घरमनोरंजनयांत्रिकी सुख, भास की धोका? अतुलनीय अनुभवाचा २.०

यांत्रिकी सुख, भास की धोका? अतुलनीय अनुभवाचा २.०

Subscribe

निसर्गाला पुरतं वेठीस धरून आपल्यासाठी सुखनिर्मितीची साधनं तयार करण्यात मश्गुल असलेल्या माणसाचा हा प्रवास धोकादायक मार्गाने कधीचाच निघालेला आहे. हा धोका वेळीच ओळखायला हवा, अन्यथा माणसाचा विनाश अटळ आहे. निसर्गाची हानी करून विज्ञान तंत्रज्ञानाचे धोके न पाहणारा सुखनैव जगण्याचा भास दाखवणार्‍या सुखाच्या संकल्पनेचा एक थ्रीडी काळा चष्मा प्रत्येक माणसाने आपल्या डोळ्यांवर चढवला आहे. हा चष्मा वेळीच काढून हा धोका डोळसपणे पाहायला हवा. २.० चा पडदा थ्रीडी चष्म्यापलिकडे असलेल्या डोळ्यांमागच्या मेंदूला हेच सांगत राहतो.

अतींद्रिय शक्तींचे कुतूहल, विज्ञानाची झेप, कल्पनेच्या भरार्‍या आणि अ‍ॅक्शन, इमोशन्स, थ्रीलर आदी सर्वच घटक एकत्र करून त्यात आधुनिक व्हीएफएक्स तंत्राची जोड दिल्यावर पडद्यावर आलेला २.० हा चित्रपटांतील अभूतपूर्व असा सुमारे तीन तासांचा जबरदस्त थ्रीडी अनुभव असतो. सुमारे साडेपाचशे कोटींचा खर्च आणि दिग्दर्शक ए. शंकरचं टेकींग मिळून २.० म्हणून जे पडद्यावर येतं ते खिळवून ठेवणारं असतं. आता त्यात सुपरस्टार रजनीकांत असल्यावर हा अनुभव रजनीप्रेमींसाठी अतुलनीय असाच असतो. प्रेक्षकांच्या मानवी मेंदूला आव्हान करण्याचा विज्ञानपटाचा अनुभव आपण या चित्रपटाच्या पहिल्या भागात (एंधिरन) रोबोटपटात घेतलेला असतो. २.० त्याच्या पुढचा टप्पा असतो.

महागड्या व्हिएफएक्समधून एका मोठ्या हॉलमध्ये हजारो संगणकांवर बनवलेला सिनेमा अयशस्वी झाल्याची निराशा ठग्ज ऑफ हिंदुस्तानने केली होती. या निराशेला २.० संपवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. दक्षिणेकडे रजनीकांतला सुपरहिरो म्हणून पाहिलं जातंच. जगातली कुठलीही अशक्य गोष्ट आपला सुपरस्टार पडद्यावर साध्य करू शकतो. असं देवपण दक्षिणेतील चाहत्यांनी रजनीला बहाल केलंय. या सुपस्टार हिरोकडून चाहत्यांच्या काल्पनीक अपेक्षांचा सर्वोच्च पट म्हणून २.० पहायला हवा. रोबोट ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या वाढलेल्या अपेक्षा २.० कडून पूर्ण होतातच. शिवाय रोबोटमध्ये जे दुवे दिग्दर्शक शंकरच्या हातून निसटून गेले होते. ते पुन्हा पकडण्याचा प्रयत्न त्याच्या पुढच्या भागात झाला आहे. थ्रीडी तंत्राचा चष्मा डोळ्यावर चढवून विज्ञान तंत्रज्ञानाच्या हातातून निसटत चाललेल्या बेसुमार वापराचा भयानक परिणाम म्हणजे २.० चा पडदा. रोबोटमध्ये मानवाच्या नियंत्रणाबाहेर गेलेल्या तंत्रविज्ञान शक्तीचा दुष्परिणाम पडद्यावर आला होता. इथं त्याच विज्ञान शक्तीला निसर्ग आणि अतींद्रिय शक्तींची सोबत मिळाली आहे. त्यामुळे हा परिणाम, आधीच्या रोबोट (एंधिरन) पेक्षा कित्येक पट घातक होऊन समोर येतो. हा सगळा सिनेमा संगणकावर केलेल्या अत्याधुनिक व्हिएफएक्सचा परिणाम असल्याने कॅमेर्‍याचे विविध कोन, चित्रीकरणातील संबंधित सर्वच विभागांचे कौशल्य इथे अत्याधुनिक तंत्रनिर्मितीमुळे निकालात निघाले आहे.

- Advertisement -

कथा, पटकथा, संवाद या दुय्यम असल्याने तशी अपेक्षा ठेऊन २.० पाहायला थिएटरात जाणं अपेक्षाभंग करणारं ठरतं. रजनीकांतनं पडदा व्यापलेला असणार हे उघड असतं. त्याचं पडद्यावर असणं, एका विशिष्ट लकबेने वळणं, हातवारे करणं, संवाद फेकणं, हे सगळंच रजनीप्रेमींना वेडं करणारं असतं. त्याला ५०० कोटींच्या बजेटची साथ मिळाल्यावर जे समोर येतं ते दिव्य असतं.मानवी जगणं सुसह्य करण्याची धडपड आधुनिक विज्ञान व्याख्येची असते. त्यासाठी संशोधक, शास्त्रज्ञ प्रयत्न करून नवनवे शोध घेत असतात. पण या शोध आणि धडपडीतून निसर्गावर विजय मिळवण्याची एक भयानक स्पर्धा सुरू होते. ही स्पर्धा मानवी जगण्याचा प्रवास धोकादायक वळणावर नेऊन सोडते. या धोक्याचं प्रतिनिधीत्व करणारा खलनायक म्हणजे अक्षय कुमार (पक्षीराजन) हे एक ग्रे शेडमधलं कॅरेक्टर. त्याच्याजवळ त्याच्या खलनायकी हिंसक वागण्यासाठीची ठोस कारणं आहेत. या हिंसेतून मानवतेला वाचवणारा सुपरहिरो (प्रा. वसीकरन, चिट्टी) यांच्यातल्या संघर्षाची २.० ही कथा. मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसामाणसातला थेट संवाद संपलेला आहे. त्यामुळे हजारो वर्षांपासून निसर्गाशी साधलेला माणसांचा संवादही नाहीसा होत आहे.

या विसंवादामुळे संपत चाललेल्या निसर्गाची आर्त हाक माणसांच्या कानापर्यंत पोहचत नाही. त्याला कानाला लावलेला मोबाईल फोन आडवा येतोय. हे वास्तव पडद्यावर मांडण्यात एस. शंकर कमालीचा यशस्वी झालाय. निसर्गावर सर्व सजीवांचा समान हक्क असतो. ही नैसर्गिक समता असते. त्याला राजकीय उद्देशातून आव्हान देणं धोक्याचं असतं. हे मांडण्याचा प्रयत्न म्हणजे २.० चित्रपट.अन्नसाखळीत सर्वच जिवाचं मोल सारखंच असतं. भक्ष्य आणि भक्षक यांच्या नैसर्गिक चक्रातून नैसर्गिक संतुलन साध्य केलं जातं. पण माणूस याला अपवाद असतो. प्रगती, विकास आणि अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या शोधात तो निसर्गाला ओरबाडतो, त्याचे लचके तोडतो. हा तोच निसर्ग असतो जो समस्त जीवांच्या जगण्याचा मुख्य स्त्रोत, आधार असतो. निसर्गाला ओरबाडण्याचा हा राग सूड घेण्याच्या नकारात्मक प्रवृत्तीला हाताशी धरतो तेव्हा कमालीच्या विध्वंसाला सुरुवात होते. सुखाच्या चुकलेल्या व्याख्या, कथित ऐशोआरामाला चटावलेल्या माणसावर उगवलेली सूडकथा म्हणजे २.० चित्रपट.

- Advertisement -

रोबोटसारखाच या चित्रपटाचा पडदाही यंत्रमानवाच्या दर्शनाने उघडतो. पण इथं आता चिट्टी एकटा नाही. त्याने एंधिरनमध्ये केलेल्या विध्वंसामुळे न्यायव्यवस्था आणि सरकारने त्याला डिसमेंटल करून वस्तुसंग्रहालयात कायमचं काचेच्या पेटीत बंदिस्त करून ठेवलंय. त्याने याआधी केलेल्या विध्वंसातून माणसाने धडा घेतलेला नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या वाढत्या अतिक्रमणामुळे निसर्गातल्या छोट्या जीवांचा तडफडून मृत्यू होतोय. त्यातून अतींद्रिय शक्तींकडून आता मानवजातीचा सूड घेतला जाणार आहे. हा युद्धात अनेकांचा जाणारा बळी टाळणं अशक्य होणार आहे. आता या आरिष्टातून चिट्टीच मानवजातीला वाचवू शकतो. त्यामुळे चिट्टीला ताबडतोब जिवंत करण्याची जबाबदारी डॉ. वसीकरणवर आलीय. आता डॉ. वसीकरण हे आव्हान कसे पेलतात, हे पडद्यावर पाहायला हवं. चित्रपटातील ए. आर. रेहमानचं यांत्रिकी संगीत आणि व्हिएफएक्सचा अती वापर मध्यंतरानंतर काहीसा त्रासदायक ठरतो. पण कथानकच यंत्रांवर आधारलेलं, यांत्रिकी पद्धतीचं असल्याने प्रेक्षकांनीही प्रत्यक्ष संवेदनेच्या पातळीवर हा सिनेमा पाहाण्याचं टाळावं.

इथं डॉ. वसीकरणला साथ देणारी नीला (एमी जॅक्सन) ही सुद्धा यंत्रमानव आहे. तिच्यात मानवी संवेदना, जाणीवा, प्रोग्राम करून डाऊनलोड केलेल्या आहेत. प्रेम, आत्मियता, जबाबदारी, कर्तव्य, राग असं सगळं काही तिच्यात आहेच. तिची आणि यंत्रमानव चिट्टीत झालेल्या जवळकीतून शंकरने यांत्रिकी रोमँटीसीझमचा नवा प्रकार पडद्यावर आणला आहे. एका युद्धजन्य स्थितीत तिच्यातली मायक्रोचिप नाईलाजाने चिट्टीमध्ये सोडली जाते. त्यातून तिच्यातला महिलांच्या आवडत्या हिंदी टीव्ही मालिकांचा प्रोग्राम डेटा चिट्टीत ट्रान्सफर होतो. त्यातून निर्माण झालेले मजेशीर प्रसंग पेरून एस. शंकरने मानवी जाणीवांची किरकोळ आनंदाची मर्यादा अधोरेखित केली आहे. अशा किरकोळ आनंदाचे प्रसंगांचे सातत्य म्हणजेच मानवी जगणं, अशी साधी सरळ व्याख्या असताना सुखनैव जीवनशैलीच्या मागे लागून निसर्गाला वेठीस धरून आपल्यासाठी सुखनिर्मितीची साधनं तयार करण्याचा माणसाचा हा केलेला प्रयत्न धोकादायक मार्गाने कधीचाच निघालेला आहे. हा धोका वेळीच ओळखायला हवा अन्यथा माणसाचा विनाश अटळ आहे. निसर्गाची हानी करून विज्ञान तंत्रज्ञानाचा धोके न पाहणारा सुखनैव जगण्याचा भास दाखवणारा असाच एक थ्रीडी काळा चष्मा आपण डोळ्यांवर चढवला आहे. हा चष्मा वेळीच काढून हा धोका डोळसपणे पाहायला हवा. २.० चा पडदा थ्रीडी चष्म्यापलिकडच्या डोळ्यांमागच्या मेंदूला हेच सांगत राहतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -