;
जयाचेनि आंगिकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे । म्हणौनि जग हें वेसजे । वीण असे तया ॥
ज्याच्या अंगाच्या तेजाने सूर्य आणि चंद्र यांच्या व्यवहारास प्रतिष्ठा येते, तेव्हा हे जग त्याच्या आधाराशिवाय आहे काय?
हां गा नामचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचें । गुण एकैक काय तयाचे । आकळशील तूं ॥
पहा की, ज्याच्या नुसत्या नावापुढे गगन तुच्छ दिसते, असे याचे किती गुण तू जाणशील?
म्हणौनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें । दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥
म्हणून ही स्तुती आता पुरे. कारण अशा लक्षणांनी युक्त जो श्रीकृष्ण भगवान तो ज्या साधूचे वर्णन करतो, त्याची लक्षणे आम्ही सांगू शकत नाही; परंतु काही सांगावी म्हणून सांगितली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -