घरफिचर्सबँक-म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षिततेसाठी

बँक-म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरक्षिततेसाठी

Subscribe

आपण जेव्हा एखाद्या बँकिंगविषयक घोटाळ्याच्या बातम्या ऐकतो. तेव्हा साहजिकपणे आपल्याला यात आपली बँक तर नाही ना फसलेली? आपले खाते सेफ आहे ना? अशी भीती वाटते. तर कधी आपल्या खात्यातून दुसर्‍याच कोणी पैसे काढले किंवा आपले कार्ड वापरून तिर्‍हाईताने पैसे काढले तर? आपले धाबे दणाणते. असे काही घडेपर्यंत आपण थोडे बिनधास्त असतो. मुळात असे काही घडू नये म्हणून आपण आणि आपल्या बँकेने नित्यनेमाने खबरदारी घेतली पाहिजे.

‘केवळ तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ?’ म्हणूनच बँक, बिगर बँकिंग कंपन्या यांच्या व्यवहारातील जोखीम कमी व्हावी. काळ्या अनधिकृत व्यवहारांना रोखता यावे म्हणून गेली अनेक वर्षे ‘के.वाय.सी.’ कागदपत्रे घेण्यास प्रारंभ झाला. हीच पद्धती म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना कसोशीने पाळली जाते. त्यात म्युच्युअल फंड कंपन्या आणि आपलेही हित साधले जाते आणि गुंतवणूक सुरक्षित राहण्यास मोलाची मदत होते. म्हणून पाहूया के.वाय.सी.साठी कोणती डॉक्युमेंट्स लागतात आणि त्यांचे महत्त्व काय असते.

के.वाय.सी.करण्याचा हेतू काय? आणि कोणती डॉक्युमेंट्स केवायसीसाठी योग्य मानली जातात ?

आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी आपले पैसे गुंतवू इच्छितो. तेव्हा ते आपल्या नावाने सुरक्षितपणे नोंदवले असले पाहिजेत. अफरातफर किंवा फसवणूक करून कोणी आपले पैसे वा गुंतवणूक हिरावून घेऊ नये हा हेतू असतो.त्याकरिता आपली योग्य-कायदेशीर ओळख असणे जरुरीचे असते. असे सिद्ध करण्यासाठी काही प्रमाण कागदपत्रे सर्वसामान्यपणे वापरली जातात. केवायसी म्हणजे बँक्स किंवा म्युच्युअल फंड किंवा तत्सम गुंतवणूक साधने देणार्‍या कंपन्या, यांच्यासाठी नवीन किंवा नियमित गुंतवणूकदाराबाबतची सर्व प्रकारची माहिती असणे जरुरीचे असते. आपण एकाचवेळी अनेक म्युचुअल फंडात पैसे ठेवू शकतो. त्याकरता प्रत्येक फंडाकडे वेगळे केवायसी करण्याची जरूर नाही. सी.डी.एस.एल. अशा सामायिक ठिकाणी केले तरी पुरेसे असते.

- Advertisement -

हेतू आणि उद्देश्य –

१] गुंतवणूकदार हा तोच आहे. बोगस व्यक्ती नाही, हे ओळखण्याची गरज आहे.

२] डमी नावाने कोणी पैसे गुंतवू नये.

- Advertisement -

३] ज्यांच्याकडे काळा पैसा असतो किंवा बेहिशेबी पैसा असतो ते अनेकदा अनेकांच्या नावाने खाती उघडतात आणि गुंतवणूक करतात. तसे करणे म्हणजे कर चुकवणे आणि काळ्या पैशाला उत्तेजन देणे. या अपप्रवृत्तीला आळा घालण्यासाठी केवायसीची शहानिशा आवश्यक असते.

४] अनेकदा काही खाती अनेक वर्षे निद्रिस्त [Dormant Account] असतात, ही बाब गैर-व्यवहार करणार्‍या टोळ्यांना कळली तर ते तोतया खातेदार पाठवून तसे खाते पुन्हा चालू करतात आणि मूळ खातेदाराच्या नकळत त्यातील रक्कम काढून घेतली जातात किंवा काळा पैसा नियमित करण्यासाठी वापरला जातो.
अनेकदा अशी निद्रिस्त खाती अचानकपणे कार्यान्वित केली जातात. [हेदेखील मूळ खातेदाराच्या नकळत !] आणि त्यातून गैरव्यवहार केले जातात. असे होऊ नये म्हणून अशी निद्रिस्त खाती पुन्हा चालू करताना केवायसीची कागदपत्रे नव्याने मागितली जातात. आपण ती जरूर द्यावीत. आपणच मूळ खातेदार आहोत हे सिद्ध करण्यासाठी अशी डॉक्युमेंट सादर करणे हे आपल्या आणि बँकेच्या दृष्टीने हिताचे असते.
मुळात म्हणजे आपण वापरात नसलेली अनावश्यक खाती ताबडतोब बंद करून टाकावीत. तसे पाहिले तर वापरात नसलेले खाते हे बँकेला परवडत नाही. त्याचा किमान वापर व्हावा अशी सर्वच बँकांची अपेक्षा असते. कारण तुमचे खाते पाण्याप्रमाणे प्रवाही राहिले तर पैसे येणे आणि काढणे या उलाढालीतून बँकेला काम आणि उत्पन्न मिळत असते. निद्रिस्त म्हणजेच अचल खात्याद्वारे बँकेला कमाई नाहीच. उलट असेल त्या शिल्लक रकमेवर नियमितपणे व्याज द्यावे लागते. खेरीज निद्रिस्त खात्यात काही गैरव्यवहार घडला तर बँकेचे आर्थिक नुकसान आणि प्रतिमा खराब होण्याचा धोका असतोच. म्हणून हल्ली ‘किमान रक्कम’ ठेवण्याची अट कसोशीने पाळली जाते.

केवायसी नसल्याने संभाव्य धोके आणि उपाययोजना –

१] अनेकदा खोटी नावे आणि कागदपत्रे तयार केली जातात आणि नसलेल्या व्यक्तीच्या नावे व्यवहार पूर्ण केले जातात.

२] अनेक खोटी खाती उघडली जातात त्याद्वारे करपात्र उत्पन्न लपवणे आणि कर बुडवणे असे बेकायदेशीर हेतू साध्य करण्याचा प्रयत्न.

३] इतरांच्या व्यक्तिगत माहितीचा गैरवापर करून त्या व्यक्तीला आणि बँकेला फसवणे-लुबाडणे.

४] म्युच्युअल फंडाबाबत चेक्स देताना योग्य आणि अधिकृत व्यक्तीकडेच ते सुपूर्द करा. मधल्या कोणाकडे कृपया देऊ नका. आपला पोर्टफोलिओ वारंवार तपासून बघा. [एसआयपीचे दर महिन्याचे पैसे व्यवस्थित कापले जाताहेत का आणि त्यांची नोंद दर खेपेला. स्टेटमेंट येते आहे की नाही? हे तपासा] तुम्ही गुंतवणूक केलेली एखादी योजना संपल्यावर किंवा फंड समाप्तीनंतर पैसे परत मागताना केवायसी केलेली असेल तर अडचण होत नाही.

५] ईएमआयचे पुढील १२ महिन्यांचे चेक्स देताना [विशेषतः तुम्ही घेतलेल्या लोनची परतफेड करताना]अधिकृत प्रतिनिधी /कर्मचारी/अधिकारी यांच्याकडेच द्या. अन्यथा गैरव्यवहार होण्याची. तुमचा पैसा दुसरीकडे फिरवण्याचा धोका.

केवायसीची कागदपत्रे सर्वत्र कॉमन असतात त्यांच्यामागचा हेतू जाणून घेऊयात.

अ] तुमची ओळख सिद्ध करण्यासाठी – पासपोर्ट/मतदार ओळखपत्र/आधारकार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/अन्य पुरावे
ब] कायमचा निवासी पुरावा सिद्ध करण्यासाठी- आधार/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र/जागेचे करारपत्र-भाडे पावती/विजेचे-टेलिफोनचे बील

आपला कायमचा पत्ता बदलला किंवा तात्पुरता जरी असेल तरी तो पत्ता जरूर कळवावा किंवा एखादा खातेदार निवर्तला तर बँकेला कळवले पाहिजे आणि तशी कागदपत्रे-पुरावे दिले पाहिजेत.
फटका कायदा [ The Foreign Account Tax Compliance Act-FATCA] आणि अमेरिकेतील अनिवासी भारतीयांसाठी –[N.R.I.] खबरदारी

आपल्या मायदेशात काही पैसे इन्व्हेस्ट करावे अशी अनेक अनिवासी भारतीय मंडळींची इच्छा असते. बँक्स, म्युच्युअल फंड, शेअरबाजार आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते. या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारने घातलेले निर्बंध थोडे अडचणीचे वाटतात.अमेरिकन सरकारने अनिवासी विदेशी नागरिकांसाठी विशेष कायदा-.‘फटका’ संमत केला आहे.त्यानुसार काही निर्बंध लादलेले आहेत. प्रत्येक अमेरिकन करदात्यांनी आपण परदेशात केलेल्या गुंतवणुकीची माहिती, अमेरिकन प्राधिकरणाला देणे अनिवार्य आहे. यामुळेच आपल्याकडील म्युच्युअल फंडांनी अमेरिकन अनिवासी भारतीयांनी केलेल्या गुंतवणूक संदर्भात वेगळा फॉर्म भरून ‘फटका’ची पूर्तता करीत आहेत. तसाच फॉर्म सर्वसाधारण गुंतवणूकदारांकडूनदेखील भरून घेत आहेत आणि सावधगिरी बाळगत आहेत. यातून अमेरिकन कायद्याची पकड आणि करचुकवेगिरीला घातलेला आळा-जरब दिसून येते. आपल्या गुंतवणूकीबाबत आपणच योग्य खबरदारी घेतली पाहिजे. अनेकदा आपल्याला केवायसी डॉक्युमेंटस देणे कंटाळवाणे वाटते. पण आपला पैसा-आपले खाते आणि आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी इतकी काळजी घ्यायलाच पाहिजे. चला तर मग आपल्याला बँक-म्युच्युअल फंडाचे रिमाइंडर येण्याआधी आपण जागरूक होऊया.


राजीव जोशी

-बँकिंग व अर्थ अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -