घरफिचर्सस्वातंत्र्यसैनिक, प्रभावी संघटक 

स्वातंत्र्यसैनिक, प्रभावी संघटक 

Subscribe
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तम संघटक रावसाहेब पटवर्धन यांचा २८ ऑगस्ट हा स्मृतिदिन. १५ जुलै १९०३ रोजी हरिभाऊ पटवर्धनांच्या सधन, सुसंस्कृत कुटुंबात रावसाहेबांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरी केशव पटवर्धन हे अहमदनगरमधील प्रसिद्ध वकील होते. हरिभाऊ व सेनापती बापट हे सहाध्यायी होते. रावसाहेबांचे नाव पुरुषोत्तम असे ठेवण्यात आले होते. त्यांना सर्व राऊ असे म्हणत असत. रावसाहेब नावाप्रमाणेच रूपवान आणि बुद्धिवान होते.

रावसाहेबांचे पाठोपाठ अच्युतराव, जनार्दनपंत, बाळासाहेब, पद्माकर, मधुकर आणि विजयाताई ही भावंडे जन्माला आली.रावसाहेबांचे व अच्युतरावाचे शिक्षण नगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये झाले. त्याकाळी रावसाहेबांचे वडील हे लोकमान्य टिळक आणि डॉ. अ‍ॅनी बेझंट यांच्या होमरुल लीगचे काम करीत असत. ते विचाराने थियॉसॉफिस्ट होते. डॉ़ अ‍ॅनी बेझंट नगरला आल्यावर त्यांचा मुक्काम पटवर्धन वाड्यातच असावयाचा. हरिभाऊंनी त्यांच्या मुलांवर आणि परिसरातील मुलांवर देशभक्तीचे संस्कार केले. हिंदी, इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयांचा  अभ्यास व पाठांतर करण्याची सवय प्रथमपासूनच लावल्यामुळे त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये पारितोषिकेही मिळविली होती.  १९२० साली लोकमान्य टिळकांचे निधन झाले.

स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. या वर्षाचे अखेरीस नागपूरला जे काँग्रेसचे अधिवेशन झाले, त्यामध्ये असहकारितेची कल्पना विविध कार्यक्रमाद्वारे स्पष्ट करण्यात आली. या निश्चित कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य आंदोलनाची कल्पना सर्वसामान्यांपर्यंत नेता आली. सर्व तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला. देशासाठी प्रत्येकजण स्वार्थ त्याग करू शकतो. स्वातंत्र्य लढ्यात नवे चैतन्य, नवे सामर्थ्य निर्माण झाले.सर्वत्र सत्याग्रहाचे वारे वाहू लागले, या प्रवाहापासून रावसाहेब आणि त्यांचे बंधू अच्युतराव अलिप्त राहिले नाही. देशभक्तीचे संस्कार बालपणापासूनच झालेल्या रावसाहेबांवर विद्यार्थी दशेत ऐन तरुण वयात असतानाच गांधीवादाचा संस्कार झाला. त्यांच्या कर्तृत्वाची सुरुवातच गांधीयुगात झाली.

- Advertisement -

१९३०, १९३२, १९३९ व १९४२ अशा चारही लढ्यात त्यांनी दीर्घ मुदतीचा कारावास भोगला. रावसाहेब एका श्रीमंत कुटुंबात जन्मले होते. बनारस येथे उच्च शिक्षण घेतलेल्या रावसाहेबांना प्राध्यापक, संशोधक, वकील म्हणून लौकिक मिळवता आला असता. पण देशातील अस्थिर परिस्थितीने त्यांना अंतर्मुख केले व आपले सारे जीवन त्यांनी देशसेवेसाठी वेचायचा निर्धार केला. त्यांनी गांधीजींच्या संघर्षात्मक व विधायक अशा दोन्ही कार्यात सक्रिय सहभाग घेतला. खादी व ग्रामोद्योग, अस्पृश्यता निर्मूलन, हिंदू-मुस्लिम ऐक्य व दारूबंदी ही गांधीजींची चतु:सूत्री त्यांना पूर्णत: मान्य होती. रावसाहेबांनी नगरमध्ये संघशक्ती हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाद्वारे त्यांनी महात्माजींचा संदेश खेडोपाड्यापर्यंत पोहचवला. स्वदेशीची चळवळ त्यांनी झोपडीपर्यंत नेली. त्यांनी स्थापन केलेल्या साखर कामगार युनियनमार्फत १०० चरखे फिरू लागले.

१९४२ च्या आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी कार्य केले. ब्रिटिश सरकारने त्यांना पकडून देणाºयास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. १९४५ साली रावसाहेबांची तुरुंगातून सुटका झाली. साखर कामगारांच्या संघटना स्थापून त्यांना हक्कांची जाणीव करून दिली. कामगारांना पगारी रजा, बोनस, ग्रॅच्युईटी, प्रॉव्हीडंट फंड, पगारवाढ, राहण्यास घरे या मागण्या मिळवत असताना मुलांच्या शिक्षणाची सोय केली.  स्वातंत्र्य प्राप्तीनंतर रावसाहेबांनी देशाचे उपराष्टÑपतीपद स्वीकारावे किंवा निदान ब्रिटनमधील हायकमिशनरपद  तरी स्विकारावे अशी गळ नेहरूंनी घातली. पण  रावसाहेबांनी सत्तेच्या जागा घेण्याचे नाकारले. एकदा पंडित नेहरू रावसाहेबांना म्हणाले, ‘राऊ मी तुझ्यासाठी काय करावे म्हणजे तुझे समाधान होईल.’ रावसाहेब पंडितजींना म्हणाले, ‘मला तुमचा असा एकुलता एक मित्र समजा की, त्याने तुमच्याजवळ काही मागितले नाही व ज्याच्यासाठी तुम्ही काही केले नाही़’ यातून त्यांची विशुद्ध मैत्री आणि निरपेक्ष प्रेम दिसून येते. २८ आॅगस्ट १९६९ रोजी रावसाहेबांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -