घरक्रीडाराहीने एशियाडचा गड जिंकला

राहीने एशियाडचा गड जिंकला

Subscribe

काही वर्षांपूर्वी भारताचे अ‍ॅथलिट सांघिक प्रकारांत आणि वैयक्तिक खेळांत चमकदार कामगिरी करत नव्हते. परंतु, गेल्या दशकभराच्या कालखंडात भारतीय अ‍ॅथलिट आंतराष्ट्रीय पातळीवर चमकू लागले आहेत. देशातील विविध राज्यांतून आंतराष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू देशासहीत आपल्या राज्याचे, जिल्ह्याचे नाव उंचावतात. त्या खेळाडूंपैकी एक म्हणजे कोल्हापूरची राही सरनोबत.

एखाद्या खेळात संघाचे नेतृत्व करणे आणि ती लढाई जिंकणे ही मोठी गौरवास्पद बाब असते. राही सरनोबत हिने आपल्या नावाला साजेशी कामगिरी करून नेमबाजीच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करत एशियाडची कामगिरी फत्ते केली. एशियाडच्या इतिहासात सुवर्ण पदक जिंकणारी राही सरनोबत ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. राहीने जकार्ता-पालेमबँग एशियाडमध्ये २५ मीटर पिस्तूलच्या सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. राही आणि थायलंडची नाफस्वान या दोघींमध्ये झालेली शूटऑफची लढत चित्तथरारक अशी होती. अखेर या लढतीत राहीने बाजी मारली.

२०१३ साल राहीच्या कारकीर्दीतील मैलाचा दगड ठरले. दक्षिण कोरियात पार पडलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत तिने २५ मीटर स्पोर्टस पिस्तूलचे सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र शासनानेही एक कोटी रूपयांचे इनाम बहाल करून राहीला सहकार्य केले. यशाची घोडदौड सुरू असताना राहीच्या पाठीमागे दुर्दैवाचा फेरा लागला. एका छोट्या अपघातात तिचा खांदा दुखावला. पाठदुखीनेही हैराण केले. त्यात भर म्हणून तिचे प्रशिक्षक अनातोली यांचे निधन झाले. या कठीण परिस्थितीशी राही एकट्याने लढली आणि जिंकली देखील.

- Advertisement -

एशियाडमध्ये नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकून देणार्या एशियाडच्या इतिहासात आजवर रणधीर सिंग, जसपाल राणा, रंजन सोधी, जीतू राय आणि यंदा सौरभ चौधरी या पाच पुरुषांच्या सोबत राही सरनोबत ही सहावी भारतीय आणि पहिली महिला भारतीय ठरली. नेमबाजीत सर्वोत्तम कामगिरी बजावण्याची राहीची ही काही पहिलीच वेळ नव्हती. २०१० सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने २५ मीटर रॅपिड पिस्तूल दुहेरीचे सुवर्ण आणि एकेरीचे रौप्य पदक पटकावले होते. २०१४ सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही ती २५ मीटर रॅपिड पिस्तूलच्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. २०१४ सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये तिचा भारताच्या कांस्य विजेत्या संघात सहभाग होता. आता तिला जर्मनीच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या मुन्खबायर डॉरसरेनच्या रुपाने तिला नवी गुरू लाभली. त्यांनी कठीण प्रसंगी राहीला चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे राहीला ही सुवर्ण कामगिरी करता आली. आपल्या यशाचा वारू जोशात हाकणार्या राहीची आता पुढील लढत दक्षिण कोरियातील जागतिक नेमबाजीत आहे.

-रोशन चिंचवलकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -