घरमनोरंजन‘खळी’ विवाहोत्सुक व्यक्तींचा कोंडमारा

‘खळी’ विवाहोत्सुक व्यक्तींचा कोंडमारा

Subscribe

‘नाट्यमंदार’ ही राजाराम शिंदेंची नाट्यसंस्था आहे. मराठी रंगभूमीला आणि नाट्य चळवळीला स्थिरता देण्यात शिंदे यांचा मोठा वाटा होता. अनेक दर्जेदार नाटकांची त्यांनी निर्मिती केलीच; पण त्याहीपलीकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत अध्यक्षपदी राहून नाट्य चळवळीला चालना देण्यात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. मंदार शिंदे हा त्यांचा चिरंजीव. त्यांच्या पश्चात अनेक नाटकांची निर्मिती करत आहे. विप्रो क्रिएशनच्या सहकार्याने ‘खळी’ या नाटकाची त्याने निर्मिती केलेली आहे.

मराठी रंगभूमीवर सध्या दोन प्रकारचे चित्र पहायला मिळते. एकाच महिन्यात बाराहून अधिक नाटकांची निर्मिती होत आहे याचा अर्थ नाटकाला चांगले दिवस आले आहेत असे म्हणता येणार नाही. एकंदरीत वर्षाअखेरीस विविध संस्थांच्यावतीने ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्यात आपली वर्णी लागावी त्यादृष्टीने सर्वच नाट्य संस्थांचा हा प्रयत्न आहे. वस्तूस्थिती अशी आहे की एखाद दुसरे नाटक बर्‍यापैकी चाललेले आहे. झी मराठी वाहिनीचे पाठबळ ज्या नाटकांना लाभलेले आहे ती नाटके बर्‍यापैकी चाललेली आहेत. अन्य नाट्य संस्था आर्थिक गणित लक्षात घेऊन नाटकाची निर्मिती करीत आहेत. कमी कलाकार, प्रभावी विषय हे सध्या नाटकाचे सूत्र झालेले आहे. ‘नाट्यमंदार’ आणि ‘विप्रो क्रिएशन’ या संस्थेने ‘खळी’ हे नाटक रंगमंचावर आणलेले आहे. त्याचे सूत्रसुद्धा याच रचनेतले आहे. नाट्यमंदारच्या वतीने मंदार शिंदे तर विप्रो क्रिएशनच्यावतीने संध्या रोटे, प्रांजली मते यांनी या नाटकाची निर्मिती केलेली आहे. शिरिष लाटकर हा या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक आहे. वर सुचवल्याप्रमाणे तीन कलाकार, प्रभावी विषय ही त्याची खासियत शिरिषने यात जपलेली आहे.

शिरिष एक उत्तम लेखक आहे हे त्याने नाटकाच्या माध्यमातून पटवून दिलेले आहे. सध्या ज्या विविध मालिका दाखवल्या जातात त्यात प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेल अशा कथा असतात; पण या कथेची भाषा प्रेक्षकांच्या जीवनाशी निगडीत असायला हवी हे तारतम्य ज्या लेखकाने जपलेले आहे तो लेखक छोट्या पडद्यावर यशस्वी गणला गेलेला आहे. शिरिष त्यापैकी एक आहे. मानव हा सरकारी कर्मचारी आहे. त्याचा स्वत:चा विवाह संस्थेवरचा विश्वास उडालेला आहे. गव्हाळ रंग, साधी राहणी, कामातल्या जबाबदार्‍या, चौकसवृत्ती यामुळे त्याचे लग्न लांबणीवर पडलेले आहे. त्यामुळे आपल्या जीवनात आता कोणीही स्त्री डोकावणार नाही अशा उद्देशाने त्याने राहणे पसंत केलेले आहे.

- Advertisement -

चिंगी ही त्याची बहीण. तिचेसुद्धा असेच काहीसे व्यक्तिमत्त्व. ब्युटीपार्लरमध्ये जाऊन तिचे व्यक्तिमत्त्व खुलवले तर तिचा विवाह होऊ शकतो यासाठी मानव प्रयत्न करत आहे. उपासना ही एक ब्युटीशियन आहे. तिचे स्वत:चे ब्युटीपार्लर आहे. संदेश तिच्याशी सल्लामसलत करून चिंगीला लग्नासाठी तयार करतो. त्यानिमित्ताने मानवचे उपासनाकडे जाणे-येणे वाढते. उपासना हिचेसुद्धा लग्नाचे वय उलटलेले आहे. चहा-पोह्याच्या कार्यक्रमाला ती कंटाळलेली आहे. त्यामुळे तिचासुद्धा विवाहावरचा विश्वास उडालेला आहे. रूपरंग, देखणेपण असतानासुद्धा वराच्या अवाजवी अपेक्षांमुळे तिचे लग्न झालेले नाही. माणसाचे कर्तृत्व दिसण्यात नसते तर त्याच्या विचारांत असते अशा काहीशा घटना मानव आणि उपासना यांच्या भेटीत एक एक करून उलगडायला लागतात. परिणामी हे दोघे एकमेकांसाठी पूरक असल्याचे सांगणारे हे नाटक आहे. प्रत्येक घरातली ही समस्या असल्यामुळे प्रेक्षक पुढे काय घडणार या उत्सुकतेपोटी नाटक पाहण्यासाठी सज्ज असतो.

शिरिषने लिहिलेला हा विषय सांगायला सोपा आहे; पण तो जेवढ्या प्रभावीपणे लिहिलेला आहे तेवढ्याच मनोरंजक पद्धतीने मांडलाही गेला पाहिजे. तीनच पात्र या नाटकात असल्यामुळे दिग्दर्शकाइतकीच कलाकारांची जबाबदारी वाढलेली आहे. यातले संवाद तंतोतंत जाणे गरजेचे आहे आणि त्याला आवश्यक असणारा अभिनयही सर्जनशील असावा अशी ही कथा आहे. लेखकाने जे ठरवले ते लिखाणात दिसते; पण सादरीकरणात थोड्याफार तफावती आहेत. कलाकारांच्या मर्यादा लक्षात घेऊन नृत्याच्या स्टेप्स द्यायला हव्या होत्या. अशा काही गोष्टी दिग्दर्शकाने लक्षात घेतल्या तर हे नाटक प्रभावी होऊ शकते. मानवची मुख्य व्यक्तिरेखा संदेश जाधव याने केलेली आहे. आपल्या सावळ्या दिसण्याचा न्यूनगंड त्याच्या अंतरंगात भरलेला आहे; पण जरा विश्वास दाखवला तर सुंदर तरुणीसुद्धा आपल्या जीवनात डोकावू शकेल हा आत्मविश्वास संदेशने आपल्या भूमिकेत दाखवलेला आहे. उपासनाची व्यक्तिरेखा पल्लवी सुभाष हिने केलेली आहे.

- Advertisement -

आपलं देखणेपण अबाधित ठेवून जे दिसतं त्याच्या पलीकडे बरंच काही असतं याची जाणीव मानव आपल्या भूमिकेतून करून देत असताना उपासना या व्यक्तिरेखेमध्ये जो बदल व्हायला हवा होता तो पल्लवीने आपल्या पद्धतीने केलेला आहे. नेहा अष्टपुत्रे ही यात चिंगी झालेली आहे. भाऊ मानव हा आपल्यासाठी धडपड करतो आहे, त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे ही तळमळ नेहा आपल्या भूमिकेत दाखवतेच; पण एकीकडे उपासना आणि मानव विचारांनी एकत्र आलेले आहेत. आता मनाने एकत्र यायला हवेत यासाठी तिची ही धडपड तिने भूमिकेत छान व्यक्त केलेली आहे.

नाटक का पहावं यासाठी सर्वसाधारणपणे प्रथम कलाकारांचा विचार केला जातो; पण ‘खळी’च्याबाबतीत यात साधल्या जाणार्‍या संवादांच्या लेखनासाठी हे नाटक पहायला काहीच हरकत नाही. साध्या विषयातही माणसाच्या विचारांचे अनेक कंगोरे असू शकतात. विवाह हा दोन मनांचा, दोन कुटुंबांचा, दोन समाजांचा संबंध जोडणारा परंपरेने आलेला संस्कार आहे. पण वय उलटून लग्न लांबणीवर पडल्यानंतर या संबंधित व्यक्तींची विचारसरणी काय असू शकते याचे प्रतिबिंब अचूक पद्धतीने लेखकाने मांडलेले आहे आणि कलाकारांनी आपल्या पद्धतीने ते पोहोचवलेले आहे. नाटक प्रभावी होण्याला संदेश बेंद्रे यांचे नेपथ्यही कारणीभूत आहे. आजचे ब्युटीपार्लर जसे असते ते त्याने रंगमंचावर दाखवलेले आहे. भरपूर तपशील नेपथ्यात असल्यामुळे वातावरण निर्मितीही छान होताना दिसते.

मानवच्या घराच्याबाबतीत तसा व्यापक विचार झालेला दिसत नाही. त्याचे घर तेवढे कृत्रिम वाटायला लागते. नाटक पाहणार्‍या प्रेक्षकांत समाधानाची खळी निर्माण व्हावी अशा या दोनचार गोष्टी आहेत. त्यात स्वरांगी मराठे व केतन पटवर्धन यांनी गायिलेले गीत हेही सांगता येईल. बिना सातोस्कर यांच्या गीतांना केतनने संगीत दिलेले आहे. महेश नाईक याने पार्श्वसंगीताची बाजू सांभाळलेली आहे. शीतल तळपदे(प्रकाश योजना) मिताली शिंदे(वेशभूषा) दत्ता भाटकर(रंगभूषा) यांनी नाटकाच्या कथेला न्याय देणारे काम केलेले आहे.

मंदार शिंदे हा स्वत: कलाकार, दिग्दर्शक आहे. आपल्या संस्थेच्यावतीने निर्मिती केलेल्या बर्‍याचशा नाटकात त्याने आपली ही गुणवत्ता दाखवलेली आहे. अलीकडे दुसर्‍या लेखक, दिग्दर्शकालाही आपल्या संस्थेत प्राधान्य दिलेले आहे. ‘यस माय डिअर’ या नाटकाच्या निमित्ताने श्रीनिवास नार्वेकर याचे नाटक रंगमंचावर आणले होते. आता विप्रो क्रिएशनला सोबत घेऊन शिरिष लाटकर लिखित-दिग्दर्शित ‘खळी’ हे नाटक रंगमंचावर आणलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -