घरफिचर्सअविरत चिंतनाचा प्रकाशदायी प्रवास...

अविरत चिंतनाचा प्रकाशदायी प्रवास…

Subscribe

चिंतन झुंबराची प्रकाशवलये या ललितलेख संग्रहाला कवी प्रा. अशोक बागवे यांची अत्यंत समर्पक आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेली आहे. आपल्या प्रस्तावनेत बागवे सरांनी असे नमूद केले आहे की, सरस आणि सुरस, प्रसन्न आणि प्रच्छन्न, युज्य आणि सायुज्य, रत आणि अविरत चिंतनाचा प्रकाशदायी प्रवास म्हणजे चिंतन झुंबराची प्रकाशवलये. एवढं चांगलं प्रमाणपत्र दिल्यामुळे साहजिकच लेख वाचण्याची उत्कंठा वाढते. या लेखसंग्रहात एकूण एकतीस लेख समाविष्ट असून ढोबळमानाने लेखांचा अनुक्रम ठरवताना लेखकाने साधारपणे तीन अदृश्य विभागात त्यांची मांडणी केलेली आहे. याद्वारे लेख वाचताना वाचकांना एक सलगतेचा अनुभव घेता येईल. सुरुवातीचे काही लेख निव्वळ ललित लेख आहेत. दुसर्‍या विभागात ललित लेखांच्या माध्यमातून काही संदेशात्मक लेख आहेत. तर तिसर्‍या विभागात, ललित अंगाने लिहिलेली काही व्यक्तिचित्रे आहेत. असे असले तरी त्यांच्या सीमारेषा धूसर आहेत. कारण लिहिणारे एक मन आणि त्या मनाचे तीन दृष्टिकोन….असा हा त्रिवेणीसंगम आहे,असे बागवे सर म्हणतात.

पहिल्याच ‘नमन’ या लेखात लेखकांनी वाचकांच्या मनाची मशागत केली आहे. चिंतन म्हणजे काय? आपल्या चिंतनाची व्याप्ती कशी होते? यावर सुंदर भाष्य केले आहे. चिंता दूर करते ते चिंतन. चिंता दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. विद्वत्ता, वैराग्य, विनोद आणि काही अंशी वैभव हे त्यापैकी काही. विवेकगर्भातून निर्माण होणार्‍या वैभवशाली विचाराला चिंतन म्हणतात. म्हणूनच चिंतनाच्या आभाळाला परिपक्वतेचे, परम शांतीचे पूर्णचंद्र लगडलेले असतात. आपली जेवढी बौद्धिक, भावनिक, वैचारिक झेप, स्त्रैण होण्याची ताकद, तेवढी आपल्या चिंतनाची व्याप्ती… असे एकूणच जीवनासंबंधीचे तत्त्वज्ञान लेखकांनी पहिल्याच लेखात मांडले आहे.

- Advertisement -

वासाच्या सहवासात इके बुगा, इके बुगा शिशिर, तिन्हीसांज आणि गाई शब्दांच्या अर्भकांची गर्भस्थाने हे लेख मुळातूनच वाचायला हवेत. कवितेच्या निर्मितीबाबत आणि प्रतिभाशक्तीबद्दल अतिशय मार्मिक पण सत्य विधान त्यांनी केलंय. लेखकाच्याच शब्दात, ही प्रतिभा नावाची जी कुणी स्फूर्ती शक्तिदेवता आहे ना ती अशी बाह्य प्रसंगांची मोताद नाही, महाराजा. प्रसंगापासून, प्रपंचापासून, व्यवहारापासून किंबहुना या ग्रहापासून अस्पृश्य, अद्वितीय आणि झळाळती देणगी आहे ती. ती रुसून बसली तर अशा शेकडो घटना घडल्या तरी ती फळणार नाही आणि खूश झाली तर काहीच घडले नाही तरी सर्वस्व द्यायला मागेपुढे पाहणार नाही. हा अनुभव जवळजवळ सर्वच कविलेखकांना येत असतो. माझी कन्या हा लेख आणि कवी बी यांच्या लोकप्रिय कवितेचं रसग्रहण आजही मनाचा ठाव घेते. हा लेख आवर्जून वाचायलाच हवा.

आता काही संदेशात्मक लेख पाहू. कविता…एक भोगणे या लेखात नव्यानं लेखन करणार्‍या आणि नवकवींना खूप चांगले मार्गदर्शन केले आहे. यात उठसुठ घडणार्‍या प्रत्येक घटनेवर कविता कर, आवडो न आवडो, आपलंच घोडं पुढे दामटत राहणे, कोणतीही तयारी न करता कविता सादर करणे, आपल्याला न आवडणार्‍या विषयावर विचार मांडलाच तर ती कविता नाहीच असं समजणं, इ. इ. विचारधारांवर लेखकानं चांगलाच प्रकाशझोत टाकला आहे. कवीनं तर कुठलाच वादी असू नये, आपल्या राजकीय, धार्मिक इ. विचारधारा आपल्या निर्मितीच्या गुणवत्तेवर परिणाम तर करणार नाहीत ना? निर्मितीवर मर्यादा तर आणणार नाहीत ना? याचा सतत विचार करावा,असा सल्लाही दिला आहे.

- Advertisement -

कविता भोगायची म्हणजे काय? तर… सर्वप्रथम कविता नुसतीच वाचायची नाही तर ती भोगायची असते. त्यासाठी पूर्वग्रहांची सर्व वस्त्रं बाजूला सारून निर्वस्त्र होऊन तिला सामोरं जायला हवं. पूर्वग्रहदूषित असून चालणार नाही. नितळ मनानं कवितेच्या तळ्यात उतरलं तर सौंदर्याची कमळं हाती लागण्याचा संभव असतो, अन्यथा नाही. हा महत्वाचा सल्ला आणि संदेश विचार करण्यासारखा आहे. अन्य लेखांमध्ये विंडो शॉपिंग, बदलते बदल, प्रकाशमय प्रहर, माझे अध्यात्म सौदा, सौदा चिमण्या, बहिणाबाई आणि आजोबा इ. लेख शांतपणे वाचावेत. अध्यात्माबद्दल लिहिताना, अध्यात्म हा जीवनाकडे पाहण्याचा एक पुरोगामी, सशक्त आणि सकारात्मक दृष्टिकोन आहे, ती एक जीवनपद्धती आहे, असे विचार मांडले आहेत. अलौकिक नोहावे लोकांप्रती हा लेख मुळातून वाचावा. आपण देवपूजा करतो पण आपल्या वागण्यात देवपणाचं कुठलंही लक्षण प्रतिबिंबित होत नाही. पदानं, प्रतिष्ठेनं, पैशानं छोट्या आणि मोठ्या माणसांशी वागताना आपण आवर्जून भेदभाव करत असतो, हे सत्य लेखकाने विशद केले आहे. लेखकाचे या बाबतीत असेही निरीक्षण आहे की, देवाचं करून स्वभावात लवचिकता बाणवण्याऐवजी लोक कठोरच जास्त होतात. कपाळाला टिळा लावून, गळ्यात माळ घालून अरेरावी, फसवाफसवी करणारी माणसं समाजात पैशाला पासरी मिळतात, तेव्हा वाईट वाटतं, हसूही येतं.

मनाचा निर्मळ, वाचेचा रसाळ, तुटे वाद संवाद तो हितकारी, समाधानी, संध्यासमय हे लेख वाचताना एक आत्मिक आनंद मिळतो. तर, शर्मसे कहो हम कवी हैं हा लेख कवींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालतो. कविता-एक वाचणे या लेखात अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले आहे. लेखकाच्या मते-कवितेसंबंधी प्रत्येक प्रतिक्रिया ही आनंददायी असायला हवी. कविता लिहिणं, वाचणं, ऐकणं, ऐकवणं सारंच एक तर्‍हेची पूजा आहे. कविता हे एक व्रत आहे. त्यातील प्रत्येक प्रक्रिया अत्यंत गांभीर्यानं, जाणूनबुजून, एकाग्रतेने केलेली असावी.

अतिलीनता सर्वभावे स्वभावे, आनंदाचे डोही आनंद तरंग, कचकड्याचे आस्तिक हे लेख आवर्जुन वाचावेत. छोट्यांचे भावविश्व आणि रियॅलिटी शो या लेखातून पालकांना आणि पाल्यांना अगदी योग्य असे मार्गदर्शन केलेले आहे. गौतम बुद्ध या लेखात प्रज्ञा, शील आणि करुणा ही त्यांची त्रिसुत्री मनामनात आणि एकूण जीवनात शांती प्रस्थापित करते. तर न कोमेजलेला चाफा हा कवी बी यांच्यावरील लेख त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास आणि आधुनिक कवींमधले त्यांचे मानाचे स्थान अधोरेखित करतो. ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर आणि अशोक बागवे यांच्यावरील शेवटचे दोन लेख उत्कृष्ट माणूस, कवी आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्वाचा शोध घेतात. या पुस्तकातील सर्वच लेख रसिक वाचकांना आवडतील असा विश्वास वाटतो. संवेदना प्रकाशन, पुणे यांची ही एक सुंदर निर्मिती आहे.

– अशोक लोटणकर

ललित लेख संग्रह : चिंतनझुंबराची प्रकाशवलले
लेखक: अशोक गुप्ते
प्रकाशक: संवेदना प्रकाशन,पुणे
पृष्ठे: 176 , मूल्य: 250/-

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -