घरफिचर्सवंचितांच्या शोषणाचा दस्तावेज

वंचितांच्या शोषणाचा दस्तावेज

Subscribe

शोषितांच्या दु:खाचा अत्यंत सशक्त आविष्कार साठोत्तरी काळात साहित्य चळवळींच्या दाबातून मराठी साहित्यातून झाला. त्यातून शोषितांचे जग आणि शोषणाचे समाजशास्र घडवणार्‍या व्यवस्थेचा चेहरा उघड झाला. शोषणाच्या बहुस्वरीय आवाजाची अभिव्यक्ती करत दणकट काव्याची निर्मिती केली. याच परंपरेचे सत्त्व घेऊन आज आश्वासक काव्यलेखन करणारे नाव म्हणजे सुदाम राठोड. त्यांचा ‘आपल्यात कुणीही युध्दखोर नव्हते!’ हा संग्रह प्रसिध्द झालेला आहे. युध्दखोर नसलेल्या समूहाचा वर्तमानिक आवाज या काव्यसंग्रहातून प्रकटतो.

बहुजन-अभिजनांचा पूर्वापार संघर्ष या देशात घडत आलेला आहे. या संघर्षात बहुसंख्य असलेल्या बहुजनांना मूठभर अभिजनांनी वर्ण-धर्म-जात व्यवस्थेची सुनियोजित चौकट तयार करून गुलाम बनवले. हजारो वर्षे अज्ञानी ठेवून त्यांचे अतोनात शोषण केले. शोषणाने ते इतके पिचून गेले की त्यांच्यातील युध्दाचे आणि लढण्याचे बळच निघून गेले. बहुजन समूहातील सर्व पोटसमूह श्रमसंस्कृतीचा वारसा सांगणारे आहेत. त्यात शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, भटके-भटके विमुक्त अशा शोषल्या गेल्या जनसमूहांचा समावेश करता येईल. पुरुषसत्ताक व्यवस्थेने माणूसपण नाकारलेल्या स्री वर्गाचाही यात अंतर्भाव होईल. हे सारे वर्तमानातील समूह इतिहासकाळातील बहुजन परंपरेचे वारसदार आहेत. या शोषितांच्या दु:खाचा अत्यंत सशक्त आविष्कार साठोत्तरी काळात साहित्य चळवळींच्या दाबातून मराठी साहित्यातून झाला.

त्यातून शोषितांचे जग आणि शोषणाचे समाजशास्र घडवणार्‍या व्यवस्थेचा चेहरा उघड झाला. या जाणिवेतून लिहिल्या गेलेल्या मराठी कवितेने वंचितांचे जीवनभान अत्यंत टोकदारपणे प्रकट केले. शोषणाच्या बहुस्वरीय आवाजाची अभिव्यक्ती करत दणकट काव्याची निर्मिती केली. याच परंपरेचे सत्त्व घेऊन आज आश्वासक काव्यलेखन करणारे नाव म्हणजे सुदाम राठोड. त्यांचा ‘आपल्यात कुणीही युध्दखोर नव्हते!’ हा संग्रह प्रसिध्द झालेला आहे. युध्दखोर नसलेल्या समूहाचा वर्तमानिक आवाज या काव्यसंग्रहातून प्रकटतो. वंचित-शोषितांच्या जगण्याचा आशय या संग्रहातील पस्तीस कवितांमधून व्यक्त होतो. शोषितांची बाजू घेत त्यांनी समष्टीतील सामाजिक-सांस्कृतिक रचिताची केलेली पोलखोल आजच्या काळाचे वर्तमान अधोरेखित करणारी आहे.

- Advertisement -

समकाळातील सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय-आर्थिक-शैक्षणिक व्यवस्थांच्या अवमूल्यनाने आणि लुटारू वृत्तीने सर्वसामान्य माणूस व्यवस्थेच्या बाहेर फेकला गेला. त्याच्याभोवतीचे शोषणाचे फास सैल होण्याऐवजी अधिक घट्ट होत गेले. त्याची माणूस म्हणून किंमत शून्य झाली. शोषिक-शोषितांमधील अंतर वाढत जाऊन कोलाहलमय जीवनव्यवस्था आकाराला आली. या गेल्या पाव शतकाने घडवलेल्या वास्तवाचे चित्र या कवितेने साक्षात केले आहे. वंचित समूहांच्या बहुविध स्तर-अस्तराचा वेध घेत ही कविता मूल्यांच्या अराजकाचे काळसापेक्ष संभाषित सांगू पाहते. चिमण्यांचे पंख शाबूत ठेव, त्यांचा वंश जागता ठेव, आणि या भयंकर कोलाहलातही चिमण्यांची, चिवचिव जिवंत ठेव! अशी अपेक्षा व्यक्त करत ही कविता आदिम मूलस्रोतांची जाणीव करून देते. जे समूह पूर्वापार काळापासून शोषित आहेत, त्यांचे जगणे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही बदलले नाही. त्यांच्या दिनक्रमातील परवड, उपेक्षा, अवहेलना आणि भाकरीसाठीचा संघर्ष पराकोटीला पोहचलेला आहे. शहरं भौतिकदृष्ठ्या प्रचंड सुबक आणि आकर्षक झाली; परंतु ही माणसं मात्र दिवसेंदिवस बेदखल होत चालली आहेत. म्हणून कवी लिहितो, त्यांचे बापजादे आले होते गावकुसाबाहेरच्या कचर्‍यातून, इथे येऊनही कचर्‍याने सोडली नाही पाठ. असा कचरा बनून गेलेल्या माणसांच्या असीम दु:खाची अनुभूती या कवितेने अत्यंत ताकदीने मांडलेली आहे.

जागतिकीकरणोत्तर काळात जगण्याचे सत्त्व हरवत त्याची प्रचंड पडझड होऊन मानवी साम्राज्य नफ्या तोट्याच्या तत्त्वावर पसरत चालल्याचा आशयार्थ आणि निसर्गाची प्रकृती बिघडवणार्‍या मानवी हस्तक्षेपाने माणसांचे व प्राणी-पशुपक्ष्यांचेही जगणे धोक्यात आल्याची जाणीव ही कविता व्यक्त करते. भांडवली व्यवस्थेने सर्वहारा वर्गाचे जगणे गिळंकृत करून टाकले आहे. गरीब-श्रीमंताची प्रचंड विषमता या व्यवस्थेने निर्माण केली आहे. भांडवलदार गब्बर होत गेले आणि कंगाल अधिक कंगाल होत गेल्याचे सारसूत्र तीमधून प्रकट होते. त्यामुळेच कवी लिहितो, अन् तुझ्यासहित काळाचा रंगेल घोडा निघून गेला महासत्तेकडे, तिथं तुझं खाजगीकरण झालं, अन् मी मात्र उधार आयुष्यावर उदार होत राहिलो. काळाच्या दिवाळखोरीने भ्रमिष्ट झालेल्या तरूणाईच्या वर्तमान कहाणीला ही कविता शब्द देते. हे दशक तसे खतरनाक होते, नेमके जागतिकीकरणाच्या बांधावर फळले होते, धड जुने नव्हते धड नवे नव्हते. अशा काळाच्या संक्रमणाने संभ्रमित झालेल्या, जगण्याच्या दिशा धुसर होत असलेल्या आणि इतिहासगत शोषितांचे जीवन अधिकाधिक बथ्थर करणार्‍या काळाच्या जीवनरचिताला ही कविता थेट भिडते. या काळाने घडवलेल्या शोषणाचे बहुविध अंत:स्तर उलगडून सांगते. सोशिकतेलाच समजत राहिलो इमानदारी अन् शांत बसण्याला शहाणपणहा शोषितांचा व्यवस्थाशरणतेतून आलेला स्थितीशील भावही व्यक्त करते.

- Advertisement -

मालकी हक्कांसाठी बहुसंख्यांना गुलाम करणार्‍या लोकांची संख्या मूठभर असते. काळबदलात मुठी बदलतात; पण वृत्ती कायम राहत असल्याचे सांगून ही कविता लिंग-वर्ण-वर्ग-जात-धर्म-वंशाच्या आधारे प्रस्थापित केला जाणारा सांस्कृतिक वर्चस्ववाद आणि मूलतत्त्ववादाचे षडयंत्र उघड करते. स्त्रीला माणूस म्हणून समजून घेणारी वैश्विक जाणीव या कवितेने उजागर केलेली आहे. स्रीला एका बाजूला देवी बनवून तिचे उदात्तीकरण करायचे आणि दुसर्‍या बाजूला पराकोटीचे शोषण. या दांभीक वृत्तीचा या कवितेने निषेध केलेला आहे..‘आई आता मला तुझी आई बनू दे!’ अशा स्रीविषयीच्या माणूसपणाची नितळ जाणीव ही कविता व्यक्त करते. पुरूषसत्ताक व्यवस्थेच्या कैदखान्यात खितपत पडलेल्या स्त्रियांच्या मुक्तीचा आवाज बनून ही कविता उभी राहते. पोथीनिष्ठ फेमिनिझमपेक्षा या कवितेला प्रत्यक्ष कृतिशीलता महत्त्वाची वाटते. ती स्रीजन्माचे स्वागत करत लिंग समानतेचा आग्रह धरत योनीला गुलाम करणार्‍या व्यवस्थेचा समाचार घेते. वेश्येला मानवी पातळीवरून समजून घेत पोटाच्या आणि पोटाखालच्या भूकेचा वास्तवशोध घेते. शरीर विकणार्‍या स्त्रियांच्या हक्काची भाषा बोलते.

लढणार्‍या स्त्रियांचा सन्मान करत स्त्रियांना बायको म्हणून गुलाम करणार्‍या व्यवस्थेला जाब विचारते. घागरी घागरीने होत असतात उतराई, आयुष्य आटून जातं; पण कर्ज काही फिटत नाही. या भारतीय स्त्रियांच्या वाट्याला आलेल्या भोगवट्याची वर्तमान स्थितीही अधोरेखित करते.

अधोविश्वाची बाजू घेत कवीने त्यांच्या यातनामय जगाचा, आभावग्रस्त दुनेयेचा आणि पराभूत माणसांचा चेहरा या संग्रहातून समोर आणलेला आहे. समाजातील सर्वच तळसमूहांच्या वेदनेचा सहानुभाव या कवितेने विशद केलेला आहे. पीडित जगातील अनेकविध माणसांचे प्रतिनिधित्त्व करणारी ही कविता आहे.

कचर्‍याच्या ढिगावर भंगार गोळा करणारी, कचरा वेचणारी, गवंड्याच्या हाताखाली काम करणारी, फुटपाथवर कुत्र्यासारखी निवारा शोधणारी, काही दोष नसताना रोज नवर्‍याचा मुकाट मार खाणारी, दंगलीत विनाकारण भोसकली जाणारी, वेश्या, बारबाला, रात्रपाळीचे कामगार, पुलाखालची बेवारस अशी अनेक माणसं या कवितेत भेटतात. ग्रामीण, दलित, आदिवासी, भटके यांच्या जगण्याचा लेखाजोखाही ही कविता मांडते, धार्मिक अस्मितांसाठी स्त्रियांवर होणारे बलात्कार, हंडाभर पाण्यासाठीची वणवण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी या प्रश्नांसह दारिद्य्राच्या अर्थकारणाचा वेध ही कविता घेते. म्हणूनच आजच्या बकाल जगाचा आलेखपट मांडणारी ही कविता महत्वाची वाटते.

महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भक्कम वैचारिक अधिष्ठान या कवितेच्या तळाशी आहे. या विचार उजेडाच्या नजरेतून ही कविता समाजाचे वाचन करत शोषणाचे समाजशास्र उघड करते. मेंदूला डोळे फुटायला, तसा उशीरच झाला, तुझ्या सावलीत यायला हा आपराधभाव व्यक्त करून ही कविता डॉ.आंबेडकरांचे सर्वव्यापित्त्व विशद करत तूच आमचा बाप आणि तूच आमची आई, असा गौरव करते. तुकाराम, नामदेव ढसाळ आणि अरूण काळेंच्या विद्रोही भूमिकेचा संस्कार रिचवत आविष्कृत झालेली ही कविता या परंपरेला पुढे घेऊन जाणारी आहे.‘कचरा वेचणार्‍या झिपर्‍या पोरी’, ‘व्यथा चौर्‍यांशीची’, ‘बुधवार पेठ: एक भूकेचं ब्रम्हांड’, ‘आंबेडकर’, ‘ ‘योनिमीमांसा’, ‘सनी लिओनचा उन्माद आणि नेमाडेंचा देशीवाद’ या कविता आजच्या मराठी कवितेतील महत्त्वाच्या आणि श्रेष्ठ कविता आहेत. प्रतिमेचा अतिरेक टाळून प्रमाणभाषेला वाकवत वक्तृत्त्वशीलतेसह संवादात्मक बनलेली ही मुक्तबंधातील कविता स्वतंत्र शैलीची आहे. वैचारिकता आणि चिंतनशीलता हा या कवितेचा मूलधर्म आहे. आशय-अभिव्यक्तीची नवी संरचना घडवत आकारलेली ही कविता मराठी कवितेत वंचित माणसाच्या शोषणाचा दस्तऐवज म्हणून अक्षर ठरण्याची क्षमता बाळगून आहे.

– केदार काळवणे, सहायक प्राध्यापक, मराठी विभाग, शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब, जि.उस्मानाबाद. पिन:413507, ईमेल : घशवरी.ज्ञरश्रुरपश.28सारळश्र.लेा मो : 7020634502

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -