घरफिचर्स...तर चित्र वेगळे असते !

…तर चित्र वेगळे असते !

Subscribe

काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातून प्रियांका गांधी यांना पुढे आणण्याची मागणी होत असताना त्यांना बाजूला ठेवून राहुल गांधी यांना पुढे आणण्याचा हट्ट कायम ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवार यांना वेळोवेळी मुख्यपदापासून बाजूला ठेवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना बाजूला करून उद्धव ठाकरे यांना पुढे आणले, असे झाले नसते तर आज राजकीय चित्र वेगळे असले असते. पण आपल्याच मुलांना आपली मालमत्ता मिळावी, या इच्छेला करणार काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात २०1९ ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राजकीय सत्तास्थापनेची विचित्र कोंडी निर्माण झाली आहे. नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा इतक्या तीव्र झाल्या आहेत की, आम्हीच खरे सत्तेचे दावेदार अशा इरेला ही मंडळी पेटलेली दिसतात. महाराष्ट्र हा अलीकडच्या काही वर्षांमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चार प्रमुख पक्षांमध्ये प्रामुख्याने विभागला गेलेला आहे. यापैकी फक्त एका पक्षाला बहुमत मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना युती किंवा आघाडी करावी लागते. ही युती किंवा आघाडी वरून पाहता लोकांच्या हितासाठी आहे, असे दाखवले जाते; पण आतून या पक्षांच्या एकमेकांचा प्रभाव कमी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू असतात. त्यामुळे या पक्षांची हातमिळवणी ही खरे तर हातपिळवणीच असते. आपणच सत्तेत यावे, आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, राज्याची सूत्रे आपल्या हातात यावीत, असेच या पक्षांच्या नेत्यांना वाटत असते.

याही पलीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांमध्ये घराणेशाहीचा प्रचंड पगडा दिसतो. आपल्यानंतर आपल्याच घरातील माणूस पुढे आला पाहिजे, तसेच तो आपल्याच रक्ताच्या नात्याचा आणि आपल्याच पसंतीचा असायला हवा, असा या नेत्यांचा अट्टाहास आणि भावनिक कळकळ असते. त्यातून पक्षाचे नुकसान तर होतेच; पण त्याचसोबत त्याचा राजकारणावर विचित्र परिणाम होत असतो. सध्या काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर घसरगुंडी झालेली आहे. या पक्षात गटबाजी उफाळलेली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व कमजोर आहे. आपला मुलगाच काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हावा आणि पुढे पंतप्रधान व्हावा, अशी काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांची इच्छा आहे. राहुल गांधी यांना कितीही पुढे केले तरी त्यांचा प्रभाव पडत नाही. तसेच ते मधूनच अशी काही विधाने करतात आणि भूमिका घेतात की, ज्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच गोची होते. पण गांधी घराण्यातील व्यक्ती असल्यामुळे त्यांचे काही चालत नाही. राहुल गांधी यांच्या जागी प्रियांका गांधी यांना आणा, ‘प्रियांका लाओ, काँग्रेस बचाओ’, अशा घोषणा काँग्रेसच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी देऊन पाहिल्या; पण त्यांचा आवाज बंद करण्यात आला.

- Advertisement -

सोनिया गांधी आपली मुलगी असूनही प्रियांका यांना राजकारणात पुढे आणायला तयार नाहीत. प्रियांका गांंधी यांचा निवडणुकीतील प्रचारापुरताच वापर केला जातो. राहुल गांधी यांना सोनिया गांधी यांनी पहिल्यांदा पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष केले, त्यानंतर अध्यक्ष केले. पण राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे निमित्त करून पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आणि स्वत: सोनिया गांधी यांनी त्यांची कितीही समजूत काढली तरी त्यांनी अजूनपर्यंत अध्यक्षपदाचा स्वीकार केलेला नाही. खरे तर आज काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी अन्य उमेदवार आहेत; पण गांधी घराण्याशिवाय काँग्रेस चालत नाही, असाच रिवाज आणि मानसिकता करून घेतलेली असल्यामुळे कुणीही पुढे यायचे धाडस करत नाही. त्यामुळे शेवटी हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी अध्यक्षपद आपल्याकडे ठेवले आहे. राहुल गांधी यांना जबरदस्तीने प्रमुखपदी आणण्याचा आटापिटा करण्यापेक्षा त्यांनी प्रियांका गांधी यांना पुढे आणले असते, तर पक्षामध्ये नवी उभारी आली असती. काँग्रेसकडे केंद्रीय पातळीवर सक्षम नेतृत्व नसल्यामुळे पक्ष विस्कळीत झालेला दिसतो. याचाच परिणाम महाराष्ट्रातील काँग्रेसवर होऊन त्याला गटबाजीची लागण होऊन तो कमकुवत झालेला आहे.

दुसर्‍या बाजूला पवार आणि ठाकरे या दोन घराण्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पगडा आहे. पवारांनी काँग्रेसमध्ये आपल्याला योग्य मान मिळत नाही, हे लक्षात घेऊन त्या पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवार घराणे आणि शिवसेना म्हणजे ठाकरे घराणे असे समीकरण बनलेले आहे. या दोन घराण्यांशिवाय हे दोन्ही पक्ष चालतील का, याबाबत शंका आहे. त्यामुळे पवारांचा राजकीय वारसदार हे त्यांचे पुतणे अजित पवार असेच मानले जात होते. कारण शरद पवारांसोबत तेच राजकारणात सक्रिय होते; पण पुढे परिस्थिती बदलली. शरद पवारांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना राजकारणात सक्रिय केले. खरे तर अजित पवारांना तो धक्का होता. पण त्यांनी गप्प राहून पुढचा प्रवास सुरू ठेवला. अधूनमधून ते आपली नाराजी दाखवून देत राहिले.

- Advertisement -

पुढे २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे पुन्हा सरकार आले. यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त होते. तेव्हा खरे तर अजित पवार यांना मुख्यमंत्री करणे शक्य होते; पण शरद पवारांनी त्यांना ती संधी दिली नाही. त्या बदल्यात त्यांनी केंद्रीय पातळीवर तसेच राज्य पातळीवर काही महत्त्वाची खाती मिळवली. अजित पवार यांना वेळोवेळी असे मुख्य पदापासून डावलण्यात आले. शरद पवारांचे राजकीय वारसदार कोण, अजित पवार की, सुप्रिया सुळे, असा प्रश्न प्रसारमाध्यमे विचारत राहिली. त्यातून अजित पवार दुखावले जात राहिले. आताही सत्तास्थापनेच्या हालचालीत त्यांना डावलण्यात येत होते. त्यातूनच त्यांनी निर्णायक बंडखोरी करत राज्यातील भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. परिस्थिती बदलल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. हा खरे तर शरद पवारांना बसलेला हा मोठा धक्का आहे; पण जर पवारांनी अजित यांना आपला वारसदार म्हणून वेळीच पक्षातील मुख्यपदाची संधी दिली असती तर ही वेळ आली नसती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे वारसदार राज ठाकरे असतील असेच सगळ्यांना वाटत होते. कारण राज ठाकरे बाळासाहेबांसोबत राजकीय प्रवास करत मोठे झाले. त्यामुळे राज ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे दुसरे रुप असेच शिवसैनिकांना वाटत होेते. त्यांच्यासारखेच दिसणे, बोलणे, तशीच जरब, पण पुढे परिस्थिती अनपेक्षितपणे बदलेल असे कुणाला वाटले नव्हते. बाळासाहेब ठाकरे यांनी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या मुख्य स्थानी आणायला सुरुवात केली. राज ठाकरे यांची उपेक्षा होऊ लागली. राज ठाकरे यांंच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर यांनी पक्षातून फुटून बाहेरचा रस्ता धरला. त्यांनी काही दिवसांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. त्यामुळे भूमीपुत्र मराठी माणसांचा पक्ष असलेला शिवसेना फुटला. पुढे निवडणुकांमध्ये मराठी मतांचे विभाजन होत राहिले.

बाळासाहेबांनी शिवसेनेची सूत्रे राज ठाकरे यांच्याकडेच ठेवली असती तर आज शिवसेनेचे चित्र वेगळे दिसले असते. शिवसेना अधिक व्यापक आणि प्रभावी झालेली दिसली असती. युतीमध्ये त्यांचा प्रभाव जास्त राहिला असता. एकूणच काय तर सोनिया गांधी, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी अनुक्रमे प्रियांका गांधी, अजित पवार, राज ठाकरे यांना आपले राजकीय वारसदार म्हणून संधी दिली असती तर आज राजकीय चित्र वेगळे दिसले असते. पण मामला मालमत्तेचा असतो. आपल्यानंतर आपली मालमत्ता आपल्याच रक्ताच्या नात्याच्या व्यक्तीला मिळावी, अशी मानवी इच्छा असते.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -