घरफिचर्सडिजिटलचा दिवाळी अंकांच्या दर्जावर आघात!

डिजिटलचा दिवाळी अंकांच्या दर्जावर आघात!

Subscribe

कालचक्राच्या गतीमध्ये वाचन संस्कृती काही अंशी मागे पडली. डिजिटल युगाने वाचन संस्कृतीची मोठी हानी केली. बदलत्या तंत्रज्ञानामुळे जगभरातील मुद्रण व्यवसाय धोक्यात आला. याचा फटका भारतातील वृत्तपत्रे, साप्ताहिके यांना बसला, परिणामी दिवाळी अंकांवरही त्याचा प्रभाव पडला नाही तर नवलच. लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेली अनेक साप्ताहिके, मासिके, प्रकाशित होणे बंद झाले. तर अनेक अंक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यांची धडपड सुरू आहे त्यांची चिकाटी आणि व्यावसायिक तडजोड मोठी कष्टप्रद आहे. त्यामुळे दर्जेदारपणाची जागा सुमारपणाने घेतली आहे.

संपूर्ण भारतासह जगभरातील काही ठिकाणी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होते. प्रत्येक सण, उत्सवावर त्या त्या प्रदेशातील सांस्कृतिक प्रथा, परंपरांचा प्रभाव असतो. मात्र दिवाळी सणाच्या विविध पैलूंमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अत्यंत मानाचे स्थान असलेला एक वेगळा पैलू आहे, तो म्हणजे दिवाळी अंक. दिवाळीच्या फराळासोबत जर दिवाळी अंक नसेल तर, दिवाळीचा आनंद अपूर्ण रहातो अशीच काहीशी भावना मराठी मनावर ठसली आहे, म्हणूनच महाराष्ट्राच्या वाचन परंपरेवर दिवाळी अंकांचा एक वेगळाच प्रभाव बघायला मिळतो. दिवाळी अंक म्हणजे उत्तम साहित्याचं भांडार, हे समीकरण आजही कायम आहे. शतकोत्तर वर्षांची परंपरा असली तरी दिवाळी अंकांनी मराठी साहित्यातील बदलत्या प्रवाहांचं प्रतिनिधित्व प्रामुख्याने केलेलं दिसतं. स्वातंत्र्यपूर्व काळात आलेल्या नवकथा-नवकवितेपासून आताच्या सोशल मीडियावरच्या साहित्यातील बहुतांश वळणं दिवाळी अंकांच्या माध्यमातून मराठी साहित्यात रुळलेली आहेत. दिवाळी अंक हा साहित्यप्रकार मराठीचे देणे असला तरी आताशा बंगाली, गुजराती भाषेतही दिवाळी अंक निघू लागले आहेत. अर्थात त्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. मराठी वाचन संस्कृतीची जोपासना करणार्‍या दिवाळी अंकांचा इतिहास आणि वाचक संस्कृती खूप मोठी असली तरी, मागच्या पिढीने आपल्या हाती दिलेला हा वारसा तेवढ्याच क्षमतेने पुढच्या पिढीच्या हाती सोपविण्यासाठी तो जपला पाहिजे.
दीपोत्सवाच्या या पर्वात दिवाळी अंकाची सुरुवातच कशी झाली याचा मागोवा घेतला तर याची सुरुवात साहित्यिक प्रेरणेतून झाल्याचे दिसून येते. ११६ वर्षांपूर्वी १९०५ मध्ये बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या ‘मित्रोदय’ मासिकाने ‘नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ’ असा उल्लेख करुन एक अंक प्रसिद्ध केला. त्यात कथा, कविता, लेख, नाटक आदी विषयांवर भाष्य केलेले होते. नियमितपणे दिवाळी अंक काढावे हा त्यांचा उद्देश होता की नव्हता, हे निश्चित नसलं तरी दिवाळीनिमित्त वाचकांना काहीतरी वेगळं आणि चांगलं वाचायला द्यावं, ही त्यांची भावना मात्र जरूर होती. ह्या मासिक अंकापासूनच दिवाळी अंकाच्या परंपरेला सुरुवात झाल्याचे मानले जाते. त्या काळातही साप्ताहिके, मासिके निघत असत. पण, खास दिवाळीसाठी निघालेला २४ पानांचा हा पहिलाच अंक होता. आताच्या काळात २४ पानांचा अंक म्हणजे किरकोळ समजला जात असला तरी त्या काळात २४ पानी अंक म्हणजे भला मोठा साहित्यिक खजिना मानला जात होता. या अंकाचे वैशिष्ठ्य असे की, कादंबरी, चरित्र, वैचारिक निबंध अशा भरगच्च मजकूरासाठी अंकातील २४ पैकी १६ पानं मराठी आणि ८ पानं इंग्रजी मजकूरानं भरली होती.
मराठी लेखक, प्रकाशक आणि रसिकांची खरी साहित्यिक दिवाळी या अंकापासूनच सुरू झाल्याचं मानलं जात असलं तरी खर्‍या अर्थाने दिवाळी अंकांचा पहिला मान १९०९ साली प्रसिद्ध झालेल्या काशिनाथ रघुनाथ मित्र यांच्या ‘मनोरंजन’ दिवाळी अंकास जातो. कारण, मनोरंजनाने फक्त दिवाळीसाठी मराठीतील पहिला दिवाळी अंक काढला होता. ‘मनोरंजन’चा पहिला दिवाळी अंक अतिशय आकर्षक स्वरूपात छापण्यात आला होता. ललित वाङ्मयाच्या जोडीला शास्त्रीय, सामाजिक, राजकीय विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यात आले होते. १९२ पानांच्या या अंकाची किंमत एक रुपया होती.
जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतशी मराठी वाचकांची साहित्यिक आणि सांस्कृतिक भूक वाढत गेली. वाचकांच्या मागणीची पूर्तता करताना मराठी प्रकाशक साप्ताहिके, मासिके, पुस्तके आणि दैनंदिन घडामोडींसाठी वृत्तपत्रे जमेल तसे खाद्य देत होती. दिवाळी अंकानी मात्र विविधांगी साहित्याची सकस मेजवानी देऊन वाचकांची क्षुधा शांती करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दिवाळीची सुट्टी आणि आनंदाचे वातावरण, सगे-सोयरे, मित्र आणि सर्व आप्तेष्टांची भेट यामुळे वैचारिक देवाणघेवाणीला चालना मिळत होती. त्यासाठी दिवाळी अंकांची भूमिका मोलाची ठरली. या अंकांनी नवसाहित्याला मुक्त व्यासपीठ मिळवून दिलंच, परंतु तत्कालीन मध्यमवर्गीय मराठीमनाची खरी मशागत करण्याचे कामही दिवाळी अंकांनी केलं.
आधुनिक नवकवितेचे जनक असलेल्या बा.सी.मर्ढेकरांपासून नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ, पु.भा. भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर या सार्‍यांनी आपलं लेखन दिवाळी अंकातूनच केलं आहे. दिवाळी अंक ही सार्‍याच लिहित्या हातांना कायम हक्काची प्रयोगशाळा वाटत होती आणि आजही ही परंपरा कायम आहे. त्यानंतरच्या काळातही दिवाळी अंकांमध्ये साहित्याच्या नवनवीन प्रकारांचा प्रयोग होऊ लागला. मराठी साहित्यात मोलाची भर टाकणारं लेखनही दिवाळी अंकांतून झालं. वर्षभरात जे काही चांगलं सुचलं असेल, ते दिवाळी अंकांसाठी राखून ठेवण्याची एक प्रकारची प्रथाही तयार झाली होती.
कालौघात शैक्षणिक प्रगती, पर्यटनाचा विस्तार, आर्थिक सक्षमीकरण या सर्वांमधून वाचकांची जिज्ञासा अघिकच वाढली. त्यातूनच दिवाळी अंकांमध्ये कथा, कविता, नाटक, कादंबरी यांच्यासोबत इतर भाषांमधील लेखकांच्या अनुवादित साहित्यालाही स्थान मिळाले. पुढे पुढे दिवाळी अंकांचे स्वरुप इतके बदलले की, पर्यटन, राजकारण, ललित, समीक्षा, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय संबंध अशा विषयानुरूप स्वतंत्र दिवाळी अंक निघू लागले. वर्षभरातल्या गाजलेल्या प्रश्नांवर वेगवेगळ्या लोकांना लिहितं करून वाचकांपर्यंत पोहोचविले जाऊ लागले. त्यामुळे एकाच विषयाच्या विविध पैलूंचं भान वाचकांना होत होतं. अबकडई, ऋतुरंग या दिवाळी अंकांनी या दृष्टीने केलेले प्रयोग कमालीचे यशस्वी झाले.
गेल्या काही वर्षात दिवाळी अंकांचं एकूणच स्वरूप बदलून गेलंय. हा बदल बाह्यरूपात म्हणजे कागद-छपाई वगैरै अंगाने झालेला आहेच. मुख्यत: तो मजकुराच्या अंगानेही झालेला दिसतो. सुरुवातीला दिवाळी अंकांमध्ये कथा-कादंबरी-एकांकिका-कविता-परिसंवाद आणि लेख यांना वाचकांकडून मागणी असायची, तशी ती आता राहिलेली नाही. कथेला आजही मागणी असली, तरी कथा लिहिणारी माणसं आताशा राहिलेली नाहीत. तर एकांकिका आणि परिसंवाद आज कालबाह्य झाले आहेत.
कालचक्राच्या गतीमध्ये वाचन संस्कृती काही अंशी मागे पडली. डिजिटल युगाने वाचन संस्कृतीची मोठी हानी केली. बदलत्या तंत्रज्ञानामुळे जगभरातील मुद्रण व्यवसाय धोक्यात आला. याचा फटका भारतातील वृत्तपत्रे, साप्ताहिके यांना बसला, परिणामी दिवाळी अंकांवरही त्याचा प्रभाव पडला नाही तर नवलच. लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेली अनेक साप्ताहिके, मासिके, प्रकाशित होणे बंद झाले. तर अनेक अंक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ज्यांची धडपड सुरू आहे त्यांची चिकाटी आणि व्यावसायिक तडजोड मोठी कष्टप्रद आहे. त्यामुळे दर्जेदारपणाची जागा सुमारपणाने घेतली, तरीही दरवर्षी दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असल्याचे दाखले दिले जातात. गावापासून शहरापर्यंत अनेक दिवाळी अंक निघतात. पण, त्यात बाजारुपणाचा शिरकाव झाला आहे हे नाकारता येणार नाही. केवळ जाहिरातींतून मिळणार्‍या उत्पन्नावर डोळा ठेऊनही काही दिवाळी अंकाची निर्मिती होताना दिसते, अशा अंकातून वाचकांसाठी सकस बौद्धिक खुराक मिळेलच याची सुतराम खात्री नाही. तर दुसर्‍या बाजूला आर्थिक कारणांनी सकस साहित्य देणार्‍या दिवाळी अंकाला वाचक मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यावर उपाय शोधत कालनिर्णयसारख्या काही प्रकाशनसंस्था, व्यक्ती, समुहांनी काळाची पावले ओळखत डिजिटल दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. तुलनेने डिजिटल दिवाळी अंक कमी खर्चात तयार होतात. त्यामुळे कालाय तस्मई नम: असे म्हणत डिजिटल दिवाळी अंकांच्या माध्यमातून वाचकांना साहित्यिक दिवाळीचा आनंद देण्याचा प्रयत्न सुरू झाला असला तरी दिवाळी अंक हे हातात घेऊनच वाचायचे असतात, ही मराठी माणसाची मानसिकता आहे, परंतु आता ही मानसिकता बदलत असल्यामुळे अलीकडे ‘महाराष्ट्र ग्लोबल डॉट कॉम’सारख्या वेगवेगळ्या मराठी साईट्सनी अनेक दिवाळी अंक नेटवर उपलब्ध करून दिले आहेत. महाराष्ट्र ग्लोबल डॉट कॉमने तर त्यासाठी बुकगंगा डॉट कॉम अशी साईटच सुरू केली असून त्यावर शेकडो दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध आहेत. अर्थात, काळानुसार कितीही बदल झाले, तरी शंभर वर्षांनंतर आजही दिवाळी अंक ही मराठी माणसाची सांस्कृतिक गरज आहे आणि दिवाळी अंकांनीही मराठी साहित्याला वेगळं वळण लावण्याची जबाबदारी आजवर कसोशीने पार पाडलेली आहे यात तिळमात्र शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -