घरफिचर्सआधुनिक भास्कराचार्य केरुनाना छत्रे

आधुनिक भास्कराचार्य केरुनाना छत्रे

Subscribe

विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना लक्ष्मण छत्रे यांचा आज स्मृतिदिन. केरुनाना छत्रे हे आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य होते. त्यांचा जन्म १६ मे १८२५ रोजी अलिबागमधील नागाव या गावी झाला. प्राचीन भारतीय तसेच आधुनिक गणित व खगोलशास्त्र यांचे निस्सीम उपासक म्हणजे केरुनाना छत्रे. आई-वडिलांना बालपणीच अंतरल्याने त्यांना शिक्षणासाठी मुंबईस चुलत्याकडे यावे लागले. त्यांच्यामुळेच केरुनानांना वाचनाची गोडी व कोणत्याही प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहण्याची सवय लागली. उत्तरायुष्यात केरुनानांनी गणितात संपादन केलेल्या लौकिकाची चाहूल त्यांच्या विद्यार्थी जीवनातच दिसू लागली होती. विशेषत: गणित, खगोल आणि पदार्थविज्ञानासारख्या कठीण शास्त्रात त्यांना पुढे जी गती प्राप्त झाली. त्याच्या जोरावर केरुनानांनी प्रगल्भ ग्रंथांचे परिशीलन करून या विषयांवर घट्ट पकड बसण्याएवढे त्यातले प्रगत ज्ञान प्राप्त केले. मुंबईस कुलाबा दांडीवर अंतरिक्ष चमत्कार व लोहचुंबक यांचे अनुभव घेण्यासाठी १८४० मध्ये प्रो. आर्लिबार यांनी एक वेधशाळा काढली. तिथे केरुनानांची असिस्टंटच्या जागी नेमणूक करण्यात आली.

अवघ्या १५ व्या वर्षी द.म. ५० रु. पगारावर मिळालेल्या या नोकरीत नानांनी पुढली १० वर्ष जागरुकपणे हवामानशास्त्राचे प्रशिक्षणच घेतले. १८५१ पासून मात्र पुणे कॉलेजचे नॉर्मल स्कूल, पुढे ट्रेनिंग कॉलेज आणि अहमदनगरच्या इंग्रजी शाळेचे हेडमास्तर अशा सरकारी संस्थांतून त्यांच्या बदल्या झाल्या. या प्रत्येक ठिकाणी गणित, सृष्टिशास्त्र व पदार्थविज्ञान हेच विषय ते जरुरीप्रमाणे इंग्रजी व मराठीत सराईतपणे शिकवीत असत. दरम्यान, त्यांनी इंजिनीअरिंग कॉलेजातसुद्धा सृष्टीशास्त्रावर व्याख्याने दिली. मुलांना समजेल अशा सोप्या रीतीने शिकविण्याची त्यांची हातोटी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाखाणलेली आहे. गणिताशिवाय विद्यार्थ्यांना इतर शास्त्रांचे थोडेबहुत ज्ञान देण्यावर त्यांचा कटाक्ष असे. विद्यार्थ्याने केव्हाही- कुठेही शंका विचारली तरी ते हसत-खेळत हरप्रयत्नाने तिची उकल करीत असत. केरुनानांनी लक्ष घातलेला आणखी एक विषय म्हणजे पंचांग शुद्धीकरणाचा. आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांच्या असे लक्षात आले की, परंपरागत पंचांगात केलेले अशुद्ध गणित व घेतलेली ग्रहस्थितींची स्थूलमाने या चुकांमुळे ऋतुकाल तसेच पंचांगात दाखवलेल्या ग्रहस्थितीचा प्रत्यक्षातल्या ग्रहस्थितीशी मेळ बसत नाही. वेधशाळेतील नोकरीमुळे ग्रहांचे वेध घेण्याची कला त्यांना अवगत होती.

- Advertisement -

केरुनानांच्या पुरोगामी विचारसरणीचे द्योतक म्हणजे स्त्रियांच्या सामाजिक सुधारणेस त्यांचा पाठिंबा होता. शिवाय ते मुलींच्या शाळेच्या व्यवस्थापक मंडळावर होते, श्रीमती रमाबाई रानडे यांच्या प्रेरणेने भरणार्‍या स्त्रियांच्या सभांना हजर राहून त्यांचे शिक्षण करत. स्त्रियांना जड विषयांऐवजी गृहजीवनोपयोगी शिक्षण देण्याच्या मताचे ते होते. मात्र गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचा राबता होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे. अशा या थोर आधुनिक भास्कराचार्यांचे १९ मार्च १८८४ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -