घरफिचर्सपुण्यात्म्याचे पुण्यमरण

पुण्यात्म्याचे पुण्यमरण

Subscribe

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील परसुले गावचे मारुतीबुवा सकपाळ पन्नास वर्षापूर्वी मुंबईत आले आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी येथे जम बसवला. तीन मुले (शिवाजी, सुरेश, दत्ताराम), दोन मुली (सविता, कविता), नातवंडे, पतवंडे अशा कुटुंबकबिल्यात वावरताना ते पूर्ण समाधानी होते. वयाची ८७ वर्षे म्हणजे रुढार्थाने वार्धक्य. परंतु या वार्धक्याच्या खुणा त्यांच्या रोजच्या जीवनात चुकूनही दिसल्या नाहीत.

१५ फेब्रुवारी २०१८, रात्रीचे आठ वाजलेले. ताडदेवच्या नवी जायफळवाडीत महाशिवरात्रीनिमित्त आयोजित होत असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या बेचाळीसाव्या वर्षातील संध्याकाळचा हरीपाठ संपत असतानाच एका पुण्यात्म्याला पांडुरंगाने साद घातली. या पृथ्वीतलावरील त्याची सेवा मानवल्यामुळे देवाने थेट आपल्या चरणी रुजू होण्याचा इशारा केला. तो हुकूम शिरसावंद्य मानत त्या पुण्यात्म्याने क्षणार्धात इहलोकातील नश्वर देहाचा त्याग केला. पांडुरंगाच्या सान्निध्यात असताना, त्याचेच अखंड नामस्मरण करत असताना पुण्यमरण येणारा तो पुण्यात्मा म्हणजे आबालवृद्धांत परिचित असलेले मारुतीबुवा. त्यांच्या देहत्यागानंतर उत्स्फुर्तपणे व्यक्त झालेल्या भावनातून मारुतीबुवांविषयीची आत्मीयताच दिसून आली.

“संपूर्ण जायफळवाडीच्या सुखदु:खात सदैव सहभागी होणार्‍या व जायफळवाडीच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासाचा साक्षीदार असणार्‍या पितृतुल्य व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.””आज तो आवाज नव्हता, आज ती लगबग नव्हती. मयताच्या अवती भवती फिरून कुटुंबियांना दमदाटी करून नकळत जगण्याचे सामर्थ्य देणारा सूर नव्हता. तिरडीला उशीर होणार म्हणून दाटवणारा बाप नव्हता. भावपूर्ण श्रध्दांजली. “पांडुरंगाच्या नामस्मरणात असताना त्यांना पांडुरंगाचे बोलावणे यावे यासाठी खूप मोठं भाग्य आणि पुण्य गाठीशी असावं लागतं …आमच्या सदैव स्मरणात राहतील ते. वार्धक्य म्हणजे काय हे त्यांना ठाऊकच नव्हतं. खूप काही शिकवून गेले.”

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील परसुले गावचे मारुतीबुवा सकपाळ पन्नास वर्षापूर्वी मुंबईत आले आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी येथे जम बसवला. तीन मुले (शिवाजी, सुरेश, दत्ताराम), दोन मुली (सविता, कविता), नातवंडे, पतवंडे अशा कुटुंबकबिल्यात वावरताना ते पूर्ण समाधानी होते. वयाची ८७ वर्षे म्हणजे रुढार्थाने वार्धक्य. परंतु या वार्धक्याच्या खुणा त्यांच्या रोजच्या जीवनात चुकूनही दिसल्या नाहीत. कारण या वयातही ते अखंड उत्साहात वावरायचे. गावच्या आणि नवी जायफळवाडीच्या अखंड हरीनाम सप्ताहात ते सारख्याच उत्साहात सहभागी व्हायचे. हाती वीणा घेऊन नामस्मरण करताना वेगळीच ऊर्जा त्यांच्या अंगी निर्माण होई आणि तरुणालाही लाजवेल अशा प्रकारे जागच्या जागी उड्या मारुन ती ऊर्जा प्रकट होत असे. वीणा हाती धरुन तासन्तास उभे राहताना अखंड हरीनामाचा वसा त्यांनी सोडला नाही. मापू परिवार आयोजित महोत्सवात अभंग रिपोस्टचा कार्यक्रम सुरू असताना तल्लीन होऊन नाचत असलेल्या मारुतीबुवांना पाहून अभंग रिपोस्टचे कलाकारही त्यांची या वयातील ऊर्जा पाहून अचंबित झाले होते.

नवी जायफळवाडीत तर त्यांच्या मिश्कील स्वभावामुळे लहानासोबतच मोठ्यांबरोबरही बोलताना थोडीसी खट्याळपणाची झाक असे. कुठल्याही कुटुंबात मयत झाले तर सर्वात प्रथम मारुतीबुवा हजर होत आणि सर्व सूत्रे हाती घेत. दम देऊन का होईना शोकाकुल नातेवाईकांची समजूत काढून पुढच्या तयारीला लागत. कारण पार्थिव जास्त वेळ अंतिम संस्काराविना ठेऊ नये याची त्यांना जाण होती. खणखणीत आवाजात ’ जय राम श्री राम’ म्हणत ते अंत्ययात्रेला सुरुवात करत. राम माळकरांनी याचीच आठवण काढताना त्या खणखणीत आवाजाची उणीव यापुढे नक्कीच भासेल असे श्रद्धांजली वाहताना म्हटले.

- Advertisement -

मारुतीबुवांच्या अंत्ययात्रेला लोटलेला जनसागर त्यांच्या दांडग्या जनसंपर्काची साक्ष देणारा होता. यात गावकरी, नातेवाईक, जायफळवाडीतील जुने, नवे रहिवाशी व बर्‍याचशा सहकार्‍यांचा समावेश होता. नवी जायफळवाडीतील राहते घर ते चंदनवाडी स्मशानभूमी या त्यांच्या अखेरच्या प्रवासातही टाळमृदंगाच्या जोडीने हरीनामातील भजनांनी त्यांची साथसोबत केली. हल्ली पायी अंत्ययात्रेचे प्रमाण कमी होत असताना मारुतीबुवांची अंत्ययात्रा मात्र पायीच निघाली. बर्‍याच जणांना त्यांच्याविषयी श्रद्धांजलीपर बोलायचे होते. परंतु वेळमर्यादेमुळे मोजक्याच व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. सगळ्यांच्याच बोलण्यातून त्यांचे वेगवेगळे पैलू समोर आले. नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या. असे पुण्यमरण यायलाही पुण्याई लागते आणि ती मारुतीबुवांना कमावून ठेवली होती. त्यांना पुण्यमरण आले तरी त्यांच्या कुटुंबासाठी ते आधारवड होते. कर्तापुरुष जिवंत असेपर्यंत सगळ्याच परिवाराला एक भक्कम आधार असतो. त्यामुळे त्यांच्या जाण्याने तो आधार निघून गेला आहे. परंतु त्यांचा स्मृतीरुपी आधारवड सर्वच कुटुंबियांच्या कायमच सोबत राहणार आहे.


– दीपक गुंडये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -