घरफिचर्सकरोना...आव्हान आहे, अशक्य नाही

करोना…आव्हान आहे, अशक्य नाही

Subscribe

करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर त्या राज्यासह देशातही त्याचे साईड इफेक्ट दिसायला सुरुवात झाली आहे. नागरिक एकमेकांना धीर देत आहेत. सध्याच्या परिस्थितीत पॅनिक होऊन चालणार नाही. अफवा रोखतानाच करोनाशी दोन हात करण्यासाठी नागरिकांनी सज्ज व्हायला हवं. करोना नियंत्रणात येणारच नाही. अशी परिस्थिती नाही. कित्येक देशांमध्ये या आजारावर उपचारातून मात करण्यात यश मिळालं आहे. करोनावर प्रतिबंधात्मक लस निर्माण करण्यासाठी देशातील संशोधकांचे अभ्यास, प्रयोग सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम हाती आलेले आहेत. त्यामुळे अकारण भीती बाळगण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. या आजारावर उपाय नाहीच, अशी परिस्थिती नाही. देशातील विलगीकरण केंद्रातील कित्येक करोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झालेले असून त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. असा दिलासा जरी असला तरी हा व्हायरस फैलावण्याचे प्रमाण विचारात घेता ठाणे, मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी त्याला नियंत्रणात ठेवणे जास्त गरजेचे आहे.

बस स्टॉप, लोकल ट्रेन्सचे स्टेशन्स, बाजार, शॉपिंग मॉल या ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळायलाच हवी. शक्य ती कामे घरी बसूनच करावीत, त्यामुळे या व्हायरसचे वाहक नियंत्रणात आणणे शक्य होईल. मोठ्या गर्दीतून व्हायरसची लागण झालेल्याची निवड करण्यासाठी माणसांनी टाळलेली गर्दीही महत्त्वाचे काम करू शकते. करोनाच्या विरोधातील या युद्धात प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून काम केल्यास या आजाराला नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. करोनाचा राज्यात पहिला रुग्ण आढळल्यावर दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यातील आव्हान मोठे आहे. या काळात प्रत्येक नागरिकानेच करोनाविरोधीतील हा लढा आपल्या पातळीवर लढायचा आहे. नियम, प्रशासन किंवा सरकारी पातळीवर उपाय सुरू आहेतच. मात्र, गर्दी टाळून, प्रतिबंधात्मक उपाय करूनही आपण या करोनाला संपवण्यासाठी मोलाची मदत करू शकतो.

- Advertisement -

मुंबईत जे. जे. हॉस्पिटल किंवा केईएम सारख्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये बाह्य रुग्ण विभागात रोजच्या रोज हजारो पेशंटची नोंद होत असते. या सर्व रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय गरजेनुसार उपचार केले जातात. मुंबईची लोकसंख्या पाहता या रुग्णालयांवर रुग्णांच्या उपचाराचा ताण आधीपासूनच आहे. मुंबईकरांनी याआधीच्या आपत्कालात दाखवलेल्या धैर्य आणि करोनाचं संकट यात मोठं अंतर आहे. पूर, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर चेहर्‍यावर मास्क लावून आले होते. करोनाने नागरिकांच्या चेहर्‍यावर मास्क चढवले आहेत. या मास्कला कुठल्याही जमातवादाचा रंग नाही. ही एकूणच माणसांवर आलेली आपत्ती आहे. त्यासाठी माणसांनी आपले जमातवादी मुखवटे उतरवून माणूस बनूनच लढायला हवे. परंतु, कुठल्याही आपत्ती आणि संकटाला राजकीय आणि सामाजिक रंग देऊन आपल्या जमातवादाचा झेंडा उंच करण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा बालिशपणा यंदाही समाज माध्यमांवर पाहायला मिळत आहे. त्यातून शेण, प्राण्यांच्या मूत्रसेवनाचे सल्ले दिले जात आहेत.

विशिष्ट धर्मात हिजाब किंवा नकाब वापरणे कसे विज्ञाननिष्ठ आहे यापासून शेक हँडपेक्षा नमस्कार संस्कृतीचे आणि मृत्यूनंतरच्या दहन संस्काराचे गोडवे गायले जात आहेत, हे इथपर्यंत असतं तर ठीकही होतं. मात्र, त्याहीपुढे जाऊन वैद्यकीय क्षेत्राला आव्हान देण्यापर्यंतच काही जणांची मजल गेली आहे. त्यामुळे करोना परवडला पण हे असे भोंदू उपचार आवरण्याची गरज आहे. करोनाची भीती घालून आपल्या जमातवादी विचारांचा फैलाव करणारे आणि लोकांना या आजाराची भीती दाखवून बनावट सॅनिटायझर, मास्क बनवून त्यांची आर्थिक लुबाडणूक करणारे दोघेही सारखेच संधीसाधू आहेत. कुठल्याही आरिष्ट्यात आपला ‘धंदा’ शोधणार्‍यांचा हा समूह मानवासाठी करोनाच्या विषाणूपेक्षाही जास्त घातक आहे. काही उथळ प्रसार माध्यमांनीही आजाराचे गांभीर्य ध्यानात न घेता केलेले वृत्तांकन या बेजबाबदारपणात भर घालणारे आहे. पहिली बातमी देण्याच्या स्पर्धेत आणि आपले व्यावसायिक मूल्य जपण्याच्या प्रयत्नात माध्यमांच्या विश्वासार्हतेला तडा जाणार नाही, याची काळजी माध्यमांनी घेण्याची गरज आहे. त्यासाठी जबाबदारीने केलेले वृत्तांकन करोनाविरोधातील या लढ्याला बळच देणारे ठरेल. जगभरात या व्हायरसला हरवण्यासाठी संशोधक, अभ्यासगट युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. यातील संशोधनात्मक कामात नागरिकांना आपले योगदान देता येणार नाही. मात्र, सूज्ञ नागरिक म्हणून जबाबदारीने केलेले वर्तन ही सुद्धा मोलाची मदत ठरणार आहे. सार्वजनिक थुंकणे, पिचकार्‍या मारणे थांबायलाच हवे. शिंक आणि खोकल्याबाबत आवश्यक प्रतिबंधाची काळजी घ्यायला हवी.

- Advertisement -

कुठल्याही संकटात आपला व्यावसाय शोधणार्‍यांचा एक ‘अमानवी’ गट असतोच. तसाच इथंही तो आहे. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये मास्क विक्री सुरू झाली आहे. या मास्कचा दर्जा त्याची गुणवत्ता तपासली जात नाही. मात्र, गोरगरिबांकडून वीस रुपयात दोन अशा पद्धतीने हे ‘रस्त्यावरचे’ मास्क विकत घेतले जात आहेत. मुंबईतील काही भागात बनावट सॅनिटायझर बनवणार्‍यांना पकडण्यात आल्याचेही समोर आले आहे. ही वृत्ती मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍यांसारखीच आहे, अशांना वेळीच रोखायला हवे.

करोनामुळे माणसं माणसांपासून तुटण्याचा धोका आहे. अर्थार्जनाची साखळीतील कडी तुटणार आहे. त्यामुळे त्याचाही विचार करावाच लागेल. ज्यांचे हातावर पोट आहे. ज्यांनी आज कमावले तर उद्या त्यांच्या घरची चूल पेटते अशा कामगारांचा मोठा वर्ग मुंबईसह राज्यात आहे. करोनामुळे या वर्गाला सर्वात मोठा फटका बसणार आहे. माणसांची गर्दी नको म्हणून नाका कामगारांचे काम बंद होण्याची भीती आहे. किरकोळ वस्तूंची विक्री करणारे, रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणार्‍यांना तसेच छोट्या मोठ्या उद्योगधंद्यात सर्वात प्राथमिक स्तरावर काम करणार्‍या कामगाराचा विचार व्हायला हवा. शाळा बंद आहेत, सार्वजनिक ठिकाणी जमावबंदी आहे. अशा परिस्थितीत या विषाणूवर वेळीच नियंत्रण आले नाही, तर लोकल ट्रेन आणि सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद करावी लागणार आहे. मुंबईसारख्या शहरात ६० लाखांपेक्षा जास्त नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची दैनंदिन कामे थांबवणे शक्य नाही. परंतु, अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वतःसह इतरांची काळजी घेण्याची गरज आहे. मी या व्हायरसचा वाहक होणार नाही, इतरांना होऊ देणार नाही, असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त करायला हवा, तो कृतीत आणायला हवा, करोनाबाबत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आणि निकषांचे पालन करायला हवे. कुठल्याही आपत्काळात ऐक्याचे दर्शन घडवणार्‍या सामान्य नागरिकांनी योग्य उपाययोजनांचे पालन केल्यास या करोनाला नामोहरम करणे कठीण नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -