घरफिचर्सइतिहास संशोधक न. र. फाटक

इतिहास संशोधक न. र. फाटक

Subscribe

नरहर रघुनाथ फाटक यांचा आज स्मृतिदिन. न. र. फाटक हे नामवंत पत्रकार, प्राध्यापक, मराठी संतसाहित्याचे चिकित्सक, इतिहाससंशोधक आणि चरित्रकार होते. त्यांचा जन्म 15 एप्रिल 1883 रोजी भोर तालुक्यातील जांभळी या गावी झाला. त्यांचे शिक्षण भोर, पुणे, अजमेर, इंदूर आणि अलाहाबाद या ठिकाणी झाले. १९१७ साली अलाहाबाद विद्यापीठातून ते तत्वज्ञान हा विषय घेऊन बी. ए. झाले. त्यानंतर काही काळ विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नवा काळ या नियतकालिकांच्या संपादनकार्यात त्यांनी भाग घेतला. ‘सत्यान्वेषी’ आणि ‘फरिश्ता’ या टोपण नावांनी त्यांनी बरेच वृत्तपत्रीय लेखन केले आणि आपल्या निर्भीड पत्रकारितेचा ठसा उमटविला. १९३५-३७ या काळात श्रीमती नाथीबाई ठाकरसी विद्यापीठात आणि त्यानंतर मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजात ते मराठीचे प्राध्यापक होते. याच कॉलेजातून १९५७ साली ते सेवानिवृत्त झाले.

इतिहासाचार्य राजवाडे यांच्यामुळे फाटक हे इतिहास संशोधनाकडे ओढले गेले होते. मराठी भाषा-साहित्याच्या व्यासंगाबरोबरच संस्कृत, इंग्रजी, हिंदी या भाषांतील साहित्याचा त्यांनी रसिक व आस्थेवाईक दृष्टिकोणातून परिचय करून घेतलेला होता. त्यामुळे त्यांचे मराठीचे अध्यापन एकांगी आणि एकारलेले असे न होता त्याला एक स्वाभाविक अशी बहुसंदर्भशीलता प्राप्त झालेली होती. केवळ पाठ्यपुस्तकांवर भर न देता त्यांच्या अनुषंगाने विविध विषयांचा परामर्श घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करावयास प्रवृत्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.

- Advertisement -

मराठी संतांच्या वाङ्मयाचे आणि कार्याचे सामाजिक-ऐतिहासिक दृष्टिकोणातून त्यांनी केलेले विश्लेषण आणि समालोचनही महत्वाचे आहे. सामाजिक-सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्याचे एक साधन म्हणून फाटक साहित्याकडे पाहत. त्यांची ही वैशिष्ठ्यपूर्ण वाङ्मयदृष्टी ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी (१९४८), श्री एकनाथ वाङ्मय आणि कार्य (१९५०), ज्ञानेश्वर : वाङ्मय आणि कार्य (१९५२), रामदास : वाङ्मय आणि कार्य (१९५२) यांसारख्या त्यांच्या ग्रंथांतून प्रत्ययास येते. मराठ्यांचा इतिहास हाही त्यांच्या व्यासंगाचा आणि चिकित्सेचा एक विषय. मराठेशाहीचा अभ्यास, अठराशे सत्तावनची शिपाईगर्दी हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या निधनानंतर थोड्याच अवधीत न. चिं. केळकर ह्यांनी विस्तृत प्रमाणात टिळकांचे चरित्र प्रसिद्ध केले. त्याच्यातील अनेक घटना आणि व्यक्तिविषयक निर्देश कसे चुकीचे आहेत हे विविधज्ञानविस्तार ह्या मासिकात अनेक परीक्षणात्मक लेखांक लिहून त्यांनी प्रकाशात आणले. या महत्वाच्या लेखनामुळे फाटकांकडे महाराष्ट्रातील सुशिक्षितांचे लक्ष एक महत्वाचा चिकित्सक म्हणून प्रथमच वेधले गेले. पुणे जाळणार्‍या यशवंतराव होळकरांची एक नवी, उजळ प्रतिमा फाटकांनी त्याचे चरित्र लिहून पुढे आणली. न्या. महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक यांच्या कार्याची मीमांसाही फाटक यांनी केलेली आहे. आदर्श भारत सेवक (१९६७) या नावाने त्यांनी लिहिलेल्या गोपाळकृष्ण गोखले यांच्या चरित्र्याला १९७० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. अशा या प्रतिभाशाली इतिहास संशोधकाचे 21 डिसेंबर 1979 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -