घरमनोरंजनहे आहेत यावर्षीचे चांगले तरीही फ्लॉप सिनेमे

हे आहेत यावर्षीचे चांगले तरीही फ्लॉप सिनेमे

Subscribe

वर्ष २०१८ आता संपत आले आहे. दरवर्षी ज्याप्रमाणे ठळक घडामोडींची चर्चा होते. तशीच ती चित्रपटांचीही होते. कोणते चित्रपट चालले, कोणते फ्लॉप झाले. याची चर्चा ओघाने आलीच. यावर्षी मध्यम बजेटचे अनेक चित्रपट आले. आयुष्यमान खुराणाचा अंधाधुन हा सिनेमा या वर्षातला आयएमडीबी रेटिंगमध्ये सर्वोकृष्ट ठरलेला चित्रपट. बॉक्स ऑफिसवर देखील अंधाधुनने चांगली कमाई केली. आयुष्मानच्या ‘बधाई हो’ने देखील अनपेक्षितरित्या चांगला गल्ला जमवला. स्त्री आणि राझी या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांनीही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली. एका बाजुला कटेंटबेस्ड असलेल्या सिनेमांना लोकांनी डोक्यावर उचलून घेतले तर तद्दन गल्लाभरू सिनेमांना आपटले देखील. मात्र या व्यवसायात काही चांगल्या चित्रपटांचेही वाटोळे झाले. बरा सिनेमा असूनही त्यांना प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही.

वेबसिरीजने यावर्षी प्रेक्षक व(प)ळवले

भारतीय वेबसिरीजचा यावर्षात चांगलाच बोलबोला दिसला. हिंदीतील सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, लस्ट स्टोरीज, अल्ट बालाजीच्या आंबट शौकिन मालिका आणि इतर वेबसिरीजने थिएटरमधील प्रेक्षक वर्ग स्वतःकडे वळवला. एक अर्थी थिएटरमधून प्रेक्षकवर्ग पळवलाच म्हणा ना… तरिही काही चांगले चित्रपट यावर्षी आले होते. मध्यम बजेट असलेल्या या सिनेमांना प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून ते फ्लॉप चित्रपटांच्या रांगते जाऊन बसले.

- Advertisement -

कारवाँ

इरफान खान कॅन्सरग्रस्त होण्याआधी आलेला चित्रपट कारवाँ रोड मुव्ही कॅटेगरीतला. इरफान सोबत या चित्रपटात दलकीर सलमान आणि मिथीला पालकर यांनी काम केले आहे. एका छोट्याश्या घटनेला घेऊन या चित्रपटाने हलके-फुलके मनोरंजन केले आहे. तांत्रिकदृष्ट्याही सिनेमा फारच चांगला आहे. तरिही तिकिटबारीवर सिनेमाला यश मिळाले नाही.

भावेश जोशी सुपर हिरो

भारतात भ्रष्टाचार त्याविरोधात लढणारा नायक.. या कथानकावर आधारीत ढिगभर चित्रपट दरवर्षी येतात. आयटम साँग, मारधाडवाले हे चित्रपट लोकांना खेचून घेतात. मात्र हाच विषय वेगळ्या धाटणीने हातळणारा विक्रमादित्या मोटवानी यांचा भावेश जोशी सुपरहिरो चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नाही. रिलीज होऊन काही दिवसातच या चित्रपटाने थिएटरमधून एक्झिट घेतली. अण्णा हजारे-केजरीवाल यांचे आंदोलन.. त्यातून शहरी तरूणांना चढलेला देशभक्तीचा ज्वर आणि त्यानंतर त्यांची भ्रष्टाचारा विरोधातील लढाई… असा या चित्रपटाचा विषय होता. कलाकारही नवोदित होते. मात्र वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना आपल्याकडे स्वीकारले जात नाही. तेच या चित्रपटाच्या बाबतीत झाले. तरिही हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तुम्हाला पाहायला मिळू शकतो.

- Advertisement -

मुक्काबाज

अनुराग कश्यप याचा महत्त्वकांक्षी चित्रपट म्हणून मुक्काबाजकडे पाहिले जात होते. विनित कुमार सिंह अभिनित या चित्रपटाचा विषय चांगला होता. खेळांमधले जात वास्तव, मागास जातीतील खेळाडूंना झेलावी लागणारी उपेक्षा आणि त्यातून उध्वस्त होत जाणारे त्यांचे वैयक्तिक आयुष्य.. असा विषय असलेल्या या चित्रपटात अनुरागने त्याच्या पद्धतीने मसाला ओतला होता. मात्र प्रेक्षकांना काही हा सिनेमा रुचला नाही. कश्यपच्या त्याच त्याच सादरीकरणाच्या पद्धतीमुळे कदाचित या चित्रपटाकडे लोकांनी पाठ फिरवली असेल.

मंटो

स्वातंत्र्यपूर्व भारतात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाकिस्तानात गेलेले उर्दू लेखक सादत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारीत असलेला चरित्रपट नंदीता दासने दिग्दर्शित केला होता. नवाजुद्दीन सिद्दिकीने यात मंटो अतिशय ताकदीने साकारलाय. चित्रपटाचे संवाद, नैपथ्य, इतर सहकलाकार यांनी केलेला दमदार अभिनय या चित्रपटाला तारू शकला नाही. समिक्षकांनी चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले असले तरी तिकिटबारीवर मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मंटोच्या साहित्याला जसे त्यावेळी दुर्लक्षित करुन बाजुला केले गेले, त्याप्रमाणेच प्रेक्षकांनी मंटोच्या बायोपिकसोबतही केले.

कालाकांडी

सेक्रेड गेम्समुळे सैफ अली खानचे हे वर्ष तसे चांगले गेले. त्याच्या अभिनयासहीत पुर्ण मालिकेचेच सगळीकडून कौतुक झाले. मात्र यावर्षी आलेल्या त्याच्या कालाकांडी या चित्रपटाने मात्र निराशा केली. ब्लॅक कॉमेडी असलेला हा सिनेमा सैफ अली खानच्या आतापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा अतिशय वेगळा होता. आपल्या आयुष्याची अचानक अखेर होत आहे, हे कळल्यानंतर एक तरुण आयुष्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहायला लागतो आणि मग एका रात्रीत त्याच्यासोबत जो खेळ होतो, तो या चित्रपटात आहे. एका रात्रीचा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी एका रात्रीतच पाडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -