घरमनोरंजनअमोलचा असाही प्रचार

अमोलचा असाही प्रचार

Subscribe

उमेदवाराच्या प्रचारावर शासनाची कडक नजर असली तरी उमेदवार, पक्ष छुप्या मार्गाने प्रचार करत असतात. उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी निघालेले मोर्चे हा त्यातलाच एक भाग म्हणावा लागेल. अभिनेता डॉ. अमोल कोल्हे सध्या निवडणूक रिंगणात आहे. टिकात्मक विधान करून किंवा सामाजिक कार्याचे दाखले देऊन मतदारांना आपलेसे करण्यात सध्या गुंतलेला आहे. चॅनलवाले, चित्रपट तयार करणारे निर्माते त्याला त्याच्या प्रचारकार्यात सहकार्य करतात की काय, असे वाटायला लागलेले आहे. त्याला कारण म्हणजे कोणत्याही चॅनलवाल्याने आपल्याच मालिकेतला एक प्रसंग सलग सात दिवस चालेल असा प्रयत्न फारसा कधी केला नव्हता. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका झी मराठी वाहिनीवर तशी काहीशी दाखवणे सुरू केलेले आहे. ज्यात अमोल कोल्हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे.

हा कदाचित चॅनलवाल्यांचा दृष्टिकोन असू शकेल, पण घनश्याम येडे या निर्माता, दिग्दर्शकाने चक्क सप्टेंबर-2018 मध्ये प्रदर्शित केलेला बोला अलखनिरंजन हा चित्रपट पुन्हा 19 एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचे ठरवलेले आहे. एकदा प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा प्रदर्शित करणे ही गोष्ट तशी नवीन नाही, पण या प्रदर्शित होणार्‍या चित्रपटात अमोल मुख्य भूमिका निभावतो आहे, असे असताना तो निवडणूक प्रचारादरम्यान पुन्हा प्रदर्शित होत आहे. या प्रदर्शनाला वेगवेगळी कारणे दिली जात असली तरी विरोधकांच्यादृष्टीने हा छुपा प्रचार आहे असेच म्हटले जाणार आहे. दुसरे म्हणजे चित्रपटाचे समिक्षण करण्यासाठी तीन दिवस अगोदर हा चित्रपट पत्रकारांना दाखवला जातो, पण हा चित्रपट दहा दिवस अगोदरच दाखवला गेलेला आहे. असे का, असाही प्रश्न निर्माण होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -