घर फिचर्स मायमहानगर ब्लॉग दोस्तो का दोस्त विलासराव...

दोस्तो का दोस्त विलासराव…

Subscribe

डॉ. जितेंद्र आव्हाड

काँग्रेसमध्ये असताना मी आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या गटातील एक छोटासा कार्यकर्ता होतो आणि विलासराव देशमुख हे नेहमीच पवार साहेबांच्या विरोधातील गटात सक्रिय असायचे. 1980 ते 95च्या काळात सर्वाधिक खाती असलेले ते महाराष्ट्राचे त्या काळातील एकमेव मंत्री होते. 1995 साली त्यांचा पराभव झाला आणि ते राजकीय विजनवासात जात आहेत, असे मला वाटायला लागले. ते नंतर शिवसेनेच्या मदतीने विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढले आणि त्यांचा काही टक्के मतांनी पराभव झाला, बरे झाले ते हरले.

- Advertisement -

1999 साली त्यांनी परत लातूर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. काँग्रेस हायकमांडने मागचा इतिहास न पाहता त्यांना मुख्यमंत्री केले. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ हा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरला. सगळे तरुण मंत्री, तरुण सहकारी हे पहिल्यांदाच मंत्री झाले होते आणि महत्त्वाची खाती सांभाळत होते. त्या सगळ्यांना एकत्रित घेऊन विलासराव आपला कारभार योग्य रीतीने चालवत होते.

ते काँग्रेसमध्ये होते आणि मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये स्वीकृत सदस्याचे एक पद द्यायचे होते. पण, काँग्रेसमध्ये प्रचंड वाद चालू होते. त्यादरम्यान त्यांनी एकेदिवशी मला विधानसभा चालू असताना आपल्या बाकाजवळ बोलावून घेतले आणि सांगितले की, तू एक नाव मला ठाण्यातील काँग्रेसमधील कार्यकर्त्याचे सूचव. मी म्हटल साहेब ते काँग्रेसचे कार्यकर्ते मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, मी कसे काय नाव सुचवणार? त्याचवेळी ते पटकन एक वाक्य म्हणाले की, तू मनातून पक्का काँग्रेसी विचारांचा आहेस, याची मला खात्री आहे. त्यामुळे तू जे नाव देशील, ते मला मान्य असेल. मला आजही त्यांची ही वाक्यं आठवतायेत. मी दुसऱ्या दिवशी एका चिठ्ठीवर राजेश जाधव असे नाव लिहून दिले. त्यांनी ते नाव घेतले आणि त्यांचे भिसे नावाचे स्विय्य सहाय्यक होते, त्यांच्या हातात दिले आणि सांगितले की, या नावाची घोषणा करायला सांगा. 24 तासांत घोषणा झाली व राजेश जाधव हे शिक्षण मंडळाचे सदस्य झाले.

- Advertisement -

विधान परिषदेमध्ये ते, गिरणी कामगारांच्या जमिनी जोपर्यंत पैसे मिळत नाही, तोपर्यंत आपण विकू देणार नाही, असा कायदा आणण्याबाबत बोलत होते. त्यांची भाषणाची स्टाईल, त्यांची शब्द फेकण्याची लकब… मी त्यांच्या भाषणाच्या मधेच त्यांना थांबवलं. हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आणि म्हटलं की, फक्त गिरणी कामगारच कामगार आहेत का साहेब? इतर कंपन्याही लोक विकून चालले आहेत आणि त्या कामगारांना पैसे न देता कंपन्या बंद पडत आहेत. पैसे घेऊन ते मालक अमेरिकेला निघून जात आहेत आणि कामगार मात्र न्यायालयाचे फेरफटके मारतोय. हातात दिडकीही पडत नाही. कारण, कायद्याचं बंधनच नाहीये. तर हे सगळ्यांनाच लागू करा. ज्या कंपन्या, ज्या मिल बंद करायच्या असतील त्यांनी आधी कामगारांचे पैसे द्यायचे. युनियनशी अ‍ॅग्रिमेंट करायचं आणि मग लेबर कमिशनरने सेल परमिशन द्यायची. त्यानंतरच सरकार त्यांना जमीन विक्रीसाठी परवानगी देईल. हे मी बोलल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी तात्काळ जाहीर केलं की, जी सूचना आता जितेंद्र यांनी केली त्या सूचनेचा मी स्वीकार करतो. या कायद्यामध्ये त्याचा समावेश करूनच हा कायदा करू, असे आश्वासन देतो. नंतर हा कायदा झाला आणि यामध्ये कामगारवर्गाचा तुफान फायदा झाला. कारण कोणालाही पैसे मिळाल्याशिवाय जमीन विकताच येणार नाही, ही जी कायद्यातील मुख्य तरतूद आली, त्यामुळे कामगारवर्ग खूश झाला व कामगारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळायला सुरुवात झाली.

नंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. ही सगळी गडबड चालू असतानाच एकेदिवशी पहाटे साडेचार ते पावणेपाचच्या दरम्यान माझा मोबाईल वाजला. समोरून आवाज आला जितेंद्र आव्हाड बोलताय का, तर मी हो म्हटलं. समोरून आवाज आला, मी जऱ्हाड बोलतोय. (जऱ्हाड जे विलासराव देशमुख साहेबांचे स्विय्य सचिव होते) त्यांनी सांगितले साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे. मी आश्चर्य व्यक्त केले की, एवढ्या सकाळी विलासरावांचा फोन कशाला आला? त्यांनी समोरून विचारले की, जितेंद्र तुझी ज्योती नावाची बहीण आहे ना? तर मी लागलीच म्हटलं हो साहेब. तर ते म्हणाले तीने 10 टक्के कोट्यातून घर मिळण्याची अ‍ॅप्लिकेशन केले होते का? मी म्हटलं हो साहेब खूप वर्षांपूर्वी केले होते. तर ते म्हणाले की, तू कधी मला बोलला नाहीस. मी म्हटलं, साहेब एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी आपल्याशी कसं बोलाव, हे मला जमलं नाही. ते समोरुन म्हणाले की, माझ्यासमोर आता दोन फ्लॅट आहेत. एक साडेआठशे स्क्वेअर फूटाचा आणि दुसरा साडेनऊशे स्क्वेअर फूटाचा आहे. मी साडेनऊशे स्क्वेअर फूटाचा फ्लॅट तुझ्या बहिणीच्या नावावर करतोय आणि फोन डिस्कनेक्ट केला. नंतरचे पेपरवर्क कसे झाले ते मला काही आठवत नाहीत. पण, तो फ्लॅट आता माझ्या बहिणीच्या नावावर आला.

असे नेते आता दिसतील का? किती मोठे मन लागते याच्यासाठी! मी तसा काही विलासरावांच्या आतल्या गटातला, जवळचा वगैरे काही नव्हतो. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, ते काँग्रेसमध्ये होते. तसा काही दुरान्वयेही त्यांचा आणि माझा कधी मैत्रीपूर्ण संवाद किंवा अतिशय चांगले संबंध, असेही काही नव्हते. एक कार्यकर्ता व नेता म्हणून जे काही संबंध होते तितकेच. पण, अशाही परिस्थितीत नाव चाळत असताना माझ्या आडनावात साधर्म दिसल्यामुळे फोन करायचा की, ज्योती ही तुझी बहीण आहे का… आणि त्यानंतर सांगायचं की, मी हा फ्लॅट तिच्या नावावर करतोय…

त्यांची भाषणाची स्टाईल, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांची शब्दफेक कपाळावरचे केस, भाषण करत असतानाचे हातवारे, त्यांची आणि गोपीनाथ मुंडेंची असलेली मैत्री, त्यांची आणि सुशीलकुमार शिंदेंची म्हणजे ‘दो हंसो का जोडा’ म्हणून गाजलेली मैत्री हा महाराष्ट्रात नेहमीच चर्चेचा विषय असायचा.

विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये विरोधी बाकांवरती असलेल्यांकडून जेव्हा टीका-टिप्पणी होत असायची, त्याला ज्या चपखलपणाने विलासराव उत्तर देत असतं तसे मी परत कधी विधान परिषदेत, विधानसभेत पाहिलेच नाही. कधीही न चिडता, आक्रमक न होता क्रिकेटमध्ये फक्त बॅट तिरकस करून चौकार मारायचा… तसेच शब्दफेक त्यांची असायची विरोधकाला तर निरुत्तर करायचेच, पण त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी हसरे भाव असायचे. वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या व्यासपीठावरून केलेली भाषणे महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहतील.

अचानक त्यांचा आजार वाढला आणि एकेदिवशी बातमी आली विलासराव गेले. त्यानंतर त्यांचा मुलगा अमितशी माझी जेव्हा जेव्हा भेट झाली, तेव्हा तेव्हा या आठवणी मी त्याला सांगायचो, तेव्हाही माझे डोळे पाणावयाचे. कारण अशी दिलदार मनाची माणसं आजकालच्या राजकारणात विरळच… महाराष्ट्राला परत एकदा अशा विलासरावांची खूप गरज आहे.
आजच्या दिनी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

(लेखक माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत)

- Advertisment -