घरमनोरंजन‘आनंदयात्री’ सुमधूर पुष्प पहिले

‘आनंदयात्री’ सुमधूर पुष्प पहिले

Subscribe

महाराष्ट्राने आता सर्वच क्षेत्रात आपली मोहोर उमटवलेली आहे. कलेच्याबाबतीत विचार करायचा झाला तर त्याचेही जगभर कौतुक झालेले आहे. संगीत, नाट्य, अभिनय यात दिग्गजांनी दाखवलेली प्रगल्भता फक्त प्रेरणा देणारी ठरलेली नाही तर महाराष्ट्र समृद्ध कसा होईल हे त्यांनी पाहिलेले आहे. संगीतकारांची अजरामर गीते जरी आठवली तरी त्यासाठी काम करणारे व्यक्ती किती महान होते, याचा साक्षात्कार होतो. प्रत्येक संगीतकाराचे एक वैशिष्ठ्य राहिलेले आहे. त्याचबरोबर त्यांची विविधताही दिसलेली आहे. झी मराठीने हा संगीताचा अनमोल खजिना काही वर्षांपूर्वी ‘नक्षत्राचे देणे’ या कार्यक्रमातून रसिकांना बहाल केला होता. स्टार प्रवाह या वाहिनीनेसुद्धा आनंदयात्री’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘शब्दसुरांची अनोखी मैफिल’ थेट रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे ठरवलेले आहे.

योगायोग म्हणजे या आनंदयात्रीसाठी जे संगीतकार, गायक, गीतकार, लेखक, त्यांनी निवडलेले आहेत. त्यात प्रामुख्याने सुधीर फडके, ग.दि.माडगुळकर, पु.ल.देशपांडे यांची सर्वत्र जन्मशताब्दी साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हे आनंदयात्री आपल्या भेटीला येत आहेत हे या कार्यक्रमाचे विशेष म्हणावे लागेल. र्‍हयदयनाथ मंगेशकर यांचासुद्धा या आनंदयात्रीच्या पुष्पात सहभाग आहे. पहिले पुष्प म्हणून स्टार प्रवाहने गायक, संगीतकार, निर्माते, देशप्रेमी सुधीर फडके यांची निवड केली आहे. आनंदयात्रीचे हे पहिले सुमधूर पुष्प आहे जे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित केले जाणार आहे. श्रीधर फडके, सुरेश वाडकर, रविंद्र साठे, अशोक पत्की आदींचा या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग आहे.

- Advertisement -

सुधीर फडके संगीताच्या क्षेत्रात येण्यापूर्वी देशाबद्दल त्यांना सार्थ अभिमान होताच. स्वातंत्र्यलढ्यात ते सहभागीही झाले होते, अशी आठवण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी एव्हीच्या माधमातून सांगितली. श्रीधर फडके हे सुधीर फडके यांचे चिरंजीव. आज गायनाच्या क्षेत्रात मला जे काही मानाचे स्थान मिळालेले आहे ते माझ्या वडिलांमुळे. ते शिस्तप्रिय होते. मी जेव्हा संगीतबद्ध केलेली गाणी त्यांना ऐकवत होतो, त्यावेळी मुलगा आणि वडील या नात्यापेक्षा संगीतातली समरसता त्यांना महत्त्वाची वाटत होती.त्यामुळे जिथे चांगले तिथे कौतुक केलेले आहे. इतरवेळी नापसंतीही दर्शवलेली आहे. त्यामुळे त्यांना काही सांगायचे म्हणजे मला बराच विचार करावा लागत होता, अशी आठवण श्रीधर फडके यांनी सांगितली. एका अक्षरातसुद्धा सूर दडलेला आहे याची काही प्रात्यक्षिके या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पहायला, ऐकायलाही मिळणार आहेत.

गायक रविंद्र साठे यांना सर्वप्रथम आशा भोसले यांच्याबरोबर गाण्याची संधी प्राप्त झाली. पहिल्यावहिल्या प्रयत्नात बाबुजी आणि आणि आशाजी कशा वाटल्या याबद्द्लचे किस्से सांगत असताना त्यांनी गायिलेली गाणी इथे ऐकायला मिळणार आहेत. सुरेश वाडकर यांनीसुद्धा काही गाणी इथे सादर केली. पुरुष संगीतकारांनी एखाद्या गायिकेसाठी गाणे संगीतबद्ध केलेले आहे, त्यात बर्‍याच संगीतकारांकडून गाणे श्रवणीय होण्याच्यादृष्टीने प्रयत्न झाल्याचे सुरेश वाडकर यांनी यावेळी सांगितले. आशा भोसले यांनी गायिलेले ‘विकत घेतला शाम’ हे गाणे त्यांनी यावेळी सादर केले. अशोक पत्की यांनीसुद्धा काही गाणी सादर करुन आठवणी जागवल्या. अभिनेत्री गिरिजा ओक हिने या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -