आ बैल मुझे मार !

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या चर्चेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फारूख अब्दुल्ला यांचे केलेले समर्थन हे देशातील अनेकांना खटकणारी गोष्ट होती. सध्या ईडी आणि सीबीआयकडून काही राजकीय नेत्यांची चौकशी सुरू आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी संतप्त होऊन सरकारने मला ईडी किंवा सीबीआयची नोटीस पाठवून दाखवावी, असे आव्हान दिले आहे. सुप्रिया सुळे या सुज्ञ आणि संयमी राजकीय नेत्या मानल्या जातात, असे असताना त्यांनी घेतलेला पवित्रा म्हणजे आ बैल मुझे मार, अशा प्रकारातला आहेे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या संख्येने नेते आणि पर्यायाने त्यांचे कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे अर्थातच त्यांच्या मुख्य नेत्यांपुढे या फुटलेल्या धरणाला आवर कसा घालायचा, अशी चिंता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या या धरणफुटीला जसा पक्षांतर्गत तणातणाव कारणीभूत आहे, आता राष्ट्रवादीला काही भविष्य नाही, असे या पक्षांतील अनेकांना वाटू लागले असताना सरकारी पक्षाकडून कारवाईच्या येत असलेल्या धमक्यांचेही कारण आहे. यामुळे या नेत्यांना भाजपत भविष्य दिसत आहे. भाजप सध्या संधींचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे ज्यांना संधी साधायची आहे, त्यांनी भाजपची वाट धरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आता वय झाले आहे. काँग्रेसकडे केंद्रीय आणि राज्य पातळीवर प्रभावी नेतृत्त्व नाही. त्यामुळे त्या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड ढिलाई आणि नैराश्य आले आहे. मुख्य नेत्याचा वचक नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सावळागोंधळ माजला आहे. त्यातूनच मग परस्पर हेवेदावे उफाळून येत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सावली मानली जाणार्‍या त्यांच्या निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या तडफदार नेत्या चित्रा वाघ पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये जातील, अशी कुणी कल्पना केली नव्हती. त्यांच्या पतीविरोधात कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचं कारण त्यांच्या पक्ष प्रवेशात असल्याचं सांगण्यात आलं. पण त्या सोडून गेल्या हे वास्तव आहे. असे बरेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील नेते भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे ही गळती कशी रोखावी, असा प्रश्न या पक्षांच्या मुख्य नेत्यांना पडला आहे. त्यातून सुप्रिया सुळे यांनी अतिशय उद्विग्न होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेच्या तोफा डागायला सुरुवात केली आहे. भाजपकडे अशी कुठली वॉशिंग पावडर आहे की, जी लावून ते इतर पक्षांमधील नेत्यांना स्वच्छ करून आपल्या पक्षात घेत आहेत. कारण हीच मंडळी या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होती.

त्यावर फडणवीस यांनी आमच्याकडे वॉशिंग वापडर नाही, तर डॅशिंग लिडरशिप आहे, असे सांगून इनकमिंगचे उघड समर्थन केले. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे लिडरशिपचा अभाव हिच मोठी समस्या आहे. त्यामुळे पदाधिकार्‍यांना या पक्षांमध्ये काही भविष्य दिसेनासे झाले आहे. भाजपकडे सध्या राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदीचे प्रभावी नेतृत्व आहे. तर दुसर्‍या बाजूला मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे प्रभावी नेतृत्व नाही. त्यामुळे देशभरात त्यांची प्रचंड पडझड झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे भाजपाचा वेगाने विस्तार होत आहेे. विविध राज्यांमध्ये आपल्या पक्षाचे राज्य येण्यासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाचा आणि भाजपच्या केंद्रातील बहुमताचा वापर करण्यात येत आहेे. काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे सर्वसाधारण बाब नव्हती, कारण काश्मीर समस्येला आंतरराष्ट्रीय आयाम आहे. तो प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नोंद आहे. त्यामुळे केंद्रात आजवर आलेल्या कुठल्याच सरकारने काश्मीरच्या ३७० कलमाला हात घातला नव्हता. पण नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी धाडस करून हे कलम रद्द करून जम्मू-काश्मीरला खर्‍या अर्थाने भारतीय संघराज्यात सहभागी करून घेतले. खरे तर देशातील बहुसंख्य लोकांनी मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले. पहिल्यांदा काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले तर त्यानंतर ते लोकसभेतही मंजूर झाले. लोकसभेत या विषयावर विविध पक्षांच्या खासदारांची भाषणे झाली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात या सदनात फारुख अब्दुल्ला हे उपस्थित नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे काश्मीर प्रश्नावरील हे चर्चा अपूर्ण आहे, असे सांगितले. पण आम्ही फारूख अब्दुल्ला यांना इथे येण्यासाठी प्रतिबंध केलेला नाही, असे अमित शहा यांनी स्पष्ट केेले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी फारूख अब्दुल्ला यांची प्रकृती ठिक नाही का, अशी विचारणा अमित शहा यांच्याकडे केली. त्यावर ते मला माहीत नाही. मी डॉक्टर नाही, असे उत्तर शहा यांनी दिले. ही विचारणा करत असताना आपण एक ऐतिहासिक चूक करत आहोत, याची कल्पनाही सुप्रिया सुळे यांना आली नाही. कारण काश्मीरमधील ३७० कलम ही भारतीयांसाठी एक भळभळती जखम आहे, याची कल्पना सुळे यांना जाणीव असायला हवी होती. ज्या फारुख अब्दुल्ला यांनी ३७० कलमातून मिळणार्‍या स्वायत्त दर्जाच्या माध्यमातून काश्मीरवर आपली जहागीर निर्माण केली. अनेक वेळा पाकिस्तानला खूश करणारी विधाने केली. भारतीयांच्या भावनांच्या चिंधड्या उडवल्या, अशा व्यक्तीचे महत्त्व वाढवून आपण देशातील लोकांच्या मनात आपल्या विषयी राग निर्माण करत आहोत, याचा विसर सुळे यांना पडला. खरे तर सुप्रिया सुळे या उच्चविद्याविभूषित आहेत. राज्यसभा आणि लोकसभेत त्यांची वागणूक जबाबदार संसदपटूची राहिलेली आहे. असे असताना आपण कुणाचे आणि कशासाठी समर्थन करत आहोत, याचा त्यांना विसर पडावा ही अत्यंत खेदजनक आणि धक्कादायक बाब आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच महाराष्ट्र दौर्‍यावर असताना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ३७० च्या विरोधात भूमिका घेतली असा आरोप केला.

सध्या सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ‘ईडी’कडून अनेक राजकीय नेत्यांची चौकशी सुरू असून त्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यावरून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेच्या अनेक संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात विविध पक्षांचे नेते आहेत. त्यात राष्ट्रवादीचे मुख्य नेते अजित पवार यांचाही समावेश आहे. ईडीकडून नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे विविध पक्षांमधील नेत्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. विविध पक्षांतील नेत्यांच्या मागे ईडी किंवा सीबीआय चौकशीचा ससेमिरा लावून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे. त्या माध्यमातून त्यांची तोंडे बंद करण्यात येत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांच्या मुख्य नेत्यांकडून करण्यात येत आहे. हे पाहून संतप्त झालेल्या सुप्रिया सुळे यांनी सरकारने आपल्याला ईडी किंवा सीबीआयची नोटीस पाठवून दाखवावी, असे आव्हान दिले आहे. सुप्रिया सुळे यांच्याभोवती आजही पिताश्री शरद पवार यांचे संरक्षण कवच आहे. त्यामुळे आपल्यावर कुणी कारवाई करण्यास धजावणार नाही, असा विश्वास त्यांना वाटतो. कारण शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राचे पान हलत नाही, अशी त्यांची ख्याती आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे पुढील काळातील महाराष्ट्रातील एक जबाबदार नेतृत्व म्हणून पाहिले जाते. कारण अजित पवार यांच्यापेक्षा त्यांच्याकडे सुज्ञपणा आणि संयम आहे. पण काश्मीरमधील ३७० कलमावरील चर्चेच्यावेळी त्यांनी घेतलेली अब्दुल्लांची बाजू आणि ईडी, सीबीआयची नोटीस पाठविण्याचे दिलेले आव्हान हे म्हणजे आ बैल मुझे मार, असे म्हणण्यासारखे आहे. त्यामुळे आपण आपले नुकसान करून घेत आहोत, हे सुप्रिया सुळेंना कधी कळणार?