घरमनोरंजनमुंबईतून सर्कस गायब

मुंबईतून सर्कस गायब

Subscribe

तीन दशकांपूर्वी महामनोरंजन म्हणून सर्कसकडे पाहिले जात होते. नाटक, चित्रपट अस्तित्वात असतानाही प्रौढांबरोबर लहान मुलांना सर्कसचेही आकर्षण होतेच. चित्तथरारक प्रात्यक्षिके, कुतूहल निर्माण करणारे जादुचे प्रयोग, ह्रिंस्त्र प्राण्यांच्या कवायती आणि गमजा करणारे विदूषक सारेकाही मोहवून टाकणारे होते. पाऊस थांबला की मुंबईतील बर्‍याचशा मैदानात सर्कसचे तंबू उभारले जात होते. आता मुंबईतून सर्कस गायब झालेली आहे. या सर्कसवाल्यांनी ठाणे, वाशी असा प्रवास करत बदलापूर, पनवेलपर्यंत जाणे पसंत केलेले आहे.

सर्कस ही कला परदेशात जरी उदयाला आली असली तरी भारतात त्याचे खेळ करण्यात विष्णुपंत छत्रे यांनी पुढाकार घेतला होता. पुढे नारायण वालावलकर यांनीसुद्धा हा व्यवसाय आजमावून पाहिला होता. सर्कसची निर्मिती खर्चिक असली तरी साधारण तीन दशकांपूर्वी त्यातून फायदाही होत होता. मुख्य खेळ करण्यासाठी प्रशस्त जागा, दीडशे-दोनशे कलाकारांना एकत्रित रहाता येईल असे आजुबाजूला तंबू शिवाय प्राण्यांची निगरानी, सर्कस पहायला येणार्‍या प्रेक्षकांसाठी कार पार्किंगची सोय, आजुबाजूचे पादचारी यांना आकर्षित करण्यासाठी छोटेखानी प्रात्यक्षिक रंगमंच अशी संपूर्ण सुविधा असलेले मैदान सर्कस मालकाकडून पाहिले जात होते. फार वर्षांपूर्वी वडाळा येथील क्रीडा भवन समोरील मैदानात, बांद्रा-कुर्ला मार्गावरील मैदान, मुंबई विद्यापीठ समोरील मैदान, आझाद मैदान, चुनाभट्टी हायवेवरील मैदान इथे प्रामुख्याने सर्कस खेळाचे आयोजन केले जात होते. आजचा बालप्रेक्षक हा मोबाईल व इतर उपलब्ध असलेल्या मनोरंजक गोष्टींच्या स्वाधीन झाला असला तरी सर्कसवाल्यांनी प्रेक्षकांच्या अभिरुचीप्रमाणे स्वत:ला बदलून घेतले आहे. आजच्या युगातले अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके आपल्या सादरीकरणात आणलेली आहेत. पण मुंबईतील मैदाने प्रदर्शन, महासांस्कृतिक सोहळे, राजकीय नेत्यांच्या सभा यांच्या तारखेत अडकल्यामुळे सर्कसवाल्यांना अपंत तारीख मिळेलच याची खात्री देता येत नाही आणि मिळाली तर अनेक जाचक अटींना सामोरे जाणे सध्यातरी कठीण आहे.

सर्कस या खेळाचे ज्यावेळी प्रस्त होते त्यावेळी या खेळावर वेळेचे बंधन नव्हते. ध्वनी प्रदुषणाविषयी फारशी जागृती नव्हती. ट्राफिक, कार पार्कींग ही समस्या त्यावेळी फारशी जाणवत नव्हती. मनोरंजनाची साधनेही फारशी उपलब्ध नव्हती, त्यामुळे सर्कस या खेळाला सामान्यांपासून ते श्रीमंत प्रेक्षक आवर्जून येत होते. एकाचवेळी दीड ते दोन हजार प्रेक्षक सर्कसचा आनंद घेऊ शकतील अशी सुविधा केली जात होती. महत्त्वाचं म्हणजे तेवढ्या संख्येने प्रेक्षकही येत होते. सकाळी ९ वाजल्यापासून या खेळाला प्रारंभ व्हायचा ते अगदी रात्री १२ वाजेपर्यंत प्रेक्षकांची वर्दळ सर्कसच्या आवारात असायची. दररोज चार खेळ हे होत होते. आता ही सर्कस ठाणे, वाशी यांच्याही पुढे होताना दिसते. याचा अर्थ अपेक्षित प्रतिसाद मिळतोच असे नाही. शनिवार, रविवार फारफार तर तीन शो होतात, नाहीतर एकाच शोवर त्यांना समाधान मानावे लागते. मुंबईत शो करायचे म्हणजे वेळेची मर्यादा, संमतीपत्रासाठी करावी लागणारी खटपट, त्यातून पोलिसांचे नियंत्रण, आजुबाजूला राहणार्‍या वस्त्यांच्या तक्रारी यांचा त्रास आयोजकांना अधिक होतो. परिणामी मुंबईत खेळ न केलेले बरे या त्यांच्या वृत्तीमुळे सर्कस मुंबईतून गायब झालेली आहे.

- Advertisement -

विदुषक, मानवी मनोरे याचे जरी प्रेक्षकांना आकर्षण असले तरी हत्ती, वाघ, सिंह या प्राण्यांची प्रात्यक्षिके पहायला मिळावीत हा प्रेक्षकांचा आग्रह असतो. केंद्र सरकारने प्राण्यांना घेऊन चित्तथरारक प्रात्यक्षिके करता येणार नसल्याचे बंधन आणल्यामुळे सर्कसवर त्याचा जबरदस्त परिणाम झालेला आहे. प्रेक्षक फिरकत नसल्याचे हे मुख्य कारण आहे. सर्कस व्यवसायात आर्थिक उलाढाल होत नाही म्हणताना त्याचा कामगारांच्या कलेवरही परिणाम झालेला आहे. जीवाची पर्वा न करता केल्या जाणार्‍या कसरतींना योग्य मानधन मिळत नाही म्हणताना बर्‍याचशा कलाकारांनी या कलेपासून आपली सुटका करून घेतलेली आहे. अपोलो, रॉयल, जेमिनी, ग्रेट अमर, रेम्बो, बॉम्बे, राजकमल, ग्रेट इंडिया आदी कितीतरी सर्कसची नावे सांगता येतील ज्यांनी एकेकाळी मुंबईकरांचे छान मनोरंजन केले होते. आता हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच सर्कस आज कार्यरत आहेत. गोल्डन या सर्कसने पाळीव प्राण्यांना आपल्या सर्कसमध्ये प्राधान्य देऊन प्रेक्षक कसे आकर्षित होतील हे पाहिलेले आहे.

प्रयत्नांचे भागीदार
ज्या गोष्टींबद्दल प्रेक्षकांना आकर्षण आहे त्याचे प्रतिबिंब बर्‍याचवेळा मालिकेत, चित्रपटात इतकेच काय तर रिअ‍ॅलिटी शोमध्ये उमटलेले आहे. राज कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने सर्कसच्या कार्यपद्धतीवर प्रकाशझोत टाकला होता. यात त्यांनी विदुषकाच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले होते. चित्रपट म्हटलं की त्याला मर्यादा असतात; पण कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ हा एकमेव चित्रपट चार तासांच्या जवळपास जाईल असा तयार केला होता. अजिज मिर्झा, कुंदन शहा यांनी जेव्हा मालिकेची निर्मिती करायचे ठरवले त्यावेळी सर्कस हा विषय त्यांनी प्रथम घेतला होता. किंग खान शहारुख खान याचे चित्रपटसृष्टीतले पदार्पण याच मालिकेमुळे झाले होते. आशुतोष गोवारीकर, मकरंद देशपांडे यांचा शहारुखबरोबर या मालिकेत सहभाग होता. हयात या पंचतारांकीत हॉटेलने तर डायनिंग हॉलमध्ये छताला जाळे बांधले होते, जेणेकरुन पर्यटकांना, खवैय्यांना सर्कसमधील प्रात्यक्षिके पहाता येतील अशी सोय केली होती. कॉमेडी सर्कस या रिअ‍ॅलिटी शोची संकल्पना सर्कसपासूनच पुढे आली. ती कलादिग्दर्शनामध्ये दिसेल असे पाहिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -