घरमहाराष्ट्रफत्ते शिकस्त!

फत्ते शिकस्त!

Subscribe

राऊतांची पटकथा, पवार दिग्दर्शक आणि साकारले ठाकरे सरकार...!

ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर येत आहे. राज्यासाठी हे सरकार उत्सुकता वाढवणारे आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या 12 कोटी जनतेत महाविकास आघाडीचे सरकार कसे असेल याविषयी जोरदार चर्चा आहे. मुख्य म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून कारभार हाती घेणार असल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे शिवसेनेचे स्वप्न साकार होत असल्याने त्यांच्या मनात फत्ते शिकस्तची भावना आहे. ही फत्ते शिकस्त होऊन ठाकरे सरकार आज आले त्याला पडद्यामागून शिवसेना नेते संजय राऊत यांची पटकथा आणि शरद पवार यांचे दिग्दर्शन कामाला आले आहे.

भाजपमागून फरफटत गेल्यास एके दिवशी आपण संपून जाऊ, याचा गेल्या पाच वर्षात शिवसेनेला साक्षात्कार झाला. मुख्य म्हणजे भाजपच्या विश्वासघातकी राजकारणाची जवळून ओळख झाली. शिवसेनेचे ठरवून आमदार पाडायचे आणि स्वतःची रेष मोठी करत न्यायची या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार भाजपच्या अंगाशी आला. यामुळे रेष तर वाढली नाहीच पण, युती 220 च्या पार जाईल आणि भाजप 140 पेक्षा अधिक जागा मिळवेल हे देवेंद्र फडणवीस यांचे एकट्याचे डावपेच अंगाशी आले. यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात जो काही सत्ता संघर्ष रंगला तो उभ्या महाराष्ट्राने पाहिला…आणि या संघर्षातून सत्तेकडे जाणारी पटकथा संजय राऊत यांनी लिहिली आणि त्याला मास्टर पीस दिग्दर्शन लाभले ते शरद पवार यांचे.

- Advertisement -

भाजपला रोखण्याची हीच संधी आहे हे ओळखून राऊत यांनी मातोश्रीच्या मनात सत्तेचे बीज रोवले आणि नुसतेच बीज रोऊन ते शांत बसले नाहीत तर त्यांनी त्याचे रोपटे होईल याची काळजी घेतली. यासाठी दररोज पत्रकार परिषदा घेऊन वातावरण निर्मिती केली. विशेष म्हणजे हे वातावरण तयार करत असताना त्यांनी आपले राजकीय गुरु शरद पवार यांच्या धूर्त राजकारणाचा बेमालूम उपयोग करून घेतला. याच वेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री हे सतत जनतेसमोर ते सांगत राहिले.

याचवेळी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असेल तरच तीन पक्षांचे सरकार नीट आकाराला येईल आणि ते पुढे जाऊन टिकेल, अशी दूरदृष्टी पवार यांनी दाखवली. पवारांचा विचार उद्धव यांच्या मनी उतरवताना राऊत यांनी पुढचे पाऊल टाकले. याचा परिणाम होऊन कायम मातोश्रीवरून सूत्रे हलवण्याचे काम करणार्‍या ठाकरे घराण्याला शेवटी विचार बदलून मैदानात उतरावे लागले. यापुढे रिमोट कंट्रोलवर सरकार चालवू शकत नाही, हे लक्षात येताच कधीही सत्तेची पदे घेण्यास तयार नसलेले ठाकरे घराणे अखेर मातोश्री सोडायला तयार झाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार असले तरी त्यांच्या पुढे खूप मोठे आव्हान असेल. तीन पक्षांचे सरकार चालवणे ही तारेवरची कसरत असेल. मुख्य म्हणजे ठाकरे सरकारच्या खुर्चीखाली फटाके फोडण्याची एकही संधी भाजप सोडणार नाही. स्वतः उद्धव यांनी ते बोलून दाखवले आहे. अशावेळी शरद पवार यांची भूमिका महत्वाची असणार आहे. त्यांनी ठरवले तरच हे सरकार पाच वर्षे नीट चालेल. ठाकरे सरकारचे आताच नाही तर पुढेही पवारच दिग्दर्शन करणार आहेत. राज्यातील जनतेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -