घरमनोरंजनहाऊस ऑफ वॅक्स

हाऊस ऑफ वॅक्स

Subscribe

हॉलीवूड येथे तयार झालेला एक त्रिमिती चित्रपट.मेणाचं (खरं तर मेणाच्या पुतळ्यांचं) घर. हा खरं म्हणजे अप्रतिम भयपट होता आणि त्यामुळेच त्रिमितीचे परिमाण मिळाल्यानं तर त्याची भयकारकता आणखीच वाढली होती आणि भयाचा, थरकाप होण्याचा अनुभव प्रेक्षकांना हवाहवासाच असतो हे माहीत असल्यामुळेच या त्रिमिती चित्रपटाला पे्रक्षकांनी दाद दिली होती.

चित्रपटसृष्टी बहरत गेल्यावर अर्थातच मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण झाली आणि त्या स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी निर्माते, तंत्रज्ञ अनेक नव-नवीन उपाय शोधू लागले. दुसरे असेे की, स्पर्धा केवळ इतर निर्मात्यांच्या चित्रपटांचीच नव्हती, तर त्यापेक्षाही मोठा धोका निर्माण झाला होता, टीव्ही-अर्थात दूरचित्रवाणीचा! कारण त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या करमणूक उपलब्ध झाली होती. या प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे कसे खेचून आणायचे याचा विचार करणे भाग होते. त्यामुळे रंगीत चित्रपट, सिनेमास्कोप चित्रपट, 70 एम.एम. चित्रपट तसेच सिनेरामा, सर्करामा असे अनेक प्रयोग करण्यात आले. काही निर्मात्यांनी तर चित्रपटगृहांच्या सहाय्याने प्रसंगावशात वेगवेगळे वास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्ी व्यवस्था केली तर काही चित्रपटागृहांत भूकंपासारख्या, वा कडे कोसळण्याच्या प्रसंगी प्रेक्षकांच्या आसनांना जाणवेल असा हादरा बसेल, अशी व्यवस्थाही केली होती. ती बरीच खर्चिक होती.

यातील रंगीत चित्रपट नित्याचेच झाले आणि सिनेमास्कोप आणि 70 एम.एम. सोडले, तर बाकी युक्त्यांना फारसे यश मिळू शकले नाही. त्यापैकी एक म्हणजे थ्री-डी. अर्थात थ्री डायमेन्शनपट. सपाट पडद्यावरील अनुभवापेक्षा वेगळा, त्रिमिती परिणाम साधण्यासाठी वेगळे तंत्र वापरावे लागत असे. ते चांगले खर्चिक असल्याने चित्रपटातील मोजक्याच, प्रेक्षकांना आकृष्ट करणार्‍या गोष्टींसाठी ते वापरण्यात येई. आपल्या देशामध्येही असे चित्रपट तयार करण्यात आले, तरी येथेही त्यांची तीच गत झाली. असे का व्हावे, याची कारणे म्हणजे एखादा चित्रपट सुमार गणला गेला तरीही प्रचंड यशस्वी होतो आणि दर्जेदार म्हणून नावाजला गेलेला विविध बक्षिसे मिळवूनही प्रेक्षकांच्या मर्जीला का उतरत नाही, याचा शोध घेण्याइतकेच अवघड आहे.

- Advertisement -

असे असले तरी हॉलीवूड येथे तयार झालेला एक त्रिमिती चित्रपट मात्र आजही अनेकांच्या स्मरणात आहे. अपवाद समजूया फारतर, त्याचं नाव होतं ‘हाऊस ऑफ वॅक्स’. मेणाचं (खरं तर मेणाच्या पुतळ्यांचं) घर. हा खरं म्हणजे अप्रतिम भयपट होता आणि त्यामुळेच त्रिमितीचे परिमाण मिळाल्यानं तर त्याची भयकारकता आणखीच वाढली होती आणि भयाचा, थरकाप होण्याचा अनुभव प्रेक्षकांना हवाहवासाच असतो हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यामुळेच या त्रिमिती चित्रपटाला पे्रक्षकांनी दाद दिली होती. याची जाहिरातच मुळी द अल्टिमेट डायमेन्शन इन टेरर! म्हणजे भयाची अखेरची मिती! म्हणजे यापेक्षा अधिक भीती वाटावी असे काहीही नाही. अशी करण्यात आली होती आणि तो स्टिरिओव्हिजन थ्रीडी मध्ये निर्माण करण्यात आला होता. शिवाय वास्तवाचा जास्तीत जास्त अनुभव देण्यासाठी वापरण्यात आलेले तंत्र असे थ्रीडीचे वर्णन करण्यात आले होते. यात पडद्यावरील एखाद्या व्यक्तीने काही वस्तू देण्यासाठी हात पुढे केला, तर थ्रीडी च्या खास चष्म्यातून पाहताना तो तुम्हालाच काहीतरी देत आहे, असे वाटते आणि अनवधानाने तुम्ही हात पुढे करता. एखादी वस्तू फेकली गेली तर ती आपल्या अंगावर तर येणार नाही ना अशी भीती वाटायला लागते आणि कुणी त्वेषानं झेपावलं तर आता आपली धडगत नाही, असंही वाटायला लागतं, अशी थ्रीडीची करामत असते.

या सार्‍याची जाण ठेवून ‘हाऊस ऑफ वॅक्स’ ची कथा निवडण्यात आली होती. ती साधारण अशी एक शिल्पकार अद्वितीय पुतळे बनवत असतो. अगदी हुबेहूब, इतके की, खर्‍याचाच भास व्हावा. अर्थातच त्याची करामत पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. त्याला दादही भरभरून मिळते. पण एका चाणाक्ष माणसाच्या ध्यानात असे येते की, त्याने ज्या व्यक्तींचे पुतळे बनवले आहेत, त्या व्यक्ती मात्र काही काळापासून नजरेला पडेनाशा झाल्या आहेत. अर्थातच तो मग हे गूढ शोधून काढण्याच्या मागे लागतो. बरोबर त्याला मदत करण्यासाठी त्याची पे्रयसीही असते. त्या दोघांची मोहीम पुढे सरकत असते. काहीकाळ शिल्पकाराला त्याचा पत्ता नसतो. पण कळल्यानंतर मात्र तो चांगलाच अस्वस्थ होतो. कारण या जोडीला रहस्य उकलण्यात यश आले तर त्याला सर्वस्वच गमवावे लागणार असते. त्यांना रोखण्यासाठी तो विविध मार्गांचा अवलंब करतो; पण ही जोडी त्याला दाद न देता आपले काम पुढे नेतच राहते. प्रेयसी त्याला मदत करण्यासाठी त्या पुतळ्यांच्या स्टुडिओत प्रवेश मिळवते. आणि तेथे बारकाईने शोध घेण्याचे काम सुरू करते.

- Advertisement -

सुरुवातीला तिला संशय घेण्यासारखे काहीच आढळत नाही. तरी तिचा प्रियकर मात्र अजूनही संशयमुक्त झालेला नसतो आणि तो शिल्पकारावर नजर ठेवूनच असतो. प्रेयसीही आपल्या परीने त्याला मदत करण्याचे काम करत असते. आता त्याच्या स्टुडिओत तर तिने प्रवेश मिळवलेला असतोच आणि अर्थात मग प्रियकरही तेथे जातो. एका प्रसंगी ती एका पुतळ्यावरचं मेण बिघडल्यासारखं दिसल्यानं कुतूहलानं तो जरासा खरवडून बघते आणि तिला प्रचंड हादरा बसतो. कारण आत थेट मानवी त्वचाच असल्याचे तिला जाणवते. भीतीने तिचा थरकाप होतो. पुतळ्यांच्या हुबेहूबपणाचं रहस्य अशा भीतीदायक पद्धतीनं उलगडतं. तिचा थरकाप होतो. कारण आता शिल्पकार तिचाच पुतळा बनवणार असतो. अन् मग अर्थातच रहस्य कायम ठेवण्यासाठी शिल्पकार लगेचच तिलाच मारायचा प्रयत्न करतो आणि प्रियकर तो हाणून पाडतो इ.
यात प्रेयसीला आपले रहस्य कळल्याचे जाणवल्यानंतर शिल्पकार अस्वस्थ होऊन तिच्यावर झेपावतो, तेव्हा ती जिवाच्या आकांताने किंचाळते. त्यावेळी प्रेक्षागृहातूनही भीतीच्या अनेक किंकाळ्या ऐकू येत… कारण अर्थातच तो शिल्पकार आता आपल्यालाच धरणार अशी एकतानतेने चित्रपट बघणार्‍यांची समजूत होते आणि त्यांना थ्रीडी तंत्राचा विसर पडतो. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका व्हिन्सेंट प्राईस याची होती. चार्लस ब्रॉन्सन, फिलिस कर्क आणि कॅरलिन जोन्स हे अन्य कलाकार होते.

हा चित्रपट अर्थातच चांगला चालला, अनेकांनी तो पुन्हा पुन्हा पाहिला. आपल्याकडेही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरीही या नंतर फार काही थ्रीडीपटांची निर्मिती झाली नाही. एक तर ते खास चष्मे देणे घेणे यात प्रयास होते, ते काम अवघड आणि वेळखाऊ होते हे तर खरेच आणि दुसरे म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसादही या नंतरच्या थ्रीडीपटांना फारसा मिळाला नव्हता.असे असले तरी सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून काही ‘हाऊस ऑफ वॅक्स’ला मान मिळालेला नाही. सर्वात यशस्वी थ्रीडीपट आहे ‘किस मी केट’ या नावाचा. पण त्या काळी तो आपल्याकडे प्रदर्शित झाल्याचे आठवत नाही, अर्थात असे प्रदर्शित न झालेले अनेक चित्रपट आहेत, जसे की लॉर्ड जिम, त्यातलाच हा एक.

-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -