घरफिचर्सविज्ञानाच्या वाटेवरचा यात्री

विज्ञानाच्या वाटेवरचा यात्री

Subscribe

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं, तर आपली झोप उडवतं ते खरं स्वप्न असतं. हा विचार वाचताच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आठवण येते. भारतीय विद्यार्थ्यांमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांचा स्मृतिदिन. डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिनअब्दुल कलाम तथा ए.पी.जे. अब्दुल कलाम. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. रामनाथपुरम येथे त्यांचे शालेय शिक्षण पार पडले. डॉ. अब्दुल कलाम लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच लहान मोठी कामे करून मिळालेल्या पैशात ते घराला मदत करत. अशाप्रकारे त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत त्यांना गणिताची आवड निर्माण झाली. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी तिरुचिरापल्ली गाठले. येथे त्यांनी सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून बी.एस् सी. उत्तीर्ण झाल्यानंतर ते ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मध्ये दाखल झाले. या ठिकाणी प्रवेशासाठी पैसे नसताना त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवले. ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ मध्ये त्यांनी एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर चार महिने अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत त्यांनी एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. १९६३ मध्ये डॉ. अब्दुल कलाम यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पीएसएलव्ही (सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल)च्या संशोधनात सक्रिय भाग घेण्यास सुरुवात केली. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाच्या क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यावेळी डीआरडीओमध्ये डॉ. कलाम यांनी सहकार्‍यांच्या गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी योग्य उपयोग होईल याकडे विशेष लक्ष दिले. यावेळी त्यांनी सहकार्‍यांना वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामावर भर देण्याबाबतचे मार्गदर्शन केले. ‘अग्नी’ या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैयक्तिक सल्लागार असताना त्यांनी देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावी धोरणांची आखणी केली. त्याचप्रमाणे संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार तसेच डीआरडीओच्या प्रमुखपदी असताना त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी. रणगाडा आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना गणिताप्रमाणेच विज्ञान विषयाचीसुद्धा प्रचंड आवड होती. संवेदनशील मनाच्या डॉ. कलाम यांना लहान मुलांशी, शाळकरी मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. रुद्रवीणा वाजविण्यात डॉ. कलाम पारंगत होते. डॉ. अब्दुल कलाम हे आजीवन अविवाहित राहिले. देशातीलच नव्हे तर जगातील युवकांसाठी ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते. देशातील युवकांना त्यांनी विकसित भारताचे स्वप्न दाखवले. १५ ऑक्टोबर हा डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस जगभर विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. असे हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ आणि १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च किताबाने सन्मानित करण्यात आले. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला. कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -